Home > मॅक्स ब्लॉग्ज > सुशील कुमारचे 'अ' सुशील कांड!

सुशील कुमारचे 'अ' सुशील कांड!

काय आहे पैलवान सागर धनखड प्रकरण? कुस्तीगीरांचा आयडॉल आणि भारताला ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारा पैलवानाला दिल्ली पोलिसांनी का अटक केली? पैलवान हिंसा, गुन्हेगारीकडे का वळतात? कुस्ती, तालीम सुटल्यानंतर पैलवानाचं आणि कुस्ती क्षेत्राचं भवितव्य काय असतं? राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी पैलवानांचं शोषण करतायेत का? जाणून घेण्यासाठी वाचा 15 वर्ष कुस्तीपट्टू राहिलेल्या मतीन शेख यांचा वस्तुस्थिती सांगणारा लेख...

सुशील कुमारचे अ सुशील कांड!
X

भारताला दोन ऑलिम्पिकची पदकं त्याने अपार लढून आणली. देशातल्या प्रत्येक कुस्तीगीराचा तो आयडॉल ठरला. तसा माझा ही होता; काही एक वर्ष. होय, सुशील कुमार बद्दल बोलतोय मी. ज्याला देशानं बक्षिसानं मडवलं. सरकारनं मान, सन्मानाने पुरस्कार दिले. आज त्याच सुशील कुमारवर बक्षिस लावलं गेलं. कुणी ? तर दिल्ली पोलिसांनी का ? तर एका ज्युनिअर मल्लांच्या हत्येचा त्यावर आरोप आहे. अन् तो गेल्या वीस दिवसांपासून फरार होता. दिल्ली पोलिस त्याच्या मागावर होते. तो परदेशी पळून जाऊ नये म्हणून त्याचं पासपोर्ट ही गोठवलं गेलं. त्याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बक्षिस जाहीर केलं. किती मोठ्ठं हे दुर्दैव अन् नामुष्की म्हणावी लागेल.

या घटनेनं मी हादरलो, मला धक्का बसला असं काय घडलं नाही. कारण हे कधी ना कधी घडणारचं होतं. सुशीलचं अती त्याला भोवणार होतच. जागतिक कुस्ती दिवसानिमित्त अनेकांचे शुभेच्छांचे मेसेज येत होते. तोवर बंदुकधाऱ्या पोलिसांच्या गराड्यात टॉवेलने तोंड झाकून ताब्यात घेतलेला सुशील कुमार दिसला. अन् लाजिरवाणं वाटलं. संताप ही वाटला. कुस्तीनं बळ, मान, सन्मान ऐश्वर्य दिलं अन् त्याने त्याची माती केली. सुशीलच्या खेळाबद्दल,त्याच्या गुणवत्तेबाबत शंका नाहीच मुळी. त्याची खेळातली आक्रमकता, बचावात्मकता त्याची डावबाजी अन् कित्येक वर्षे त्याचं खेळातलं सातत्य या जोरावरच त्यानं सर्व यश आपलसं केलं. बाकी सतपाल सारख्या खूप जाणत्या वस्तादाचा तो पठ्ठा.



त्यांनी त्याला जावई ही करुन घेतला. सतपालांनी सुशीलला मनगटाने घडवलं खरं पण आदर्श मुल्यांची सक्ती मात्र त्यांनी अलिकडे सैल केली. आणि इथेच सुरु झाला वर्चस्वशाली, दबंग, धतींग करणाऱ्या सुशील कुमारचा प्रवास. अलीकडच्या दशकात आपल्याला माध्यमाद्वारे दिसणारा शांत, आदर्श, नम्र, स्वज्वळ सुशील कुमार नव्हताच मुळी. छत्रसाल स्टेडीयमवर आपलं वर्चस्व, सत्ता राहावी या उद्देशाने त्यांने परिसरात कायम आपला दरारा ठेवला. पूर्वी गरीब, शांत, नम्र असणारा सुशील पुढे बदलत गेला. त्याला संगत ही तिथे तशी मिळाली. अनेकांना, अगदी तिथे सरावाला असणाऱ्या मल्लांना ही त्याने पिस्तुलने धमकावलं आहे. त्याच्या या सर्व वागण्याला गुरु, सासरे यांची मुकसंमती होतीच म्हणा; तरीच तो या वर्चस्वशाली भूमिकेत वावरत आला. शेवटी याच वागण्यातून त्याच्या कडून हा गुन्हा घडला असावा.

