गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच वीस आमदारांनी सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी वेळ मागितल्याने चर्चेला उधाण आले आहे. यावर बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिले आहे
G-23 गटाच्या दबावानंतर काँग्रेसचे पाच ते सहा प्रभारी बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभुमीवर आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वात 20 काँग्रेस आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान 3 किंवा 4 एप्रिल रोजी आमदारांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे आमदारांच्या नाराजीनंतर आता चर्चेला उधाण आले आहे.
राज्यातील काँग्रेस आमदारांनी वारंवार निधी वाटपामध्ये अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यातच वीस आमदारांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी पत्र लिहिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र आता यावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेस आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटीची वेळ मागितली त्यात गैर काय आहे? तसेच पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेस मध्ये कोणीही नाराज नाही. मात्र त्या पत्राचा विपर्यास करण्यात आला तसेच काँग्रेसचे देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहे. हे युपीएचे नेतृत्व करण्यासाठी मागणी करणारांनाही मान्य आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्तावावर अप्रत्यक्ष टोला लगावला.