लबाड लांडगा ढोंग करतोय, रुपाली पाटील यांचा किरीट सोमय्यांवर हल्ला
किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी किरीट सोमय्यांवर घणाघाती टीका केली.;
राज्यात महाविकास आघाडी विरुध्द भाजप सामना रंगला आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून दिली आहे. दरम्यान पुणे महापालिका परिसरात किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिले.
किरीट सोमय्या यांनी पुणे शहरातील लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसचे सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे मित्र असून त्यांनी जंबो कोविड सेंटरमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तर त्यांच्याविरोधात पुणे शहरात गुन्हा दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या गेले असताना सोमय्यांवर पुणे महापालिका परिसरात शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिले.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी किरीट सोमय्या यांची नक्कल करत लबाड लांडगा ढोंग करतोय, असे म्हटले. तर पुणे महापालिकेचे महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि पुणे महानगर प्रदेश विकास एकत्रपणे चालविले जात असल्याचा आरोप केला. तर याबाबत तक्रार दाखल करून पुर्ण चौकशी जनतेसमोर आणा, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.
तसेच किरीट सोमय्या यांनी राजीव साळूंखे या चहावाल्याला 100 ठाकरे सरकारने जंबो कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचा आरोप केला. त्यावरून रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, तर चहावाला काँट्रॅक्टर का होऊ शकत नाही. याबरोबरच आपण लोकशाहीमध्ये राहतो. त्यामुळे भ्रष्टाचाराचे नाव घेऊन दिशाभूल करून चालणार नाही, तर त्याची पुराव्यानिशी माहिती द्यावी लागेल, असे मत रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केले. तर पुणे मनपात सुरू असलेल्या भाजपचा भ्रष्टाचार किरीट सोमय्या यांनी काढून दाखवला पाहिजे, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितले.