मी मुख्यमंत्री पदाची उमेदवार नाही. प्रियंका गांधींची आपल्या वक्तव्यावरून पलटी
देशातील पाच राज्याच्या निवडणूकीमुळे राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. त्यातच उत्तरप्रदेश निवडणूकीत सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. तर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आपण मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार आहोत असे वक्तव्य केले होते. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून पलटी मारत आपण मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार नाही, असे एनडीटीव्हीशी बोलताना स्पष्ट केले.
उत्तरप्रदेश निवडणूकीत मैं लडकी हूँ मैं लड सकती हूँ या काँग्रेसच्या अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यापार्श्वभुमीवर उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसने 40 टक्के महिलांना उमेदवारी देणार असल्याचे घोषित केले. तर उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियंका गांधींना पुढे केले जात होते. त्यापार्श्वभुमीवर प्रियंका गांधी यांनी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपणच उत्तरप्रदेश निवडणूकीत काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्या निर्णयाचे स्वागत तर काहींनी त्यांच्या निर्णयावर टीका केली. त्यानंतर एनडीटीव्हीशी बोलताना प्रियंका गांधी यांनी आपण उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक लढवू पण आपण मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार नसल्याचे स्पष्ट केले.
शुक्रवारी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेश निवडणूकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिध्द केला. त्यावेळी उत्तर प्रदेश साठी काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. त्यावर उत्तर देतांना तुम्हाला दुसरा कोणाचा चेहरा दिसतोय का? सगळीकडे माझाच चेहरा दिसतोय ना? असे उत्तर देत आपणच मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.
निवडणूक जाहीरनामा प्रसिध्द केल्यानंतर प्रियंका गांधी यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर मी मस्करी केली होती. मला प्रत्येक वेळी हा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे मी तसे उत्तर दिले. मात्र मी मुख्यमंत्री पदाची उमेदवार नाही. पण मी निवडणूक लढवू शकते, असे सांगितले. तर जेव्हा आमचा निर्णय होईल तेव्हा तुम्हाला माहिती देऊ, असे विधान प्रियंका गांधी यांनी केले.
हे ही वाचा- प्रियांका गांधी उत्तरप्रदेश मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?