कुस्ती अन् पैलवानकी संकटात !
X
कुस्ती हा प्रचंड अंग मेहनतीचा खेळ. पैलवानाच्या शरीराची झालेली झिज भरुन काढण्याची मदार ही तो घेत असलेल्या खुराकावर असते. आमच्या आजोबांचा काळ; त्यांच्या तोंडून अनेकदा ऐकला. आंबाड्याची भाजी, मक्याची कणसं, हुरडा खावून, गुरं राखत, जमिनदारांच्यात सालगडी राहून त्यांनी पैलवानकी केली. १९७० च्या दरम्यानचा काळ. खायला भाकरी ही मिळायच्या नाहीत. मक्याच्या कण्या पाण्यात भिजवायच्या अन् त्या खायच्या. पण कुस्तीचा नाद कधी त्यांनी सोडला नाही.
वडिलांकडून आणि आईकडून दोन्ही बाजूने कुस्ती, पैलवानकी आमच्या घरात. दोन्हीकडे अशीच परिस्थिती. आज जे काही थोडं फार एैश्वर्य, सन्मान, प्रतिष्ठा आमच्या घराला मिळाली ती कुस्तीमुळे, तांबड्या मातीच्या पुण्याईने मिळाली असं म्हणता येईल. या तांबड्या मातीची उतराई होणार नाही. आज कुस्ती अन् पैलवानकी संकटात आहे. डोपिंग अन् नुरा कुस्तीने महाराष्ट्राची तांबडी माती गारद झालीय. हे कुठे तरी थांबावं, कुस्ती क्षेत्रात जनजागृती व्हावी म्हणून मला तळमळीने लिहावं लागतंय, आपल्याच पैलवान भावंडांच्या हितासाठी.
कुस्ती सम्राट आस्लम काझी (आमचे मामा) महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातीत एकेकाळचे आघाडीचे मल्ल. देश विदेशातल्या हजारो मल्लांना त्यांनी आस्मान दाखवलं. त्यांचा खुराक जवळून पाहिला, त्यांच्याकडून ऐकलाय. इंजेक्शन, गोळ्या लांबच त्यांनी कधी कुठली प्रोटीन पावडर ही घेतली नाही. त्यांचे वस्ताद विश्वास हारुगले यांची देखरेख असायची त्यांच्या खुराकावर. एक देशी कोंबडा शिजवायचा अन् फक्त एका चपाती बरोबरच तो खायचा अशी सक्ती. आठवड्यातल्या खुरकाच्या वेळापत्रकातला हा एक भाग बाकी दुध, फळे, बदाम थंडाई हे वेगळच. मेथीची भाजी ही दुधात शिजवली जायची. शेवटी हे सर्व आपल्या शिष्याला व्यवस्थित पचलय की नाही? हे पाहण्यासाठी त्याची विष्ठा चेक करणारा वस्ताद म्हणजे विश्वास हारुगले. आपले आई बाप ही इतकं लक्ष देत नाहीत तितकं वस्तादांचं लक्ष. पण अलिकडे वस्तादांशी शिष्याशी काही देणं घेणं राहिलं नाही, ना पैलवानाला वस्तादांचा आदेश पाळायचाय.
रुस्तम -ए- हिंद हरिश्चंद्र बिराजदार शाकाहारी मल्ल होते. कोल्हापुरच्या गंगावेश तालमीत असताना गिरणीत जावून स्वत: गव्हाची लापसी भरडून ते आणत. आहारात लापसी, गव्हाचा चिक घेत. खुराकात लापसी घेणारा आता एक ही पैलवान दिसणार नाही. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर यांच्या रोजच्या आहारात अर्धा किलो तूप, दोन तीन लिटर दुध, रबडी, फळं, किलोभर मटण असायचं. तितकच कष्ट करुन ते हा खुराक पचवत होते. पण अलिकडच्या दिड दशकात पैलवानांच्या देशी खुराकच लोप पावत गेला. आपला पोरगा तालमीत टाकलाय म्हणून अनेक पालक घराकडून देशी खुराक पोराला घेवून जायचे. पण आता पालकानी आपल्या मल्लाकडे दुर्लक्ष केलं. वस्तादांनीही मल्लांच्या स्वयंपाक खोलीकडे कानाडोळा केला. परिणामी पैलवान पोरांनी प्रोटीन पावडर, इंजेक्शन, गोळ्यांचा रतीबच लावून घेतला.
जागतिकीकरणानंतर भारतात बॅाडीबिल्डचं वेड वाढत गेलं. विविध ठिकाणी जीम उभारल्या गेल्या. कोचिंग सुरु झालं. सप्लिमेंटचं नवं मार्केट उभं राहिलं. अलीकडे तालमीतल्या मल्लांनी जीम जॅाईंन केल्या. आधी मल्लांना आखाड्या बाहेर जायची परवानगी नव्हती. बाहेरचं विश्व पैलवानांच्या नजरेस पडू नये, तो त्या गोष्टींना भुलू नये म्हणून वस्तादांची नजर मल्लांवर असायची. ही नजर हटली आणि पैलवान निवासी तालमींच्या बाहेर पडू लागले.
