एमपीएसी परीक्षेतून होणारा भाजपा धार्जिणा प्रचार रोखा, ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेउन केली.
मुख्यमंत्री उद्घवजी ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेउन ॲड ठाकूर यांनी याबाबतचे निवेदन दिले. याबाबत ॲड यशोमती ठाकूर म्हणाल्या, एमपीएससी परीक्षेचं संघीकरण करण्यात येत असून परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भाजपा धार्जिणा राजकीय प्रचार तसेच काँग्रेस विरोधी भूमिका रुजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं निदर्शनास येत आहे. गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत भारत सरकार किंवा केंद्र सरकार असा उल्लेख टाळून आवर्जून मोदी सरकार असा उल्लेख असलेला उतारा प्रश्नपत्रिकेत सामील करण्यात आला होता. तसेच याच प्रश्नपत्रिकेत काँग्रेसने ब्रिटिश शिक्षण पद्धती निवडली असा तथ्यहीन आरोप असलेला उतारा जाणीव पूर्वक समाविष्ट करण्यात आला. यातून काँग्रेसची बदनामी करण्याचा स्पष्ट हेतू दिसून येत आहे.
दरवर्षी लाखो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षा देत असतात. मागील परीक्षेत मनुस्मृतीसंदर्भात वादग्रस्त प्रश्न सामील करण्यात आले होते. जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी संबंधित अभ्यासक्रम रुजवण्यात येत असल्याची टीका ॲड ठाकूर यांनी केली आहे.
या राजकीयीकरणाला अभ्यासक्रमापासून दूर ठेवण्याची गरज आहे, तसेच अशा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन ॲड. ठाकूर यांनी आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिले.