मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात पत्नीची पोलिसात तक्रार
नवी मुंबईचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर राजकिय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे.;
नवी मुंबई : नवी मुंबईचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. गजानन काळे यांच्या पत्नीने पती गजानन काळे हे मानसिक आणि शारिरीक छळ करत असून जातीवाचक शिवीगाळ करत असल्याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सोबतच गजानन काळे गेल्या काही वर्षांपासून आपल्याला मारहाण करत असल्याचा देखील आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
काळे यांचे अनेक महिलांशी संबंध असून त्यावरून ते आपल्यावर घरात अन्याय करत असल्याचे त्यांच्या पत्नीने दिलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. गजानन काळे यांचे २००८ साली लग्न झालं. लग्नाच्या १५ दिवसांनंतरच गजानन काळे हे किरकोळ कारणांवरुन आपल्याशी वाद घाऊ लागल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. शिवाय त्यांच्याकडून आपल्याला जात आणि सावळ्या रंगावरुन ठोमणे मारले जात असल्याचे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे.
गजानन यांचे विवाहबाह्य संबंध होते. त्यांना येणाऱ्या फोन व मेसेजवरुन ही गोष्ट आपल्याला लक्षात आली, याबाबत आपण त्यांना वेळोवेळी समजावून सांगितले मात्र, ते माझ्या काही पत्रकार मैत्रिणी आहेत, तू यात लक्ष घालू नकोस, असं सांगून माझ्यासोबत वाद घालायचे, असं त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान याबाबत मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
गजानन काळे यांच्या पत्नीने 'माझ्या मुलाच्या हक्कासाठी मी हा निर्णय घेतला असून हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.' असं म्हटलं आहे. १३ वर्ष मी संसार केला. मात्र, या कालावधीत मी प्रचंड मानसिक, शाररिक त्रास सहन केला. त्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी म्हटलं आहे.