प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारस पक्षांच्या गणना आणि संवर्धनसाठी गोंदिया, भंडारा आणि बालाघाट (छत्तीसगढ) या जिल्ह्यातील पक्षीमित्र एकत्र आले आहेत. महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्यातच सारस हा पक्षी आढळतो. या पक्षांच्या संवर्धनासाठी त्यांची गणना होण्याची गरज आहे. या हेतूनंच काही स्वयंसेवी संस्था, पक्षीमित्र आणि शेतकऱ्यांनी जाणिवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. सुर्योदय होण्याच्या आधीच हे सर्वजण सारस पक्षांच्या गणनेसाठी कामाला सुरूवात करतात. या तीनही जिल्ह्यातले साधारणपणे ५० ते ६० पक्षीमित्र हे शेतकऱ्यांसह गणनेच्या कामाला सुरूवात करतात. ही गणना शास्त्रोक्त पद्धतीनं केली जात आहे. ८ ते १२ जून या कालावधीत ही गणना करण्यात येणार आहे. गोंदिया, भंडारा आणि बालाघाट या तीनही जिल्ह्यात ही गणना होतेय. मागील वर्षी गोंदियामध्ये ३६ आणि बालाघाटमध्ये सारस पक्षांची संख्या ४० होती, अशी माहिती सेवा संस्थेचे सचिव सावन बहेकार यांनी दिलीय.
सारस पक्षाची वैशिष्ट्ये
सारस हा पक्षी उडणाऱ्या पक्षांमध्ये जगातील सर्वात मोठा समजला जातो. एका सारस पक्षाचा मृत्यु झाल्यावर दुसरा सारस पक्षीही मृत्युला कवटाळतो. देशाचा विचार केला तर सारस पक्षांची संख्या सर्वात कमी ही गोंदिया जिल्ह्यातच आढळते. त्यामुळं अशा वैशिष्ट्यपूर्ण सारस पक्षासाठी तरूण पक्षीमित्र पुढे सरसावले आहेत. सारस पक्षाच्या संख्येत गेल्या काही वर्षात वाढ झालीय. तर दुसरीकडे सारस पक्षांच्या मृत्युची संख्या चिंताजनक आहे.