एमआयएमचा राष्ट्रवादीला ऑफर, राजेश टोपे यांची पहिली प्रतिक्रीया

Update: 2022-03-19 09:20 GMT

पाच राज्यांच्या निवडणूकापाठोपाठ राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष तीव्र झालेला असताना औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला ऑफर दिली आहे. त्यावर राजेश टोपे यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली.

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष तीव्र झालेला आहे. त्यापाठोपाठ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांना आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. त्यावरून राज्यात चर्चेला उधाण आले आहे. त्यावरून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. तर आघाडीबाबत पक्षाचे वरीष्ठ नेते निर्णय घेतील असे सांगत आघाडीच्या प्रस्तावाचा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात ढकलला.

इम्तियाज जलील यांच्या आईचे निधन झाल्याने एक वर्गमित्र म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या अनौपचारिक गप्पामध्ये तुमचा पक्ष गांधीवादी पक्षांची मतं घेतो. त्याचा फायदा भाजपला होतो. तुम्हा असे का वागता? असे राजेश टोपे यांनी जलील यांना विचारल्याचे सांगितले. त्यावर जलील यांनी आम्ही अल्पसंख्यांकाच्या हक्कांसाठी लढत आहोत, असे सांगितले. तर जे पक्ष अल्पसंख्यांकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील आम्ही त्यांच्यासोबत असू अशी प्रतिक्रीया इम्तियाज जलील यांनी दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष अल्पसंख्यांच्या हक्कावर काम करत असल्याचेही राजेश टोपे यांनी जलील यांना सांगितले. त्यावेळी जलील यांनी मग आमच्याशी आघाडी करणार का? असे विचारले. मात्र याबाबत आघाडी करण्यासाठी तुम्ही आमच्या वरिष्ठांना भेटा. त्यांच्याशी चर्चा करा. त्यामुळे वरीष्ठ जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असतील अशी प्रतिक्रीया टोपे यांनी दिली.

Tags:    

Similar News