एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू, निलंबनाच्या भीतीमुळे मृत्यू झाल्याचा सहकाऱ्यांचा आरोप

Update: 2021-11-17 12:17 GMT

उस्मानाबाद :  उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथील एका 32 वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. निलंबनाच्या भीतीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सहकारी कर्मचाऱ्यांनी केला आहे. किरण घोडके असं या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. किरण हे अक्कलकोट आगारात चालक या पदावर कार्यरत होते. सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी होते. राज्यसरकारने आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाया सुरू केल्या आहेत. आपल्या इतर सहकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे किरण घोडके हे देखील अस्वस्थ झाले होते. काल रात्री हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. निलंबनाची कारवाई होईल या भीतीने हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

मागील काही दिवसांपासून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. दरम्यान एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यात दबाव तंत्रांचा वापर केला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. काही कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर काही कर्मचाऱ्यांना निलंबनाचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे आधीच तणावात असणारे कर्मचारी आणखी तणावात जात असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना हृदय विकाराचे झटके येत आहेत असं कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Tags:    

Similar News