सतपालचं मार्गदर्शन मिळेल. सुशील कुमार ही तिथेच प्रशिक्षण देतोय या जमेच्या गोष्टींसाठी महाराष्ट्रातील अनेक युवा मल्लांनी या काही वर्षात दिल्लीचं छत्रसाल स्टेडीयम गाठलं पण त्यांना तिथे कायम दुय्यम अन् दबावाखालील वागणूक मिळालेली उदाहरणे आहेत. त्यांनी नेहमी महाराष्ट्राचा मल्ल अन्यायी भूमिकेने वागवला. नरसिंग यादववर डोपिंग मध्ये अडकवलं. कशा पद्धतीने अन्याय केला गेला हे सर्वांना ठावुकच आहे.

सुशीलचे गुरु आणि सासरे या 'सतपाल' नावाच्या गृहस्थाला महाराष्ट्राने खूप प्रेम, मान, सन्मान, धन ही दिलं. कारण महाराष्ट्राच्या कुस्तीशौकींनांनी चांगल्या मल्लांची नेहमी कदर केली. अगदी पाकिस्तानच्या मल्लांना देखील मोठ्ठा मनाने सांभाळणारी माणसं महाराष्ट्रात आहेत. पण उत्तर भारताने राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय नियोजनाच्या कुस्तीवर आपलं वर्चस्व ठेवत महाराष्ट्राच्या अनेक गुणवंत मल्लांवर अन्याय केला याची ताजी उदाहरणे आहे. सतपालच्या कुस्तीचा आदर्श समोर ठेवून महाराष्ट्रातील अनेक बापांनी आपल्या पोरांचं नाव 'सतपाल' असं ठेवलं. का तर हा पोरगा पण तसाच मोठ्ठा पैलवान घडावा. पण सतपाल नावाची कपटी वृत्ती महाराष्ट्राला नेहमी मारक ठरली.

पैलवान अशा हिसेंकडे, गुन्ह्याकडे का वळतात? तर यामागे मानसशास्त्रीय, आर्थिक तसेच राजकीय कारणं दडली आहेत. पैलवान गुंडगिरी करतात. ते उर्मट असतात. मंद बुध्दी असतात. असे अनेक आरोप सामान्यांकडून केले जातात. आता सुशिलने केलेल्या कांडमुळे या प्रश्नांना अधिकच फुंकर घातली जातेय.

पण प्रथम हे क्षेत्र समजून घेणं गरजेचं आहे. 'कुस्ती' हा कष्ट अन् बळावर आधारलेला खेळ. मग या खेळाला बुद्धीची गरज नाही का? तर असं मुळीच नाही. जो चाणाक्ष अन् बुद्धीमान तोच खरा पैलवान. पैलवान हा एकमेव प्राणी आहे जो विजेच्या चपळाईने हालचाल करतो. मग मल्लांमध्ये आडमुठेपणाचा शिरकाव कसा होतो? तर पैलवानकीची विशिष्ट अशी आचारसंहिता आहे. तालमीच्या बाहेर न पडता फक्त कुस्ती हेच सर्वस्व माननं. याच कालखंडात त्याचा समाजाशी, अगदी कुटुंबाशी ही काही प्रमाणात बंध तुटतो. त्यात शिक्षणाचा अभाव. यामुळे त्यांची सामाजिक जडणघडण थांबते.


