बंगले चोरी गेले का?, किरीट सोमैया यांचा सवाल
किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर 19 बंगले असल्याचा आरोप केला होता. मात्र त्याठिकाणी बंगले नसल्याचे वृत्त प्रसिध्द झाले. त्यामुळे 2019 साली असलेले बंगले चोरी गेले का? असा सवाल किरीट सोमैया यांनी केला.;
राज्यात भाजप शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे. आरोप प्रत्यारोपांनी महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांनी शिवसेनेतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून दिली आहे. तर किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर मुरूड कोलई येथे 19 बंगले असल्याचा आरोप केला होता. मात्र त्याठिकाणी बंगले नसल्याचे आढळून आले. त्यावरून किरीट सोमैया यांनी 2019 पर्यंत असलेले बंगले चोरी गेले का? असा सवाल केला आहे.
किरीट सोमैया यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत त्यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत किरीट सोमैया यांनी शिवसेनेवर आणि ठाकरे कुटूंबियांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला असल्याचे सांगितले. तर मुरूड कोर्लई येथे रश्मी ठाकरे यांचे बंगले असतील तर त्यासाठी मी स्वतः सहल आयोजित करतो, असे आवाहन किरीट सोमैय्या यांना दिले होते. तसेच किरीट सोमैयावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे संजय राऊत विरुध्द किरीट सोमैया वादाला शिवसेना विरुध्द किरीट सोमैया असे वळण मिळाले. त्यामुळे हा वाद विकोपाला गेला.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमैया यांनी दिल्लीतून पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी केलेल्या आऱोपांचा इन्कार करत आम्ही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याठिकाणी रश्मी ठाकरे यांचे बंगले नसल्याचे मॅक्स महाराष्ट्रने त्याठिकाणी भेट देऊन निदर्शनास आणून दिले.
किरीट सोमैया यांनी ट्वीट करत सांगितले की, 18 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या "19 बंगल्या"च्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी मी गाव कोर्लई, ता. अलिबाग आणि रेवदंडा पोलीस स्टेशनला भेट देणार आहे. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कुटूंब आणि कै. अन्वय नाईक यांनी 1 एप्रिल 2009 ते मार्च 2021 या कालावधीत 19 बंगल्यांवर मालमत्ता कर, वीज कर, आरोग्य कर भरले आहेत. तसेच त्यांनी शेवटचे पेमेंट 12 नोव्हेंबर 2020 रोजी केले आहे. त्यामुळे कर भरलेल्या बंगल्यांचे काय झाले. चोरी झाले का ? असा सवाल किरीट सोमैया यांनी केला आहे.