सिंधुदुर्ग महावितरणच्या अनागोंदी कारभाराच्या अनेक तक्रारीनंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी सकाळी अकरा वाजेपर्यंत 35 कर्मचाऱ्यांपैकी फक्त एकच कर्मचारी उपस्थित असल्याचं निदर्शनास आले तर यावेळी मस्टर तपासले असता मागील काही दिवसाचे रेकॉर्ड कोरे असल्याचे निदर्शनास आल्याने.राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्य अधिक्षक अभियंता पाटील यांना जाब विचारला.
गणेशोत्सवाच्या तोंडावर कार्यालयात कर्मचारीच उपस्थित नसतील तर नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष कोण देणार त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा तसेच प्रलंबित मिटरची जोडणी येत्या तीन दिवसात करा अशी मागणी यावेळी करण्यात आली, तसेच महावितरण कार्यालयात पुन्हा वेळेत कर्मचारी उपस्थित नसल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला आहे.
यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.आंदोलकांनी महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी देखील केली.