स्वादुपिंडाचा (Pancreas) कॅन्सर

Update: 2017-07-28 15:25 GMT

स्वादुपिंड (Pancreas) शरीरातील मिश्रित ग्रंथी असून ती पोटामध्ये वरच्या भागात डाव्या अंगाला जठरच्या पाठीमागे वसलेली असते. स्वादुपिंड मध्ये हेड, नेक, बॉडी व टेल असे असे चार भागात विभाजन केले जाते तसेच पॅनक्रियाटीक duct द्वारे डीओडेनम या छोटी आतडीला जोडलेले असते. त्याद्वारे अन्नपचनासाठी आवश्यक एन्झाईम्स स्वादुपिंडामध्ये बनवून पाठवली जातात. स्वादुपिंडाचे दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे इन्सुलिन, ग्लूक्यागोण, सोम्याटोस्टयाटीन इत्यादी होर्मोन्स बनवली जातात व त्याद्वारे मुख्यतः साखरेचे प्रमाण नियंत्रित केले जाते.

स्वादुपिंड (Pancreas) कॅन्सर

अॅपल कंपनी ज्यांनी स्थापन केली त्या स्टिव्ह जॉब्स यांच्या रोगाने झालेल्या मृत्युमुळे या कॅन्सरची बरीच चर्चा झाली. दरवर्षी जगामध्ये ३ लाख ४० हजार रुग्ण स्वादुपिंडच्या कॅन्सरने पिडीत होतात. तसेच जवळपास ३ लाख ३० हजार रुग्णांचा या कॅन्सरमुळे मृत्यु होतो. या रोगाचे प्रमाण भारतामध्ये १२ हजार रुग्ण पिडीत होतात अशी नोंद आढळते तर जवळपास तितकेच रुग्ण दरवर्षी मृत्यु पावतात. वरील आकडेवारी पाहता या कॅन्सरने होणाऱ्या मृत्युचे प्रमाण अधिक आहे आणि याची मुख्य कारणे रोग नंतरच्या टप्प्यात माहिती पडणे तसेच उपचारामध्ये म्हणावी तशी न झालेली प्रगती आहे. भारतात मिझोराममध्ये सर्वात जास्त या कॅन्सरचे प्रमाण आढळते.

स्वादुपिंड कॅन्सर होण्याची करणे काय आहेत ?

तंबाखू, स्मोकिंग, मद्यपान, लाईफस्टाइल मधील बदल, अनुवंशिकता, वाढते वय, डायबेटीस, लट्ठपणा, व्यायाम न करणे आणि आहार इत्यादी कारणामुळे स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. साधारणपणे ५ ते १० टक्के स्वादुपिंड कॅन्सर हा अनुवंशिक असू शकतो. यामध्ये BRCA म्युटेशन, पित्झ जेघर्स सिन्ड्रोम, लिंच सिन्ड्रोम (HNPCC) अश्या रोगामध्ये हा कॅन्सर आढळतो. साधारणपणे ९० टक्के पेक्षा जास्त स्वादुपिंडचा कॅन्सर ५५ वर्षानंतर आढळतो तसेच पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये याचे प्रमाण कमी आहे.

स्वादुपिंड कॅन्सर मध्ये ९० टक्के पेक्षा जास्त रुग्णांना अडीनोकार्सिनोमा पाथोलोजी असते तर उर्वरित मध्ये न्यूरोइंडोक्राईन टुयमर असतात. त्यामध्ये इन्सुलिनोमा, ग्लुकोमा, ग्यास्ट्रोमा इत्यादी प्रकार असू शकतात. आपण इथे केवळ अडीनोकार्सिनोमा बद्दल माहिती घेऊ.

स्वादुपिंड कॅन्सरची लक्षणे व तपासणी:-

कावीळ होणे

पोटात दुखणे

पिवळी लघवी होणे

उल्टी होणे

अंग खाजवणे

पोट सुमारणे व पोटात पाणी होणे

श्वास घेण्यास त्रास होणे

भूक न लागणे

वजन कमी होणे

तपासणी :- रक्त तपासणी, बिलीरुबीन व CA १९-९ इत्यादी रक्त तपासणी कराव्यात. छातीचा एक्सरे, सी.टी. स्कॅन, MRCP करून किंवा सी.टी. स्कॅन किंवा सोनोग्राफीच्या मार्गदर्शनखाली तुकडा काढून रोग असल्याची खात्री करावी.

