Nagar panchayat Election : मोताळा, संग्रामपुरात भाजप भुईसपाट, संग्रामपूरचा गड प्रहारने जिंकला
बुलढाणा जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूक अनेक दिग्गजांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे मोताळा आणि संग्रामपुरात बाजी कोण मारणार याची चर्चा सुरू होती. त्यात मोताळा आणि संग्रामपुर नगरपंचायतीत भाजप भुईसपाट झाला आहे. तर बच्चू कडूंच्या प्रहारने संग्रामपूर नगरपंचायतीत मोठे यश मिळवले.;
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागांसाठी बुधवारी 19 जानेवारीला मतमोजणी झाली. त्याचा धक्कादायक निकाल हाती आला आहे. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. तर संग्रामपुरमध्ये बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मोठे यश मिळाले आहे. यावेळी विजयी उमेदवारांच्या वतीने गुलाल आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. मात्र या दोन्ही नगर पंचायत मध्ये भाजप ला खाते ही उघडता आले नाही.
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतीच्या 17 जागासाठी 64 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर संग्रामपूर मध्ये 17 जागांसाठी 67 उमेदवार रिंगणात होते. मोताळा नगर पंचायत मध्ये 12 काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस ला याठिकाणी एक हाती सत्ता मिळाली आहे. तर भाजप ला खाते ही उघडता आले नसून शिवसेनेला 4 जागा आणि राष्ट्रवादी ला एका जागेवर समाधान मानावे लागले.
संग्रामपूर नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 67 उमेदवार निवडणक रिंगणात होते. या ठिकाणी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने 12 ठिकाणी विजय मिळवत एक हाती सत्ता मिळविली असून महाविकास आघाडीला याठिकाणी 5 जगावर समाधान मानावे लागले. दोन्ही नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारवेळी राज्यमंत्री बच्चू कडू, यशोमती ठाकूर, अब्दुल सत्तार , नाना पटोले सह इतर नेत्यांच्या सभा झाल्या होत्या, प्रत्येकाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र निवडणूकीच्या निकालाने दिग्गजांना धक्का दिला आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायत निवडणूकीत भाजप भुईसपाट झाली आहे. तर संग्रामपूर प्रहारने जिंकल्याने प्रहारची ताकद वाढली आहे.