राज्यपालांपाठोपाठ रावसाहेब दानवेंचेही शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य
गेल्या काही दिवसांपुर्वी औरंगाबाद येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.;
राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यापाठोपाठ आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. मात्र त्यानंतर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी समर्थ रामदास नसते तर शिवाजी असते का असं वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभरातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा तीव्र निषेध करण्यात आला होता. तर राज्यपालांच्या वक्तव्याचे राज्यभरातून तीव्र पडसाद उमटले होते. त्यापाठोपाठ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थ रामदास हेच गुरू होते, असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रावसाहेब दानवे औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले की, आमच्या माहितीप्रमाणे समर्थ रामदास हेच शिवरायांचे गुरू होते. आम्ही जेवढं शिकलो, जेवढं वाचलं , जेवढं ऐकलं त्याचा आधार घेऊन बोलत आहे. आमच्यापेक्षा अधिक वाचणारं कुणी अशेल किंवा त्यांच्या वडिलांना , जाणकारांना आमच्यापेक्षा जास्त माहिती असेल तर तो त्यांचा भाग आहे. पण समर्थ रामदास हेच शिवाजी महाराजांचे गुरू होते, असे म्हणत दानवे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे समर्थन केले. त्यामुळे दानवेंपुढील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दानवेंपुढील अडचणी वाढणार?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापाठोपाठ रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थ रामदास हेच गुरू होते, असे वक्तव्य केले. मात्र "हे आमचं मत आहे, त्यामुळे मत मांडायला आम्ही कुणाला नाही म्हणत नाही. मी माझं मत मांडलं, त्यांनी त्यांचं मत मांडलं, त्यामुळे टीका करण्याचं काय कारण आहे", असंही दानवे म्हणाले. कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात आंदोलनाची धग पाहायला मिळाली होती. आता दानवेंनी देखील छत्रपतींचे गुरु रामदासच असल्याचं म्हटल्याने दानवेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यपाल नेमकं काय म्हणाले होते?
औरंगाबाद शहरातील तापडिया नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या, समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशात गुरुची उज्वल परंपरा असून, ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते?. समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, गुरुचे महत्त्व मोठे आहे...! त्या वक्तव्यानंतर राज्यभर राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत होता. मात्र आता राज्यपालांपाठोपाठ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.