औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत युती नाही, संजय राऊत यांनी केले स्पष्ट
राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप संघर्ष रंगला आहे. त्यातच राज्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली.;
संजय राऊत यांनी राज्यात नव्या राजकीय समीकरणावर प्रतिक्रीया व्यक्त करताना सांगितले की, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांना मानणारे पक्ष आहेत. त्यामुळे औरंजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणारे आमचे आदर्श होऊ शकत नाहीत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्यांनी पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेशमध्ये निवडणूक लढवून भाजपला फायदा करून दिला. तो एमआयएम पक्ष भाजपची बी टीमच आहे. त्यामुळे अशा औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकवणारे आमचे आदर्श होऊ शकत नाहीत.
तसेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे राज्यात सरकार आहे आणि हे तीनच पक्षांचे सरकार राहणार आहे. त्यामुळे ज्यांच्यासोबत छुपी युती आहे त्यांना त्यांची हातमिळवणी लखलाभ असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देतांना म्हणाले की, मी रावसाहेब दानवे यांना जितके ओळखतो तितके ते भांग पीत नाहीत किंवा दुसरी कुठली नशा करत नाहीत. त्यामुळे त्यांना 125 आमदार असं म्हणायचं असेल पण ते चुकून फक्त 25 म्हणाले. ही स्लीप ऑफ टंग असेल. पण कालची उतरली असेल तर आम्ही त्यांना असं सांगतो की भाजपचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.