Fact Check: मौलाना आझाद अरबी होते का?

Update: 2020-09-29 04:24 GMT

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे एक पत्रकार असून ते प्रामुख्याने त्यांच्या कडव्या हिंदुत्वाच्या प्रचारासाठी अत्यंत आक्रमक भाषेत मांडणी करणारे व्हिडीओ प्रसारित करण्यासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. प्रचाराचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे तद्दन खोट्या गोष्टी बिनदिक्कत खऱ्या म्हणून पसरवीत राहायच्या आणि दुसरा म्हणजे काही खऱ्या आणि काही खोट्या गोष्टींची बेमालूम सरमिसळ करून बुद्धिभेद करायचा!. पहिल्या प्रकारात समाजमाध्यमात खोट्या नावाने अकाउंट तयार करून भडक आणि खोट्या गोष्टी पसरविण्यात येतात. दुसऱ्या प्रकारात मात्र, प्रतिष्ठित लोक लोकांसमोर येऊन अर्धसत्ये घेऊन त्या आधारे खोट्या गोष्टी पसरवितात.

याच पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी "अरबी घुसपैठिया था पहला शिक्षामंत्री- मौलाना अबुल कलाम" या शीर्षकाखाली काँग्रेसचे स्वातंत्र्यपूर्व काळातील एक प्रमुख नेते आणि अकरा वर्षे भारताचे शिक्षणमंत्री असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याबाबत एक व्हिडीओ युट्युबवर प्रसारित केला आहे. त्याबद्दल थोडेसे!

( सौजन्य Sach Tak )

Full View

कुलश्रेष्ठ सुरवातीलाच सांगतात की मौलाना आझाद हे त्यांचे नावच नव्हते. त्यांचे खरे नाव होते सय्यद गुलाम मैनुद्दीन अहमद बिन खैरुद्दीन अल हुसैनी आणि त्यांचे वडील मक्केत आणि आई मदिनेत राहणारी होती व या भारताच्या पहिल्या शिक्षणमंत्र्यांचा जन्मच मुळी १८८८ साली मक्केत झाला होता. तसेच त्यांचे भारतात कोणी नातेवाईकही नव्हते व ते भारतात पहिल्यांदा १९०२ मध्ये आले.

हे सगळे सत्य आणि असत्य याच्या सीमारेषेवरील कथन आहे. पहिली गोष्ट तर ही की, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आझादांचे नाव अशा प्रकारे सांगतात. जणू काही ते ओसामा बिन लादेन वगैरेचे नाव आहे. मौलाना आझादांचा जन्म अकबर बादशहाच्या काळापासून धर्मगुरू म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतातील एका प्रसिद्ध घराण्यात झाला होता आणि त्यामुळे अशी पदव्या असणारी नावे ठेवली जात असतं.

अर्धवट सत्याचा वापर करून दिशाभूल करणारी दुसरी गोष्ट म्हणजे मौलाना आझाद यांचे वडील मक्केचे होते व आई मदिनेची होती. हे सांगण्याचा आविर्भाव असा की जणू काही मौलाना आझाद हे भारतीय नसून अरब होते. आणि ते १९०२ मध्ये भारतात येऊन नंतर ते काँग्रेसचे मोठे नेते झाले. व्हिडीओचे शीर्षकही तेच दर्शविते.

वस्तुस्थिती ही आहे की मौलाना आझाद यांचे पूर्वज हे भारतीयच होते आणि बंगालमध्ये ते धर्मगुरू म्हणून काम करीत. आझादांचे वडील मौलाना खैरुद्दीन हे त्या काळातील प्रसिद्ध इमाम होते आणि त्यांचा १८५७ च्या इंग्रजांविरुद्धच्या बंडात सहभाग होता. ते बंड फसल्यावर त्यात सहभागी असणाऱ्या सर्वांच्या इंग्रजांनी कत्तली सुरु केल्या होत्या, म्हणून मौलाना खैरुद्दीन हे मक्केला निघून गेले आणि तिथे स्थायिक झाले. म्हणजे मौलाना आझाद यांचे वडील एक स्वातंत्र्यसैनिक होते. हे न सांगता कुलश्रेष्ठ ते मक्केचेच रहिवासी होते असे भासवतात.

