दररोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतच नव्हे तर झोपण्यासाठीही उर्जेचा वापर गरजेचा बनला आहे. झोपण्यासाठी पंखा किंवा एसी सध्या गरजेचा झाला आहे. थोडक्यात, उर्जेशिवाय जीवन अशक्य बनलंय. ही उर्जा अन्न उर्जेबरोबरच टीव्ही, फोन, कंप्युटर, इंटरनेट, गाडी, मशिन्स, औद्यागिक यंत्र, अशा अनेक गोष्टींसाठी फार महत्त्वाची आहे. अनेक रूपांमध्ये ऊर्जा मानवी जीवनाची अविभाज्य भाग बनली आहे.
प्रवासासाठी ऊर्जा, उत्पादनासाठी ऊर्जा, साधन वापरासाठी ऊर्जा, रोग उपचारासाठी शस्त्रक्रियेसाठी ऊर्जा, प्रकाशासाठी ऊर्जा इथपासून ते विद्युत दाहिनीत अंत्यविधी करण्यासाठीही उर्जा गरजेची आहे. ही उर्जा वापरताना पर्यावरण संतुलन राखून उर्जेची आर्थिक दृष्ट्या किफायतशीर व मुबलक उपलब्धता असणे अभिप्रेत आहे. तर आणि तरच उर्जा वापराचे समाधानही लाभेल आणि उर्जा गरजही पूर्ण होऊन कार्य पार पडेल. यासाठीच अपारंपारिक ऊर्जास्रोतांचा विकास होणे, अपारंपरिक उर्जास्रोतांवर चालणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास होणे, त्यांचा वापर वाढणे आणि त्यांची सहज सुलभ उपलब्धता सर्वांसाठी महत्वाची आहे.
अलीकडील काळात वायू इंधनाची उपलब्धता घरगुती इंधनात महत्वाची बनत चालली आहे. परंतु, त्याची मर्यादित असल्यामुळे व हे उर्जास्रोत पुन्हा पुन्हा वापरता येत नसल्यानं उर्जा संकटाचा विचार करणे गरजेचे आहे.
जगात दगडी कोळशापासून २५%, द्रवइंधनापासून ३७% व इंधनवायू पासून २३% अशी एकूण ८५% ऊर्जा गरज भागविली जाते. त्यातून होणारे दुष्परीणाम सर्वश्रुत आहेत. जागतिक हरितगृह परिणाम घडवणाऱ्या कर्बनडाय ऑक्साईड आणि इतर वायूंपैकी ४३% कर्बनडाय ऑक्साईड कोळशाच्या ज्वलनातून, १९% वायू इंधन ज्वलनातून व २१% तेल इंधन ज्वलनातून निर्माण होतो. या तिन्ही इंधन ज्वलनातून निर्माण होणाऱ्या प्रदुषणामुळे जागतिक तापमान वाढीबरोबरच विविध प्रकारचे कर्करोग, मेंदूचे विकार, संवेदना वहन यंत्रणेचे विकार, जननदोष, फुफुसांचे रोग व श्वसनाचे विकार निर्माण होतात.
जलविद्धूत ऊर्जा, सौरऊर्जा, पवनउर्जा, भूगर्भ औष्णिक ऊर्जा, जैववायू, सागरलहारीपासूंची ऊर्जा या सर्व अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा एकत्रित वाटा फक्त १५% एवढाच आहे. परंतू, या उर्जास्रोतांपासून उर्जा निर्मिती करताना फारसे प्रदूषण होत नसल्यामुळे हे उर्जास्रोत पर्यावरणपूरक मानले जातात. जगाचा एकूण ऊर्जा वापर १९७० मध्ये जवळपास २०५ ब्रिटीश थर्मल युनिट एवढा होता. तो २००० साली ४०० पेक्षा जास्त आणि आज ५०० ब्रिटीश थर्मल युनिट इवढा वाढला आहे. जगातील बहुसंख्य देश ऊर्जा निर्मितीसाठी खनिज इंधनावरच अवलंबून आहेत. विकसित देशात दरडोई ऊर्जा गरज अधिक असते तर अविकसित देशात ती कमी असते.
जगाच्या एकूण लोकसंखेच्या ५% लोकसंख्या असलेल्या अमेरीकेची ऊर्जा गरज जागतिक ऊर्जा गरजेच्या २५% इतकी आहे. पश्चिमी युरोपीय देश जागतिक उर्जा निर्मितीमधील १५% उर्जा वापरतात. वेगाने तंत्रज्ञान व औद्योगीकरण होत असलेला चीन ९% उर्जा वापरतो. उर्वरित जगाचा एकूण उर्जा निर्मितीतील वापर केवळ ४५% आहे. भारतातील दरडोई उर्जा वापर अगदीच कमी आहे.
जगातील इंधन स्रोतांचे वितरण समसमान नसून विषम आहे. जागतिक भूगर्भ इंधन ऊर्जा स्रोतांपैकी बराचसा कोळसा अमेरिकेत व रशियातील भूगर्भात आहे. वायू इंधानापैकी ३.५% व द्रव इंधानापैकी २.४% स्रोत अमेरिकेत आहेत. चीन आपली ५०% ऊर्जा गरज आयात उर्जेतून भागवतो तर जपान ७५% उर्जेची आयात करतो. जगातील ६१% तेल इंधन साठे अखाती देशांत व त्या देशांच्या मालकीचे आहेत. दिवसेंदिवस उर्जेचा वापर जगभरात वाढत असताना ऊर्जा निर्मिती स्रोत व ऊर्जानिर्मिती साधने तितकीशी वाढताना दिसत नाहीत. त्यातून उर्जा निर्मिती स्रोत तुटवडा निर्माण झाला तर ऊर्जा कमतरतेमुळे ऊर्जा संकट निर्माण होते.
जगाच्या इतिहासात १९७३ मध्ये दखलपात्र ऊर्जा संकट प्रथमच निर्माण झाले होते. त्यावेळी, इस्राईल युद्धात अमेरिकेने सक्रीय सहभाग घेतल्यामुळे गरज वाढली असताना अरब देशांनी क्रूड तेलाच्या किमती अचानक वाढवल्या होत्या. वाढीव किंमती व कमी उपलब्धता यामुळे उर्जा संकट निर्माण झालं होतं. त्यानंतर १९७९ मध्ये उर्जा संकट निर्माण झालं होतं. सन २००८ मध्येही द्रवरूप इंधन तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे पुनर्निर्मितीक्षम उर्जास्रोत विकसित करून उर्जा संकटावर मत करणे ही काळाची गरज आहे.
प्रा.डॉ. बलभीम लक्ष्मण चव्हाण,
ऊर्जा व पर्यावरणतज्ञ