जावेद अख्तर यांच्या संघावरील टीकेला शिवसेनेचे उत्तर

Update: 2021-09-06 03:34 GMT

गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्याने वाद निर्माण झाला आहे. जावेद अख्तर यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी भाजपने केली आहे. तर आता या वादात शिवसेनेने उडी घेतली आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून जावेद अख्तर यांच्यावर या प्रकरणात टीका करण्यात आली आहे.

देशात कुणीही कुणाला तालिबानी म्हणतंय. अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट म्हणजे समाज व मानवजातीला सगळय़ात मोठा धोका आहे. पाकिस्तान, चीनसारख्या राष्ट्रांनी तालिबानी राजवटीचे समर्थन केले; कारण या दोन्ही देशांत मानवी हक्क, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य यांचे काहीच मूल्य राहिलेले नाही. भारताची मानसिकता तशी दिसत नाही. एकतर आपण कमालीचे सहिष्णू आहोत. लोकशाहीच्या बुरख्याआड काही लोक दडपशाही आणू पाहत असले तरी त्यांना मर्यादा आहेत. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे हे योग्य नाहीच," या शब्दात जावेद अख्तर यांना उत्तर देण्यात आले

जावेद अख्तर यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष आहे,पण हिंदू राष्ट्र संकल्पनेला पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल? तालिबान्यांना तेथे फक्त धर्माचे म्हणजे शरीयतचेच राज्य आणायचे आहे. आपल्या देशाला हिंदू राष्ट्र बनवू पाहणारे जे जे लोक व संघटना आहेत, त्यांची हिंदू राष्ट्रनिर्मितीची कल्पना मवाळ आहे. धर्माच्या आधारावर पाकिस्तान व हिंदुस्थान ही दोन राष्ट्रे बनल्यावर हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात सातत्याने डावलले जाऊ नये, हिंदुत्व म्हणजे एक संस्कृती असून त्यावर आक्रमण करणाऱ्यांना रोखण्याचे हक्क ते मागत आहेत. अयोध्येत बाबरी पाडण्यात आली व तेथे राममंदिर उभे राहत आहे, पण आजही बाबरीसाठी जे आंदोलन करीत आहेत त्यांचा बंदोबस्त करा व तो कायद्याने करा, असे कोणी म्हणत असतील तर ते तालिबानी कसे?", असा प्रश्न या सामनाच्या अग्रलेखात उपस्थित करण्यात आलाय.

कश्मीरातून ३७० कलम हटविले. त्यामुळे कश्मीरचा कोंडलेला श्वास मोकळा झाला. हा श्वास पुन्हा बंद करा, अशी मागणी करणारे लोकच तालिबानी आहेत. शिवसेना किंवा संघाचे हिंदुत्व व्यापक आहे, ते सर्वसमावेशक आहे. त्यात मानवी हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य, महिलांचे हक्क अशा पुरोगामी विचारांना स्थान आहे. संघ किंवा शिवसेना तालिबानी विचारांचे असते तर या देशात तिहेरी तलाकविरुद्ध कायदे झाले नसते व लाखो मुसलमान महिलांना स्वातंत्र्याची किरणे दिसली नसती. संघाची स्वातंत्र्यलढय़ातील भूमिका संशयास्पद असल्याचा आक्षेप काही विरोधक घेत असतात. तो मुद्दा बाजूला ठेवा; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक राष्ट्रीय बाण्याची संघटना आहे, याबाबत दुमत असण्याची शक्यता नाही," असे म्हणत सामनामधून शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थन केला आहे

Tags:    

Similar News