मक्केत स्थायिक असल्याने त्याचा विवाह मदिना इथल्या कुटुंबातील एका मुलीशी झाला आणि मौलाना आझाद यांचा जन्म मक्केत झाला. इंग्रजांशी दिलेल्या लढ्यानंतर मक्केला वडील गेल्यामुळे तिथे जन्म झाला म्हणून मौलाना आझाद अरब कसे ठरतात? या पुढे कुलश्रेष्ठ म्हणतात की, आज आपण आपले मंत्री हे सुशिक्षित असावेत आणि त्यांना काही ज्ञान असावे असे मानतो. परंतु मी जगातील सगळी पुस्तके शोधून पाहिली तरी मौलाना आझाद कोणत्याही शाळेत, महाविद्यालयात किंवा विद्यापीठात गेले होते असे मला दिसले नाही. पुढे ते म्हणतात की आझाद हे मदरशात शिकले आणि अशा या माणसाला तत्कालीन विद्वान लोकांनी (म्हणजे नेहरूंनी) भारताचा प्रथम शिक्षणमंत्री म्हणून ११ वर्षे नेमले होते. आता यावरून आपला काय समज होईल? हाच होईल की आझाद हे जवळपास अशिक्षित गृहस्थ होते. ही गोष्ट अर्धसत्य देखील नाही, तर धादांत खोटी आहे आणि ती बिनदिक्कत कुलश्रेष्ठ सांगतात.

यातील सत्य गोष्ट ही की मौलाना आझाद यांचे शिक्षण आधुनिक पद्धतीच्या शाळेत झाले नाही. पण ज्या घराण्यात मौलानांचा जन्म झाला होता. त्या घराण्यात विसावे शतक लागण्यापूर्वी आणि ते ही मक्केत आधुनिक शिक्षण मिळण्याची शक्यताच नव्हती. आझाद यांचे शिक्षण विविध विषयातील खासगी शिक्षक घरी येऊन झाले. आणि ते मुस्लिम धर्मशास्त्र, गणित, तत्वज्ञान, जागतिक इतिहास, विज्ञान यात पारंगत झाले. त्यांच्या बुद्धीचा आवाका एवढा प्रचंड होता की, वयाच्या केवळ बाराव्या वर्षी त्यांनी ग्रंथालय सुरु केले आणि चर्चासत्रे आयोजित करण्यासाठी संस्था स्थापन केली.

वयाच्या पंधराव्या वर्षी तर ते आपल्या दुप्पट वयाच्या विद्यार्थ्यांना शिकवीत असत. वयाच्या बाराव्या वर्षापासूनच त्यांनी साप्ताहिकांमध्ये विद्वत्तापूर्ण लेख लिहायला सुरवात केली आणि चवदाव्या वर्षी स्वतःचे मासिक काढले, जे अत्यंत लोकप्रिय झाले होते. त्यांच्या प्रचंड बुद्धिमत्तेबद्दल प्रा. नरहर कुरुंदकर यांनी "शिवरात्र" या पुस्तकात लिहिले आहे की "लोकविलक्षण बुद्धिमत्ता आणि मुस्लिम धर्मशास्त्रातील पांडित्य यामुळे मौलाना आझाद हे बालपणातच सर्व अरबस्थानमध्ये ख्यातनाम पंडित म्हणून मानले जाऊ लागले, मक्केतील मुल्ला-मौलवींनी त्यांचा सत्कार करून त्यांना "अबुल कलाम'' म्हणजे "विद्यावाचस्पती'' ही पदवी त्यांना दिली. त्यावेळी त्यांचे वय केवळ अठरा वर्षांचे होते. जर हाच क्रम चालू राहिला तर मौलाना अरबस्तानातच राहिले असते आणि मुस्लिम धर्मशास्त्राचे जगद्विख्यात पंडित म्ह्णून सर्व जगभरच्या मुसलमानांनी त्यांचा गौरव केला असता."

