पित्ताशयाचा कॅन्सर

Update: 2017-08-03 19:02 GMT

पित्ताशय (Gall Bladder) हे आकाराने पेअर या फळासारखे असून साधारणपणे ८ ते १० सें.मी. लांब व ३ सें.मी. रुंद असते. यकृतात बनलेल्या पित्ताची साठवणूक करणे तसेच अन्नपचनाकरिता ते लहान आतड्यांकडे पाठविणे ही त्याची कार्ये असतात. साधारणपणे ३० ते ५० मि.ली. बाईल साठविण्याची क्षमता असते. काही कारणांनी बाईल वाहून नेण्याच्या प्रक्रियेत बिघाड झाल्यास ३०० मि.ली.पर्यंत एका वेळी बाईल साठवले जाऊ शकते.

शरीरातील पित्ताशयाची ठेवण पोटामध्ये वरच्या भागात, उजव्या अंगाला तसेच यकृताच्या मागे असते. पित्ताशयाचे फंडस्, बॉडी, इनफंडीबुलम व नेक असे चार भागात विभाजन केले जाते तसेच ते कॉमन बाईल duct द्वारे पॅनक्रियाटिक duct ला जोडलेले असते. तसेच त्याद्वारे ते डिओडेनम या छोट्या आतड्याला जोडलेले असते. लहान आतड्यामध्ये मेद ( fat) शोषून घेण्यास बाईल मदत करते. पित्ताशय कॅन्सर जगामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण पित्ताशयाच्या कॅन्सरने ग्रस्त असून दर वर्षी जगात १ लाख ८० हजार नवीन रुग्ण पित्ताशयाच्या कॅन्सरने पिडीत होतात तसेच जवळपास १ लाख ४० हजार रुग्णांचा या कॅन्सरमुळे मृत्यू होतो. या आजारामुळे भारतामध्ये १९ हजार रुग्ण पिडीत होतात अशी नोंद आढळते तर जवळपास १६ रुग्ण दर वर्षी मृत्यू पावतात. वरील आकडेवारी पाहता या कॅन्सरने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या आकडेवारीमागचे मुख्य कारण म्हणजे पित्ताशयाचा कॅन्सर बायोलॉजीकली अतिशय अग्रेसिव असतो. तो पुढच्या टप्प्यात माहीत होणे तसेच म्हणावी तशी उपचारामध्ये प्रगती झालेली नाही, या कारणांमुळे हा आजार संपूर्ण बरा होण्याचे प्रमाण फार कमी आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त असून त्याची करणे मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

पित्ताशय कॅन्सर होण्याची कारणे -

पित्ताशयात गॉल स्टोन (पित्ताचे खडे) असल्यास कॅन्सरची शक्यता वाढते. तसेच वाढते वय हेही एक कारण असते. तंबाखू, धूम्रपान, मद्यपान, लाइफस्टाइलमधील बदल, आनुवंशिक, इत्यादी कारणामुळे पित्ताशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. साधारणपणे ९० टक्क्यांहून जास्त पित्ताशयाचा कॅन्सर ५५ वर्षानंतर आढळतो तसेच पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये याचे प्रमाण एकास चार असे आहे. पित्ताशय कॅन्सरमध्ये अडिनोकार्सिनोमा पॅथोलोजी असते तसेच ६० टक्के रोग फंडस्मध्ये, ३० टक्के बॉडीमध्ये तर १० टक्के नेकमध्ये आढळतो.

पित्ताशय कॅन्सरची लक्षणे व तपासणी -

कावीळ, पोटात दुखणे, सतत ढेकर येणे, पिवळी लघवी होणे, उल्ट्या होणे, पोटात गाठ/ सूज, पोट सुमारणे व पोटात पाणी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, भूक न लागणे व वजन कमी होणे आदी लक्षणे चिंताजनक प्रमाणात असल्यास कॅन्सर असण्याची शक्यता लक्षात घेऊन तपासण्या कराव्यात.

तपासणी - रक्त तपासणी, बिलीरुबीन व CA १९-९, CEA इत्यादी रक्त तपासण्या कराव्यात. छातीचा एक्स रे, सी.टी. स्कॅन, ERCP करून किंवा सी.टी. स्कॅन किंवा सोनोग्राफीच्या मार्गदर्शनखाली किंवा लॅपरोस्कोपीद्वारे तुकडा काढून रोग असल्याची खात्री करावी.

