ते लोक दौरा अधिकार्यांना पाहण्यासाठी करतात का?' ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोधकांना सवाल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पूरग्रस्त भागाचा दौऱ्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलतांना सरसंधान साधलं आहे.;
कोकणातील रत्नागिरी आणि रायगड येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूर आणि भुस्खलन यांमुळे हाहाकार माजला होता. तेथील परीस्थितीची पाहणी करण्यासाठी आधी मुख्यमंत्री आणि नंतर विरोधकांनी दौरे केले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता पुण्यात पत्रकारांशी बोलताना जोरदार सरसंधान साधलं आहे. महाराष्ट्रात याआधी कोणत्याही नेत्याने राज्याच्या प्रमुख पदावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केलेला नाही.ती आपली संस्कृती नाही. मुख्यमंत्री हे राज्याचे सर्वोच्च पद आहे, त्याबाबत बोलतांना सर्वांनी विचारपुर्वक बोललं पाहीजे असं पवार म्हणाले.
अधिकाऱ्यांना त्यांची कामं करू द्या
दरम्यान राजकीय नेत्यांच्या पूरग्रस्तभागाच्या दौऱ्याबाबत बोलतांना अजित पवार म्हणाले की, "प्रत्येकाला घटनास्थळी जाण्याचा अधिकार आहे, मात्र व्हीआयपी व्यक्तींनी कलेक्टर पाहिजे, अधिकारी पाहिजे असा आग्रह धरू नये. ते लोक दौरा अधिकार्यांना पाहण्यासाठी करतात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपला दौरा संपल्यानंतर काही सुचना असेल तर अधिकारी जिथे आहेत तिथे जाऊन त्यांना सुचना करा. त्यांना त्यांचे कामं करू द्या असं पवार म्हणाले आहेत. नेत्यांना दौरा करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आम्ही आता एक नोडल ऑफिसर ठेवला आहे." इतर अधिकाऱ्यांना त्यांचं काम करू द्या असं पवार यांनी म्हटलं आहे.
पूरग्रस्तांना तातडीने मदत करा
तातडीने पूरग्रस्तांना मदत मिळण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. काही भागात आजही पाणी आहे, त्यामुळे तिथले पंचनामे बाकी आहेत. ते पाणी ओसरलं की तातडीने पंचनामे केले जातील. तसा निर्णय काल मंत्रीमंडळाने घेतला असल्याचं ते यावेळी म्हणाले.
नुकसानीचा अहवाल केंद्राला पाठवणार
पूरग्रस्त भागातील नुकसानीचा अजूनही अंदाज सांगता येत नाही त्यात हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच तज्ज्ञांची समिती नेमून भूगर्भात काही बदल होतायत का याचा अभ्यास करण्याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाली. शिवाय हे फक्त आपल्याच राज्यात घडतंय असं नाही, उत्तराखंडला देखील घडलं आहे. महापूर २०२१ च्या नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करून तो केंद्राला पाठवला जाईल. केंद्राने गुजरातला १ हजार कोटी तातडीने जाहीर केले त्याप्रमाणे महाराष्ट्राला देखील ते मदत जाहीर करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
७०० कोटींची मदत २०२० मधील पुरग्रस्तांसाठीची
केंद्राने पाठवलेली ७०० कोटींची मदत ही २०२० मध्ये आलेल्या पुरातील बाधितांची आहे, त्याचा सध्याच्या पूराशी दुरान्वयेही संबंध नाही. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. २०२० च्या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने केंद्राकडे ३७०० कोटींची मदत मागीतली होती. मात्र, केंद्राने केवळ ७०० कोटींची मदत पाठवली असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील सुखरूप
"जयंत पाटील हे सुखरूप आहेत. थोड्यावेळात त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं जाईल. त्यांच्यासाठी सर्व यंत्रणा तत्परतेने कामाला लावलेली आहे.", जयंत पाटील यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले.