Nanded Rain | नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार ,जनजीवन विस्कळीत, नदी-नाल्यांना पूर
नांदेड - गेल्या २४ तासापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून किनवट, बिलोली, भोकर, मुखेड या तालुक्यातील जवळपास ७ विभागात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात २४ तासात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच सरासरी ८९१ मिमी इतक्या पावसाची नोंद झालीय. सकाळपासून सुरू असलेल्या या संततधार पावसाची शहरात १९२ मिमी इतकी नोंद झालीय.
तर अर्धापुर तालुक्यातील लहान या गावात जिल्हा परिषद शाळेला पूर्ण पाण्याने वेढा घातलाय. यात मोटारगाड्यांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात किनवट तालुक्यातील किनवट ते मांडवी रस्त्यावरील एका नाल्याच्या जोरदार पाण्याच्या प्रवाहात एक जण वाहून गेल्याची घटना घडली आहे तर
मुखेड तालुक्यातील राजुरा बु. येथील प्रदीप बोयाळे हा २५ वर्षीय तरुण शेळ्या चारण्यासाठी शेतात गेला असता राजुरा ते औराळमध्ये असणाऱ्या राजुरा (बु) लगत असलेल्या नाल्याला पूर आल्यामुळे वाहून गेला. त्याचा मृतदेह 2 किलोमीटर अंतरावर सापडलाय..
अर्धापुर तालुक्यातील शेलगाव,पिंपळगाव या गावात जवळच असलेल्या आसना नदीचे पूर्ण पाणी शिरले असून गावातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. किनवट तालुक्यातील सिंगारवाडी व सुंगागुंडा गावालगत असलेल्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे दोन्हीही गावांचा संपर्क तुटला आहे. दुधगाव या गावातील घरे पाण्याखाली गेली आहेत. किनवट येथील सुवर्णा धरणाच्या बॅकवॉटरमुळे अप्पाराव पेठच्या काही घरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे तेलंगाणा प्रशासनाशी संपर्क साधून सुवर्णा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी येथील ६० ते ७० घरांचे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात झालेल्या पावसामुळे हाहाकार माजलाय..
जिल्ह्यात आठवड्यात झालेल्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाची पाणी पातळी वाढलीये.. राज्यात तब्बल महिनाभर उशिरा सुरु झालेल्या पावसामुळे नांदेडकरांच्या चिंता वाढल्या होत्या.. मात्र आता विष्णुपुरी प्रकल्पाची पाणी पातळी ४६ दलघमी इतकी आहे.. सध्या काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पाची पाणी पातळी ३५३.५५ मीटर इतकी वाढली आहे.
या सर्व परिस्थितीत कुणीही अनावश्यक स्थितीत गर्दी करू नये ,पुलावरून पाणी जात असेल तर गाडी चालविण्याचे धाडस करू नये. स्वतःच्या जीवाची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.