बॉडीबिल्डिंग, ॲथलेटिक्स, वेटलिफ्टिंग यासारख्या खेळात सहभागी होणारे खेळाडू शरीराची झिज भरून काढण्यासाठी व खेळाच्या चांगल्या प्रदर्शनासाठी सप्लिमेंट आणि स्टेरॉइड्सचा वापर करतात. परंतु हळूहळू हे लोण व मार्केट कुस्ती क्षेत्रात शिरत गेलं. कुस्तीत डोपिंग सुरु झालं. डोपिंगने गंभीर स्वरुप धारण केलं. खेळाडूंना प्रोटिन्स सप्लिमेंट गरजेनुसार घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. परंतु सध्या चहाच्या टपरीसारखी चौकाचौकात सप्लिमेंटची दुकानेच उघडली गेली आहेत.
न्युट्रिशिअन किंवा इतर कोणता वैद्यकीय परवाना नसणाऱ्यांनी हा उद्योग सुरू केला आहे. या प्रक्रियेत काही आपले माजी मल्ल ही आहेत. नवख्या मुलांना कमी दर्ज्याचे सप्लिमेंट जास्त किमतीत विकण्याचा तसेच चोरट्या पद्धतीने स्टेरॉइड्स पुरवण्याचा अनेकांनी धंदाच सुरू केला आहे. अगदी दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत ही साखळी काम करत आहे. खेळाडूंच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार सुरु आहे.
दिल्ली, हरियाणा, पंजाब मधील आजी माजी मल्लांनी, फार्मा एजंटनी महाराष्ट्राच्या मल्लांना कॅप्चर केले आहे. हलक्या प्रतीचे प्रोटिन पावडर, स्टेरॅाईड दुप्पट तिप्पट किमतीत महाराष्ट्रातील मल्लांना विकण्याचे काम ते करत आहेत. कुरिअरने या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात येतात. आपले माजी मल्ल जे या विषाचे विक्रेते झालेत ते हे विष आपल्याच भावंडांना विकून मोकळे होत आहेत. या साखळीवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.
स्टेरॉईड्स, स्टिम्युलंट्स, नार्कोटिक्स, डायुरेटिक्स, पेप्टाईड हार्मोन्स आणि ब्लड डोपिंग अशा प्रकारे डोपिंग खेळाडूंकडून केले जाते. इंजेक्शन, कॅप्सुल, टॅबलेट्स, पावडरच्या माध्यमातून याचे सेवन होते. सततच्या वापरामुळे खेळाडूंना याची सवय लागते. महाराष्ट्रातल्या चांगल्या जोडीतले मल्ल डोपिंगच्या आहारी गेले आहेत. तर अनेकांना साईड इफेक्टसमुळे विविध व्याधींनी ग्रासले आहे. निवासी आखाड्यात राहणारे मल्ल, वस्ताद मंडळींना समजू न देता डोपिंग करत आहेत. अनेक वस्तादांना हे माहित असुनही ते दुर्लक्ष करुन आपल्या शिष्याच्या पापात सहभागी होत आहेत. वरिष्ठ मल्ल घेत असलेली इंजेक्शने आणि औषधे हेच कुस्तीतल्या यशाचं खरं गमक आहे, असा गैरसमज करून अगदी सोळा ते अठरा वर्षातील उदयोमुख मल्ल ही याचा प्रयोग करत आहेत. ही चिंतेची बाब आहे. इंजेक्शनची सुई टोचून घेण्याची पद्धती वरिष्ठ मल्लांनी लहान मल्लांनाही शिकवली आहे.
या डोपिंग मुळे यकृत, मूत्रपिंड निकामी होण्याचा प्रचंड धोका असतो. स्टेरॅाईड्सच्या अती वापराने वंध्यत्व येत आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होणे, हृदयात ब्लॉकेज तयार होणे, लिगामेंट तुटणे तसेच डोपिंग करणाऱ्या मल्लांमध्ये दुखापतीचे प्रमाण वाढत आहे. कुस्तीपटू घेत असले स्टेरॉइड्सचे डोस घातक ठरु शकतात. डोपिंगची सवय खेळाडूच्या जीवावर ही बेतू लागली आहे. अतिरिक्त डोपिंगमुळे ह्रदयविकाराचा झटका तसेच ब्रेन हँम्रेज सारख्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. तरी ही कुस्ती क्षेत्रातले जाणकार, वस्ताद, प्रशिक्षक, मल्ल व पालक जागृत व्हायला तयार नाही. आपली पैलवान पोरं सदृढ व जिवंत हवी असतील तर सर्वांनी एकत्र येत या डोपिंगला हद्दपार केल्या शिवाय पर्यांय नाही.
तांबड्या मातीत कालवलंय डोपिंगचं विष - भाग २