पित्ताशय कॅन्सरचे उपचार -

पित्ताशयाच्या कॅन्सरचे उपचार रुग्णाचे वय, शारीरिक क्षमता, रोगाचा टप्पा, व शस्त्रक्रियेद्वारे कॅन्सर संपूर्णपणे काढला जाऊ शकतो की नाही यांवर अवलंबून असतो. शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी व केमोथेरपी या सर्व प्रकारच्या उपचारपध्दती पित्ताशयाचा कॅन्सर बरा करण्यासाठी वापरल्या जातात. कुठली उपचारपध्दती केव्हा वापरायची हे कॅन्सर कितव्या टप्पात आहे त्यावरून ठरते. हा कॅन्सर बहुतांश वेळा उशिराच्या स्टेजमध्ये समजतो. त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करता येत नाही.

शस्त्रक्रिया

आजार संपूर्णपणे बरा करण्यासाठी शस्त्रक्रिया ही मुख्य उपचारपध्दती असून तो सुरुवातीच्या टप्प्यात असल्यास किंवा आकाराने लहान असल्यास किंवा शस्त्रक्रियेने तो पूर्ण काढणे शक्य असल्यास कॅन्सरग्रस्त पित्ताशय, गरज वाटल्यास यकृत व आजूबाजूच्या लिम्फ नोडच्या गाठी काढणे गरजेचे असते. काही वेळा शस्त्रक्रिया करून कॅन्सर पूर्णपणे काढता येत नसल्यास रक्तातील बिलीरुबीनचे प्रमाण कमी करण्यासाठी बायपास शस्त्रक्रिया, स्टेन्ट किंवा ड्रेनेज केले जाते.

केमोथेरपी :

केमोथेरपीचे उपचार तिसऱ्या आणि पुढील टप्प्यात असणाऱ्या कॅन्सरसाठी वापरले जातात. केमोथेरपीचे उपचार दर दोन आठवड्यांनी दिले जातात. शस्त्रक्रियाचे टाके भरून येण्यासाठी किमान तीन ते चार आठवड्यांचा अवधी देऊन जखम भरल्यास केमोथेरेपीचे उपचार सुरू करावे. केमोथेरपी जलद गतीने वाढणाऱ्या कॅन्सर पेशी तसेच रक्त पेशी, केस, अन्ननलिकेच्या पेशींनादेखील विरोध करते. त्यामुळे कॅन्सर बरा होण्याबरोबर काही दुष्परिणाम देखील होतात. केमोथेरपीचे उपचार चालू असताना मळमळ होणे, उल्टी होणे, तोंडात फोड येणे, भूक न लागणे, जुलाब होणे, केस जाणे, रक्त कमी होणे, इन्फेक्शन होणे, इत्यादी दुष्परिणाम होऊ शकतात.

काही वेळा कॅन्सरची मात्रा अधिक असल्यास किंवा सुरुवातीस शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्यास अशा वेळी केमोथेरपीचे उपचार करून रोग शस्त्रक्रिया करण्यायोग्य करून चार आठवड्यांनंतर शस्त्रक्रिया केली जाते.

रेडीओथेरपी

रेडीओथेरपी मध्ये जास्तीत जास्त रेडीएशन कॅन्सरला व कमीत कमी रेडीएशन बाजूच्या महत्त्वाच्या अवयवांना ठेवून त्यांच्याशी संबंधित दुष्परिणाम कमी ठेवण्यासाठी किमान ३ डी- सी.आर.टी. किंवा आय.एम.आर.टी. उपचारपध्दती अनुसरावी. रेडीओथेरपी साधारणपणे दररोज, आठवड्यातून पाच वेळा असे दीड महिन्यापर्यंत दिली जाते.

इंट्रा ऑपरेटिव रेडीओथेरपी किंवा SBRT स्टेरिओटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपीची सुविधा उपलब्ध असल्यास जरूर वापरावेत. कारण कॅन्सरगाठीवर उपचार करण्यासाठी लागणारा संपूर्ण रेडिएशन डोस एकाच वेळी 1-2 मि.मी. इतक्या तंतोतंतपणे दिला जातो. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे एक-दीड महिन्याऐवजी एक दिवस ते आठवड्यामध्ये उपचार पूर्ण होतात परंतु मोठ्या आकाराच्या गाठीसाठी हे वापरता येत नाही.

पसरलेला पित्ताशय कॅन्सर :

अशा रुग्णांमध्ये शारीरिक सशक्तपणाचा अंदाज घेऊन, उपचार सहन करू शकत असल्यास केमोथेरपीचे उपचार दिले जातात. रोग पसरलेला असल्यास अनेकदा रुग्णाची प्रकृती खालावलेली असते. अशा वेळी रुग्णाला केवळ त्रास होऊ नये म्हणून फक्त पॅलिएटिव उपचार करावेत.

 

 

डॉ. दिलीप निकम,

विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.

कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई

docnik128@yahoo.com

 

Similar News