लिम्फोमा (Lymphoma) कॅन्सर

Update: 2017-06-01 18:41 GMT

लिम्फोमा हा ब्लड कॅन्सर चा एक प्रकार असून तो समजून घेण्यापूर्वी लिम्फ्याटीक सिस्टीम बाबत माहिती असणे गरजेचे आहे. लिम्फ्याटीक सिस्टीम म्हणजे असंख्य लासिका (lymphatics) व लिम्फ नोड (lymph nodes) यांचे गुंफलेलं जाळे असून टॉन्सिल, प्लीहा, किंवा थायमस सारखे अवयव देखील या संस्थेचे भाग आहेत. शरीरातील अवयवांमध्ये बनलेली टॉक्सिन, वेस्ट प्रोडक्ट्स हृदय कडे घेऊन जाणे तसेच विषाणू किंवा जीवाणू यांचा पांढऱ्या पेशी (lymphocytes) बनवून प्रतिकार करणे इत्यादी महत्वाची कार्ये आहेत. मानवी शरीरात साधारणपणे ६०० ते ७०० लिम्फ नोड असतात व एक ते दीड से.मी. पेक्षा आकाराने लहान असतात. या नोडमध्ये मुख्यतः पांढऱ्या पेशी (lymphocytes) बनवून साठविल्या जातात. कन्सरमध्ये ही प्रक्रिया अनियंत्रित होऊन वरील पांढऱ्या पेशी ज्यास्त संख्येने बनतात त्याला लिम्फोमा असे संबोधले जाते. लिम्फोसाईट (lymphocytes) पेशीमध्ये बी (B cell ) व टी (T cell) अश्या दोन प्रकारच्या पेशी असून साधारण ८५% लिम्फोमा बी (B cell ) पेशींमध्ये आढळतो. आर. एस. (reeds stenberg cell) पेशी ज्या लिम्फोमामध्ये आढळतात त्यांना हॉचकीन (Hodgkin lymphoma) मध्ये वर्गीकरण केले जाते व आर. एस.पेशी न आढळणाऱ्या लिम्फोमाला नॉन-हॉचकीन (Non-Hodgkin lymphoma) मध्ये वर्गीकरण केले जाते.

लिम्फोमा होण्याची काय कारणे आहेत ?

लिम्फोमा नेमका कश्यामुळे होतो याचा अजून तरी शोध लागलेला नाही परंतु काही गोष्टी या रोगाशी निगडीत आहेत. इबस्टन वायरस, हिपॅटायटीस B व C, H पायलोरी, प्रतिकार शक्ती कमी करणारे रोग, एडस्, व काही अनुवंशिक सिन्ड्रोम.

लिम्फोमाची लक्षणे व तपासणी:-

१. मानेत, बगलेत, पोटात, जांगेत लिम्फ नोडच्या गाठी होणे.

२. ताप येणे.

३. वजन कमी होणे.

४. जास्त प्रमाणात घाम येणे (रात्री).

५. खाज येणे.

६. थंडी वाजणे.

७. भूक न लागणे.

८. अशक्तपणा येणे.

९. खोकला येणे, श्वसनास त्रास होणे, छातीत दुखणे

तपासणी:- रक्त तपासणी, LDH, ESR, बीटा२ मायक्रोग्लोबुलीन, छातीचा एक्सरे, सी. टी. स्कॅन करावा. खरोखरीच लिम्फोमा किती पसरलेला आहे हे पाहण्यासाठी पेट स्कॅन करावा. ऍडव्हान्स रोगामध्ये बोनमॅरो करून हाडात पसरलेला नसल्याची खातर जमा करावी. लिम्फ नोडची गाठ काढून नेमका कुठल्या प्रकारचा लिम्फोमा आहे हे पाहावे यामध्ये इमिनोहिस्टोकेमिस्ट्री व जनुकीय तपासण्या फार उपयोगी येतात.

हॉचकीन लिम्फोमा (Hodgkin lymphoma):

जगामध्ये दरवर्षी ४० हजार रुग्ण नव्याने हॉचकीन लिम्फोमाने पीडित होतात तर जवळपास१५ हजार रुग्ण दगावतात. भारतामध्ये मात्र जगाच्या तुलनेत या रोगाचे प्रमाण कमी असून साधारणपणे असून दर वर्षी ५ हजार रुग्ण नव्याने पीडित होतात तर जवळपास ३ हजार रुग्ण दगावतात.

वयाची २५ ते ३० वर्ष व ७५ ते ८० वर्ष या कालावधी दरम्यान आढळतो, स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. या रोगामध्ये ६ उपप्रकार आहेत nodular व क्लासिक हॉचकीन लिम्फोमा हे मुख्य प्रकार असतात.