स्वादुपिंड कॅन्सरचे उपचार कसे करावे?

शस्त्रक्रिया, रेडीओथेरपी, केमोथेरपी आणि टार्गेट थेरपी या सर्व प्रकारच्या उपचार पध्दती स्वादुपिंडचा कॅन्सर बरा करण्यासाठी वापरल्या जातात. कुठली उपचार पध्दती केंवा वापरायची हे रोग कितव्या टप्पात आहे त्याच्यावरून ठरवीले जाते. हा रोग बहुतांश वेळा लेट स्टेज मध्ये माहिती पडतो त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करता येत नाही.

शस्त्रक्रिया

या रोगाच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया ही मुख्य उपचार पध्दती असून रोग सुरुवातीच्या टप्प्यात असल्यास किंवा रोग आकाराने लहान असल्यास किंवा शस्त्रक्रिया करून रोग पूर्णपणे काढता येत असल्यास रोगाने बाधित झालेला स्वादुपिंड व आजूबाजूचे अवयव काढणे गरजेचे असते आणि या शस्त्रक्रियेला व्हिप्पल प्रोसिजर असे संबोधले जाते.

केमोथेरपी:

केमोथेरपीचे उपचार तिसऱ्या आणि पुढील टप्प्यात असणाऱ्या रोग साठी वापरले जातात. केमोथेरपीचे उपचार दर दोन आठवड्याने दिले जातात. शस्त्रक्रियाचे टाके भरून येण्यासाठी किमान तीन ते चार आठवड्यांचा अवधी देऊन जखम भरल्यास किमोथेरेपीचे उपचार सुरु करावे. किमोथेरपी जलद गतीने वाढणाऱ्या कॅन्सर पेशी तसेच रक्त पेशी, केस, अन्न नालीकेच्या पेशीना देखील अटकाव करते त्यामुळे रोग बरा होण्याबरोबर काही दुष्परिणाम देखील होतात. किमोथेरपीचे उपचार चालू असताना मळमळ होणे, उल्टी होणे, तोंडाला छाले येणे, भूक न लागणे, जुलाब होणे, केस जाणे, रक्त कमी होणे, इन्फेक्शन होणे, इत्यादी दुष्परिणाम होऊ शकतात.

काही वेळा रोगाची मात्रा अधिक असल्यास किंवा सुरुवातीस शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्यास अशावेळी किमोथेरपीचे उपचार करून रोग शस्त्रक्रिया करण्यायोग्य करून चार आठवड्यानंतर शस्त्रक्रिया केली जाते.

रेडीओथेरपी

रेडीओथेरपीमध्ये जास्तीत जास्त रेडीएशन रोगास व कमीत कमी रेडीएशन बाजूंच्या महत्वाच्या अवयवांना ठेवून त्यांच्याशी संबंधित दुष्परिणाम कमी ठेवण्यासाठी किमान ३ डी - सी. आर. टी किंवा आ एम.आर.टी. उपचार पध्दती अनुसरावी. रेडीओथेरपी साधारणपणे दररोज, आठवड्यातून पाच वेळा असे दीड महिन्यापर्यंत दिली जाते.

इंट्रा ऑपरटीव रेडीओथेरपी किंवा SBRT स्टेरिओटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपीची सुविधा उपलब्ध असल्यास जरूर वापरावेत कारण कॅन्सर गाठीवर उपचार करण्यासाठी लागणारा संपूर्ण रेडिएशन डोस एकाच वेळी 1-2 मी.मी. इतक्या तंतोतंतपणे दिला जातो. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे एक दीड महिन्याऐवजी एक दिवस ते आठवड्यामध्ये उपचार पूर्ण होतात. परंतु मोठ्या आकाराच्या गाठीसाठी हे वापरता येत नाही.

पसरलेला स्वादुपिंड कॅन्सर:

अशा रुग्णांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीचा अंदाज घेऊन, उपचार सहन करू शकत असल्यास केमोथेरपीचे उपचार किंवा EGFR च्या तपासण्या नुसार टार्गेटथेरपी दिली जाते. रोग पसरलेला असल्यास कधी कधी रुग्णाची प्रकृती फारच खालावलेली असते. अशा वेळी रुग्णाला केवळ त्रास होऊ नये म्हणून फक्त प्यालिएटीव उपचार करावेत.

 

डॉ. दिलीप निकम,

विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.

कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई

docnik128@yahoo.com

Similar News