जेव्हा त्याची कुस्ती, तालीम सुटते तेव्हा पुढेचे काही भवितव्य उरलेले नसते. तेव्हा राजकारणी, त्याला हेरतात. स्वतःच्या फायद्यासाठी, पाठबळासाठी त्याचं पद्धतशीर शोषण करतात. पैलवान म्हणून मिळत असलेल्या माना-पानाला तो वर्चस्व समजायला लागतो अन् तिथेच त्याची वाट गंभीर गुन्ह्यांकडे वळते. पुढे सत्ता वर्चस्वाच्या वादातून शेवट ही वाईट होतो. याची उदाहरणे पश्चिम महाराष्ट्राने पाहिली आहेत.

वाळू व्यवसाय, रिअल इस्टेट, बाजारपेठा, सुरक्षा अशा अनेक ठिकाणी माजी मल्लांनी आपली ठेकेदारी सुरु केली आहे. हा व्यवसाय करताना अनेकांनी आपल्या बळाचा वापर केला आहे. हे स्पष्ट आहे. त्यांना ते भोगावं ही लागते. शेवटी कायद्या पुढे कुणीच मोठा नाही.

आता सर्वच मल्लांना या रांगेत बसवावं का? तर ते चुकीचं ठरेल. माझ्या घरातील उदाहरण माझं घरदार, माझं मामाकडचं घरदार जातीवंत पैलवानांचं घराणं. मामा अस्लम काझी यांनी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्ती क्षेत्रावर सलग बारा वर्ष अधिराज्य गाजवलं. लाखा कुस्तीप्रेमींच्या तोंडी अस्लम काझी हे नाव आहे. त्यांनी ५१ चांदीच्या गदा जिंकत एक विक्रम केला. पण मी त्यांना कधी कोणावर दादागिरी करताना पाहिलं नाही अथवा ऐकलं नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र मानतो. मी, भाऊ कित्येक वर्ष पैलवानकीत होतो. महाराष्ट्र भर फिरणं असायचं पण कुणावर हात उगारणं लांब पण कुणाला शिवी ही दिल्याचं, भांडण केल्याच आठवत नाही. मल्लविद्या ही नम्रता, नितिमत्ता, विवेक, प्रामाणिकता, कष्ट, संघर्ष शिकवते. जो व्यक्ती हे सूत्र शेवट प्रयत्न पाळतो तोच खरा पैलवान!


पैलवान ही माणूस आहे. त्याला राग, सणक आहे. सहसा तो कोणाच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करत नाही. परंतू त्याला कोणी डिवचले तर पुढे त्याचं वेगळे रुप असतं हे ही खरं आहे. भारतीय स्वातंत्र्यात पैलवानांचं योगदान मोठ्ठ राहिलं आहे. 'चले जाव' ही स्वातंत्र चळवळीला मल्लांचं खूप मोठ्ठ बळ होतं. त्यांच्या विद्रोहाची रुपे अनेक आहेत. अलीकडच्या मल्लविद्येच्या गुरुकुल पद्धतीत वस्ताद मल्ल घडवताना मनगटा बरोबर मनाची मशागत करण्यात कमी पडत आहेत. सध्या संस्कारक्षम मल्ल घडवण्याचे मोठे आव्हान आहे.

परंतु अंगातली मस्ती वाईट असते. ती कायम गुरगुरते अन् हिंसेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. जो पैलवान ती मस्ती पचवतो तोच खरा आदर्श मल्ल म्हणून समाजात वावरतो. अथवा असाच अनेकांचा सुशील कुमार होतो. बाकी सुशील कुमार आपलं सर्व राजकीय वजन वापरुन या गुन्हातून स्वतःस सोडवण्याचा प्रयत्न करेल, पण त्याच्यावर चार्ज शिट फाईल होताच. त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्यास त्याचे सर्व सन्मान, पुरस्कार काढून घ्यायला हवीत. तरच त्या हिंसेच्या वाट्याला न जाण्याचा धडा अनेकांना मिळेल.

- मतीन शेख. ९७३०१२१२४६

(लेखक- मतीन शेख, दै.सकाळ कोल्हापूर वृत्तसंस्थेत पत्रकार आहेत. पत्रकारितेत येण्यापूर्वी ते 15 वर्ष कुस्तीपट्टू राहिले आहेत.)

Updated : 27 May 2021 2:53 AM GMT
Next Story
Share it
Top