रेडीओथेरपी/ ABVD किमोथेरपी उपचारांना हॉचकीन लिम्फोमा अतिशय चांगला प्रतिसाद देतो. त्यामुळे रोग बरा होण्याचे प्रमाण फार जास्त आहे. दोन्ही उपचार पध्दती मध्ये दुष्परिणाम वेगवेगळे असल्या कारणाने उपचाराची पध्दती निवडणे कठीण असते. रुग्ण व उपचार करणाऱ्या डॉक्टर यांनी सल्ला मसलत करून योग्य पध्दती निवडावी.

नॉन-हॉचकीन लिम्फोमा (Non-Hodgkin lymphoma):

जगामध्ये दरवर्षी २ लाख रुग्ण नव्याने नॉन-हॉचकीन लिम्फोमाने पीडित होतात तर जवळपास १ लाखाच्या वर रुग्ण दगावतात. भारतामध्ये मात्र जगाच्या तुलनेत या रोगाचे प्रमाण की असून साधारणपणे दरवर्षी १५ हजार रुग्ण नव्याने पीडित होतात तर जवळपास ११ हजार रुग्ण दगावतात.

हा रोग वयाच्या ६५ वर्षानंतर आढळतो, स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. हा रोग बी (B cell ) व टी (T cell) अश्या दोन प्रकारच्या पेशींमधून उदभवू शकतो तसेच या रोगामध्ये ६० पेक्षा जास्त उपप्रकार असून सर्वच इथे मांडणे शक्य नाही. नेहमी आढळणारे दोन प्रकार खाली दिले आहेत.

फॉलीकुलार लिम्फोमा( Follicular lymphoma):

नॉन-हॉचकीन लिम्फोमा मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारा रोग असून याचे प्रमाण साधरण पणे २० टक्के इतके आहे. हा रोग ६० वर्षानंतर आढळणारा असून अतिशय संथपणे वाढणारा रोग आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात असणाऱ्या रोगास केवळ रेडीओथेरपीचे उपचार पुरेशे असतात. तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात रोग असल्यास (R-CHOP) किंवा BR किमोथेरेपीचे उपचार केले जातात. भविष्यात हा रोग काही प्रमाणात डीफुज लार्ज बी सेल लिम्फोमामध्ये परावर्तीत होऊ शकतो त्यामुळे उपचारनंतर देखील रुग्णास निगराणीमध्ये ठेवले जाते.

डिफुज लार्ज बी सेल लिम्फोमा (DLBCL):

नॉन-हॉचकीन लिम्फोमा मध्ये सर्वात जास्त प्रमाणात (साधरण पणे ३० टक्के ) आढळणारा रोग असून यामध्ये सुद्धा वेगवेगळे उपप्रकार आढळतात. सुरुवातीच्या टप्प्यात रोग असल्यास किमोथेरेपीचे उपचार (R-CHOP) केले जातात. केमोथेरपीचे उपचार दर तीन आठवड्याने ६ ते ८ वेळा दिले जातात व नंतर ज्या भागात गाठी होत्या त्या भागास रेडीओथेरपीचे उपचार दिले जातात. यामध्ये जास्तीत जास्त रेडीएशन रोगास व कमीत कमी रेडीएशन बाजूंच्या महत्वाच्या अवयवांना ठेवून त्यांच्याशी संबंधित दुष्परिणाम कमी ठेवण्यासाठी किमान ३डी- सी. आर. टी किंवा आय एम.आर.टी. उपचार पध्दती अनुसरली जाते. रेडीओथेरपी साधारणपणे दररोज, आठवड्यातून पाच वेळा असे एक ते दीड महिन्यापर्यंत दिली जाते.

ऍडव्हान्स टप्प्यातील रोगाला हाय डोस किमोथेरपी दिली जाते व शक्य असल्यास स्टेम सेल ट्रान्सप्लांट केले जाते. किमोथेरपी जलद गतीने वाढणाऱ्या कॅन्सर पेशी तसेच रक्त पेशी, केस, अन्न नालीकेच्या पेशीना देखील अटकाव करते त्यामुळे रोग बरा होण्याबरोबर काही दुष्परिणाम देखील होतात. किमोथेरपीचे उपचार चालू असताना मळमळ होणे, उल्टी होणे, तोंडाला छाले येणे, भूक न लागणे, जुलाब होणे,केस जाणे, रक्त कमी होणे, इन्फेक्शन होणे, इत्यादी दुष्परिणाम होऊ शकतात.

 

डॉ. दिलीप निकम,

विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.

कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई

docnik128@yahoo.com

Similar News