अण्णा, कसल्या गुळण्या टाकता?: सामना
अण्णा भाजपची भाषा बोलत आहेत .राळेगणच्या यादवबाबाने जेवढे आयुष्य दिले आहे तेवढे तर अण्णांना जगावेच लागेल, पण त्यासाठी महाराष्ट्राची बदनामी का करता? असं सांगत वाईन वरून अण्णा हजारे यांनी घेतलेल्या भूमिकेवर सामनातून सडकून टीका करण्यात आली आहे.;
महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदी यांनी दोनेक दिवसांपूर्वी केला.अण्णा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन कठोर शब्द बोलतील असे वाटले होते, पण अण्णांनी महाराष्ट्राचा अपमान गिळला व 'वाईन वाईन'चा गजर करीत 'आता जगणे नाही' असा सूर लावला, पण अण्णा आता जाणार कुठे? आम्हाला अण्णांची चिंता वाटते. त्यांना उदंड आयुष्य लाभो, अशी आम्ही तुळजा भवानीचरणी प्रार्थना करीत आहोत.
राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय मान्य नसल्याने राळेगणचे अण्णा हजारे यांनी आंदोलन करायचे ठरवले. ते त्यांनी आता स्थगित केले, पण महाराष्ट्र राज्यात त्यांना जगायची इच्छा नसल्याचे जाहीर केले आहे. अण्णांना का जगायचे नाही? त्यांना असले कसले वैफल्य आले आहे? त्यांच्या मनात नैराश्याचे काळे ढग का जमा झाले आहेत? हा सत्यशोधनाचा विषय आहे, असं सामना संपादकीय मध्ये सांगण्यात आलं आहे.
द्राक्ष, फळे उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयापासून बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. अनेक पिकांपासून वाईनचे उत्पादन होते. ते उत्पादन वाढले तर शेतकऱ्यांची घरे बऱ्यापैकी चालतील. यात भाजपवाले बोलतात त्याप्रमाणे महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र वगैरे करण्याचा प्रश्न येतोच कुठे? पण अण्णा हे भाजपचीच भाषा बोलू लागले आहेत. अण्णांचे वैफल्य हे आहे की, अण्णांच्या प्रत्येक आंदोलनातली हवा निघून गेली आहे व मोदी-शहांचे सरकार केंद्रात आल्यापासून त्यांना कोणी फारसे विचारत नाही. काँग्रेसचे राज्य दिल्लीत व महाराष्ट्रात असताना अण्णा ऊठसूट उपोषणे व आंदोलने करीत. रामलीला मैदान, जंतर मंतरवर त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकले, त्या रणशिंगात हवा फुंकणारे आज दिल्लीतील सत्ताधीश आहेत, पण ज्या 'लोकपाल'साठी अण्णांनी लढाई केली तो लोकपाल आज गुजरात राज्यातही नेमला गेला नाही, दिल्ली तो बहोत दूर है! ''मी इतका मर मर मेलो, उपोषणे केली, पण कर्मदरिद्री भाजपवाले एक लोकपाल नेमायला तयार नाहीत. आता जगायचे कशाला?'' असा त्रागा खरे तर अण्णांनी करायला हवा होता, पण महाराष्ट्रातील सुपर मार्केटमध्ये वाईन विकायला ठेवली म्हणून त्यांना जगायची इच्छा राहिलेली नाही. हे खरे की, व्यसनांनी लोकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली आहेत. गावागावांत महिलांनी दारू दुकानांविरोधात आंदोलने केली आहेत, पण महाराष्ट्र आपली प्रतिष्ठा आणि संस्कार कधीच विसरणार नाही, हे काय अण्णा हजारे यांना माहीत नाही? अण्णांनी राज्यात जल संधारणाची, ग्राम सुधारणेची वगैरे चांगली कामे केली आहेत. त्याच तोडीची कामे बाजूच्या पोपटराव पवारांनी केली व त्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले, पण महाराष्ट्रात जगायची इच्छा नाही असे ते कधी म्हणाले नाहीत. उलट महाराष्ट्रात जन्मास यायला भाग्य लागते. ज्यांना महाराष्ट्रात जगायची इच्छा नाही ते कर्मदरिद्रीच म्हणायला हवेत. अण्णांचे आजचे मोठेपण महाराष्ट्रामुळे आहे. त्याच महाराष्ट्रावर अण्णा नक्की कसल्या गुळण्या टाकत आहेत व कुणाच्या प्रेरणेने ते त्यांनाच माहीत. प्रश्न वाईन विक्रीचा नाही, तर अण्णांसारख्यांच्या वक्तव्याचा आहे. अण्णा म्हणतात, आता मला जगायचे नाही. वयाची 84 वर्षे झाली, खूप झाली. मी जगून घेतले. म्हणजे ते खूप जगून घेतल्याचा आनंद व्यक्त करीत आहेत. मग त्या आनंदाच्या दुधात वाईनचे थेंब का टाकता? राळेगणच्या यादवबाबाने तुम्हाला जेवढे आयुष्य दिले आहे तेवढे तर जगावेच लागेल, पण त्यासाठी महाराष्ट्राची बदनामी का करता? असा प्रश्न सामनातून विचारला आहे.
सैन्यातून निवृत्त झालेले 'सोल्जर'आहेत. त्यामुळे ते अधूनमधून देशभक्तीचा बाणा दाखवत असतात. चिनी सैन्य सध्या लडाखमध्ये घुसले आहे व हिंदुस्थानचे मोदी सरकार ही घुसखोरी हतबलतेने पाहत आहे. ही हतबलता व चिनी आक्रमण पाहून अण्णांमधला राष्ट्रभक्त जवान जागा होईल व केंद्र सरकारला सवाल विचारेल असे वाटले होते. ज्या देशाच्या सीमा दुश्मनांनी पार केल्या ते पाहून मला जगावेसे वाटत नाही, असे खरं तर अण्णांनी म्हणायला हवे होते. पुलवामा हल्ल्यात आपले चाळीस जवान सरकारच्या बेपर्वाईने शहीद झाले. तेव्हाही त्यांना ''आता कशाला जगायचे?'' असा प्रश्न पडला नाही. नोटाबंदीच्या बेइमान निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था कोसळली, हजारो लोक बँकांच्या रांगेत मरण पावले, लाखो लोकांनी नोकऱ्या गमावल्या, पण तेव्हाही अण्णांना जगू नये असे वाटले नाही. कोरोना काळात गंगेत हजारो प्रेते वाहून जाताना जगाने पाहिली. मनुष्य हळहळला, पण गंगेतली प्रेते पाहूनही अण्णांना नैराश्य आले नाही व ''आता जगायचे कशाला?'' असा पांचट प्रश्न पडला नाही. कारण त्यांना मनापासून जगायचे आहे. महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदी यांनी दोनेक दिवसांपूर्वी केला. अण्णा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन कठोर शब्द बोलतील असे वाटले होते, पण अण्णांनी महाराष्ट्राचा अपमान गिळला व 'वाईन वाईन'चा गजर करीत 'आता जगणे नाही' असा सूर लावला, पण अण्णा आता जाणार कुठे? आम्हाला अण्णांची चिंता वाटते. त्यांना उदंड आयुष्य लाभो, अशी आम्ही तुळजा भवानीचरणी प्रार्थना करीत आहोत, असं संपादकीय मधून शेवटी सांगण्यात आलं आहे.