जूनमध्ये पावसाळा सुरू होणार म्हणून पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मतेवाडीमध्ये श्रमदानाला सुरूवात केली होती. त्याचवेळी परिसरातील आदिवासींनी हल्ला केल्याचा आरोप श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांनी केलाय. या हल्ल्यात नऊ ग्रामस्थ जखमी झाले असून नऊ दुचाकीही पेटवून देण्यात आल्या आहेत. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
चांदवड तालुक्यातील मतेवाडी इथल्या वनविभागाच्या हद्दीत स्थानिक ग्रामस्थांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. या स्पर्धे अंतर्गत जलसंधारणाच्या कामाला ग्रामस्थांनी सुरूवात केली होती. त्याचवेळी वनविभागाच्या हद्दीत अतिक्रमण केलेल्या सुमारे २०० आदिवासींनी श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांवर दगडफेक केल्याचा आरोप ग्रामसथांनी केलाय. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं घाबरलेल्या ग्रामस्थांनी तिथून पळ काढला. जखमी ग्रामस्थांवर चांदवड इथल्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चांदवडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय. मात्र, हल्ल्याचा आरोप असलेले आदिवासी अचानक का चिडले, याविषयी चर्चा सुरू झालीय.