स्वनियंत्रण, नियोजन, सर्जनशीलता, भावभावना, तर्क मांडणे, विचार करणे व अर्थ लावणे हे मानवास शक्य आहे याचे कारण मेंदूचा मोठा आकार व त्याचा सर्वांगीण झालेला विकास हे होय. मेंदूचे साधारणपणे दीड किलो वजन असून येथून संपूर्ण शरीराचे नियंत्रण केले जाते. मज्जासंस्थेमध्ये मेंदू व स्पायनल कॉर्ड असे दोन भाग असून मेंदूचे फोर, मिड, व हाईन्ड असे तीन उपप्रकार पडतात तसेच व्हाईट म्याटर, ग्रे म्याटर आणि असंख्य न्युरोनचे जाळे विणलेले असते.
मेंदूचा (Brain) कॅन्सर
दरवर्षी भारतामध्ये दर १ लाख लोकांमध्ये २ रुग्ण या रोगाने पिडीत होतात. तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात असणारा रोग अग्रेसिव असून त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांमध्ये ग्लायोमा व मेडूलोब्लास्टोमा तर माणसांमध्ये ग्लायोमा प्रकार आढळतो. कॅन्सरचा उगम मेंदूच्या ज्या भागातून झाला आहे त्यानुसार या रोगाची लक्षणे बदलतात. तसेच रोग बरा होणे हे ठीकाण, पाथोलोजीचा प्रकार, शस्त्रक्रिया करून रोग संपूर्णपणे काढला की नाही, जनुकीय बदलाव, वय व शारीरिक क्षमता इत्यादीवर अवलंबून असते.
मेंदूचा कॅन्सर होण्याची कायकारणे आहेत ?
वैद्यकीय शास्त्रामध्ये कमालीची प्रगती झालेली असताना देखील मेंदूचा कॅन्सर नेमका कश्यामुळे होतो याचा अजूनतरी उलगडा झालेला नाही. मोबाईल फोन, टॉवर्स, विद्युत वाहिन्या टॉवर्स, विषाणू यांमुळे मेंदूचा कॅन्सर होतो असा समज असला तरी तूर्त ते सप्रमाण सिद्ध झालेले नाही. पूर्वी रेडीओथेरपीचे उपचार मिळाले असल्यास मेंदूचा कॅन्सर होऊ शकतो परंतू ते प्रमाण अगदीच नगण्य आहे. Neurofibromaअनुवांशिक सिन्ड्रोममध्ये मेंदूचा कॅन्सर आढळतो. भारतात काश्मीरमधील ऑर्किड शेतकरी/कामगार यांच्यामध्ये या कॅन्सरचे प्रमाण जास्त आढळून आले आहे.
मेंदूच्या कॅन्सरची लक्षणे व तपासणी :-
कॅन्सरच्या उगमचे ठीकाण, आकार आणि रोगाच्या प्रकारानुसार या रोगाची वेगवेगळी लक्षणे असू शकतात.
- डोकं दुखणे.
- चक्कर येणे/ गरगरणे.
- उल्टी येणे.
- अंधारी येणे/ कमी किंवा डबल दिसणे.
- फिट्स येणे.
- तोल जाणे/ पक्षघाताचा झटका येणे.
- शरीरावरील नियंत्रण सुटणे.
- ऐकू न येणे/ बोलता न येणे.
- मानसिक आजाराची लक्षणे आढळणे.
तपासणी :- रक्त तपासणी, छातीचा एक्सरे, एम.आर.आय. स्कॅन व स्पेक्ट्रोस्कोपी करावी किंवा आर्थिक दृष्टया परवडत नसेल तर कमीत कमी सी.टी. स्कॅन करावा. मेंदूमध्ये अत्यंत कठीण ठिकाणी रोग असल्यास प्रत्येक वेळी तुकडा कडून तपास करणे शक्य होत नाही. अश्यावेळी शस्त्रक्रिया करून संपूर्ण रोग काढावा. ते शक्य नसल्यास जास्तीत जास्त रोग काढण्यास प्राधान्य दयावे.
मेंदूच्या कॅन्सरचे उपचार कसे करावे?
मेंदूच्या कॅन्सरचे खालील प्रमाणे उप प्रकार आहेत.
