पंजाबमध्ये पुन्हा वाद पेटला, चन्नींच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी निर्माण झाल्याने पंजाब सरकार विरुध्द केंद्र सरकार वाद पेटला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री चन्नी यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला परवानगी नाकारल्याने नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.;
पंजाब निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा आरोप करत केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारला टार्गेट केले होते. तर त्यानंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्याने पंजाबमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
पाच राज्यातील निवडणूकांमधील आरोप प्रत्यारोपांनी वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यापार्श्वभुमीवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे चॉपर हेलिकॉप्टर होशियारपुर येथे उतरवण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी केला आहे.
पंजाब निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना भटिंडा विमानतळावरून फिरोझपुरच्या दिशेने जात असताना त्यांचा ताफा एका उड्डाणपुलावर अडकून पडला होता. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी निर्माण झाली असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले होते. तर पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप भाजपने केला. मात्र त्यावर प्रतिक्रीया देतांना पंतप्रधानांच्या सभेला गर्दी नसल्याने पंतप्रधानांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. परंतू त्याचे खापर फोडण्यासाठी सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप मुख्यमंत्री चन्नी यांनी केला होता. त्यावरून पंजाबमध्ये मोठे राजकारण तापले होते. तर सध्या या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमुर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीच्या वादानंतर आता पंतप्रधान पंजाबमधील जालंधर येथे असल्याने परिसर नो फ्लाय झोन करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे चॉपर हेलिकॉप्टरला होशियारपुर येथून उड्डाण करण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप चन्नी यांनी केला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये पुन्हा केंद्र सरकार विरुध्द राज्य सरकार असा वाद रंगणार का? अशी चर्चा सुरू आहे.