महात्मा गांधी यांनी तर त्यांच्या बुद्धीची तुलना प्लेटो, ऍरिस्टोटल आणि पायथागोरस यांच्याशी केली होती. अशी ही व्यक्ती एक अडाणी किंवा निरक्षर होती असे भासविणे याला काय म्हणावे? याच व्हिडिओत कुलश्रेष्ठ पुढे असेही म्हणतात की, मौलाना आझाद यांचा स्वातंत्र्याच्या चळवळीशी काहीही संबंध नव्हता. आता यापेक्षा जास्त असत्य काय असणार? १९०५ ते १९४७ या संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यात मौलाना आझाद यांचे मोठे योगदान होते. १९०५ ला ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली. म्हणून जे आंदोलन झाले. त्यात अरविंद घोष यांच्याबरोबर ते क्रांतिकारक चळवळीत सहभागी झाले होते.

महम्मद अली जिना यांच्या मुस्लिम लीगच्या विरोधात आझाद यांनी कायम भूमिका घेऊन मुस्लिमांसाठीच्या विभक्त मतदारसंघांना विरोध केला आणि सगळ्या मुस्लिम नेत्यांचा रोष ओढवून घेतला. हे विभक्त मतदारसंघ लोकमान्य टिळक यांनी लीगबरोबर केलेल्या लखनौ करारानुसार देण्यात आले होते आणि मुस्लिम समाजात विभक्तपणाची भावना व भारताच्या फाळणीची बीजे या लखनौ करारात होती हे सर्वमान्य आहे.

मौलाना आझाद यांच्या लेखणीचा प्रभाव इतका होता की, त्यांच्या नियतकालिकातील लेख वाचून या तरुण संपादकाला भेटायला खान अब्दुल गफार खान हे वायव्य सरहद्द प्रांतातून उंटावरून आणि पायी असा प्रवास करत लाहोर तुरुंगात गेले होते. व त्यांच्या प्रभावाखाली येऊन स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले व पुढे सरहद्द गांधी म्हणून प्रसिद्ध झाले. वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी आझाद हे १९२३ साली अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

यानंतरही १९३९ ते १९४६ एवढा प्रदीर्घ कालावधी ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. या कालावधी स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने सर्वाधिक तीव्र आंदोलनाचा होता. असहकार चळवळ, भारत छोडो आंदोलन या सर्व आंदोलनात आझाद यांनी देशभर फिरून सहभाग घेतला होता आणि त्यामुळे त्यांना दीर्घ कालावधी तुरुंगात घालवावा लागला होता.

त्याशिवाय १९४० ते १९४७ या ज्वलंत कालखंडात काँग्रेसमधील मुस्लिमांचे नेते म्हणून त्यांनी मुस्लिम लीगच्या धर्मांध राजकारणाला कडाडून विरोध केला आणि त्यामुळे पाकिस्तानचे जनक म्हणून नंतर ओळखले गेलेले जिना त्यांना पाकिस्तानच्या मार्गातील काटा समजून त्यांचा आत्यंतिक द्वेष करीत. अशा या स्वातंत्र्य सेनानीबद्दल कुलश्रेष्ठ म्हणतात की…

"भारत के फ्रिडम मुव्हमेंट से उनका लेना देना नही था". आणि हे कोण म्हणतंय? तर ते, ज्यांच्या वैचारिक पूर्वजांचा स्वातंत्रलढ्याशी काहीही संबंध नव्हता व ज्यांच्या पूर्वजांनी जिना यांच्या मुस्लिम लीगबरोबर पंजाब आणि बंगाल इथे संयुक्त मंत्रिमंडळे स्थापन करून १९४२ ची चळवळ कशी मोडून काढता येईल. याबाबत इंग्रजांशी पत्रव्यवहार केला होता. समाजमाध्यमांच्या या आभासी जगात इतिहासाचा विपर्यास किती करायचा याला काहीही मर्यादा राहिलेली नाही हेच खरे!

 

Similar News