- ग्लायोमा
- मिनीनजीओमा
- श्वानोमा
- मेडूलोब्लास्टोम
- पिटुटरी अडीनोमा
या सर्वांचे उपचार या लेखात मांडणे शक्य नसल्या कारणाने केवळ महत्वाचे कॅन्सर आपण पाहूयात.
मिनीनजीओमा
मेंदू व स्पायनल कॉर्ड यांना तीन प्रकारच्या आवरणांनी संरक्षित केलेले असते. त्यांना मिनिन्जेस असे म्हणतात. त्यापासून होणाऱ्या गाठींना मिनीनजीओमा असे संबोधले जाते. ९० टक्के रुग्णांमध्ये या गाठी असून केवळ ५ ते १० टक्केच त्या कॅन्सरमध्ये परावर्तीत होतात. एकूणच अतिशय संथपणे वाढणाऱ्या या गाठी असून स्त्रियांमध्ये या जास्त प्रमाणात आढळतात. गाठी छोट्या असल्यास किंवा काही त्रास नसल्यास केवळ निरीक्षण केले जाते, गाठ मोठी असल्यास शस्त्रक्रिया करून काढली जाते. शस्त्रक्रिया केल्यानंतर गाठीचा काही अंश मेंदूत राहिल्यास किंवा कॅन्सरमध्ये परावर्तीत झाल्यास रेडीओथेरपीचे उपचार केले जातात.
मेंदूमधील सर्वात कॉमन कॅन्सर असून असट्रोसायट या पेशींपासून होतो. पाथोलोजीच्या प्रकार याचे चार ग्रेड पडतात, पहिला व दुसरा ग्रेड संथपणे वाढणारे रोग असून उपचारांती हे बरे होऊ शकतात. ग्रेड तीन ला अनाप्लास्टीक व ग्रेड चार ला ग्लायोब्लास्टोमा मल्टीफोर्मी असे संबोधले जात असून हे दोन प्रकार अतिशय अग्रेसिव म्हणून ओळखले जातात.
पहिला व दुसरा ग्रेड असट्रोसायटोमा शस्त्रक्रिया करून संपूर्ण रोग काढण्यास प्राधान्य दिले जाते. काही वेळा हा रोग देखील परतू शकतो किंवा हाय ग्रेडमध्ये परावर्तीत होऊ शकतो त्यामुळे रुग्णाला निगराणी खाली ठेवले जाते.
अनाप्लास्टीक व ग्लायोब्लास्टोमा मल्टीफोर्मी
या रोगामध्ये शक्य असल्यास सर्व रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करून रोग संपूर्णपणे काढला जातो. काही वेळा रोगपूर्ण काढणे शक्य नसल्यास जमेल तेवढा रोग काढण्यास प्राधान्य दयावे. शस्त्रक्रियेची जखम भरल्यास म्हणजे साधारणपणे एक दीड महिन्यांनी रेडीओथेरपी व सोबतmozolamide किमोथेरपीचे उपचार चालू करावेत. ही गोळी रेडीओथेरपीचे उपचार चालू असेपर्यंत (साधारणपणे सहाआठवडे) एक ही दिवस न चूकता दररोज (शनिवार रविवार सुद्धा) दिली जाते. रेडीओथेरपीचे उपचार संपल्यानंतर temozolamideकेमोथेरपीचे उपचार सहा महिन्यांपर्यंत दिले जातात.
रेडीओथेरपीमध्ये जास्तीत जास्त रेडीएशन रोगास व कमीत कमी रेडीएशन बाजूंच्या महत्वाच्या अवयवांना ठेवून त्यांच्याशी संबंधित दुष्परिणाम कमी ठेवण्या साठीकिमान ३डी- सी.आर.टी किंवा एम.आर.टी. उपचार पध्दती अनुसरावी. रेडीओथेरपी साधारणपणे दररोज, आठवड्यातून पाच वेळा असे दीड महिन्यापर्यंत दिली जाते. उपचार चालू असताना मळमळ होणे, उल्टी होणे, तोंडाला छाले येणे, भूक न लागणे, जुलाब होणे, केस जाणे, रक्त कमी होणे, इन्फेक्शन होणे, इत्यादी दुष्परिणाम होऊ शकतात. उपचार झाल्यानंतर फिजिओथेरपीचे व्यायाम अत्यंत जरुरी असतात.
डॉ. दिलीप निकम,
विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.
कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई
docnik128@yahoo.com