अखेर काँग्रेसला अध्यक्ष मिळणार, १७ ऑक्टोबरला होणार मतदान

Update: 2022-09-12 03:54 GMT

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारीणीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अखेर मुहुर्त मिळाला आहे. २२ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर या काळात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुक घेण्यात येणार आहे. १७ ऑक्टोबर ला मतदान आणि १९ ऑक्टोबरला नव्या अध्यक्षांचं नाव जाहिर होणार आहे. तत्पुर्वी या निवडणुकीत मतदार असलेल्या प्रतिनिधींची यादी देखील जाहिर केली जाणार आहे.

गेल्या अनेक काळापासून काँग्रेसला अध्यक्षच नाहीत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत राहूल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी पक्षाचं हंगामी अध्यक्षपद स्विकारलं. शिवाय कोरोना महामारीमुळे देखील अध्यक्षपदाची ही निवडणुक रखडली होती. गेल्या काही काळात काँग्रेसची बरीच वाताहात देखील झालेली पाहायला मिळाली. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसला रामराम केला. नुकतेच ज्येष्ठ नेते आणि जम्मू काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री गुनाम नबी आझाद यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे पक्षाची घडी नव्याने बसवण्यासाठी ही निवडणुक होण्याची गरज होती. आणि अखेर काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मुहुर्त मिळाला आहे.

कधी होणार निवडणूक?

या सगळ्या घटनानंतर अखेर २२ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर या काळात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुक घेण्यात येँणार आहे. त्यानुसार २२ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसुचना काढली जाईल. त्यानंतर २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्विकारले जातील. १ ऑक्टोबर रोजी या सर्व अर्जांची छाननी केली जाईल. शिवाय ८ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. १७ ऑक्टोबर रोजी मतदान होईल आणि १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर होतील आणि नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल.

मतदार यादी जाहिर करण्यासाठी ५ खासदारांची मागणी

काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक यादी उमेदवारांना देण्यात यावी अशी मागणी कॉग्रेसच्या ५ खासदारांनी केली होती. यामध्ये कार्ती चिदंबरम, शशी थरूर, मनिष तिवारी या खासदारांनी पत्र लिहुन ही मागणी केल्याचं समोर येत आहे. ही यादी जर काँग्रेस अध्यक्ष पदाच्या उमेदवारास दिली नाही तर उमेदवाराचा अर्ज बाद होण्याची भीती अर्जदारांमध्ये निर्माण होईल. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करताना १० प्रदेश कॉंग्रेस समिती सदस्याचं शिफारस पत्र जोडणं गरजेचं असतं. मात्र, अनेक दिवसांपासून निवडणूका न झाल्यानं प्रदेश कॉंग्रेस समितीची अधिकृत यादीच नाही. त्यामुळं शिफारस केलेल्या सदस्यांपैकी एखादा सदस्य प्रदेश कॉंग्रेस समितीचा सदस्य नसल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळं ही यादी सार्वजनिक करण्याची मागणी कॉंग्रेसचा एक गट सातत्याने करत होता.

सध्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदार असणाऱ्या प्रतिनिधींची संख्या ९ हजारांच्या वर आहे त्यामुळे ही यादी दिली नाही तर काँग्रेसचा हा गट न्यायालयात जाण्याची शक्यता होती, अशी देखील माहिती समोर आली होती. त्यानंतर आता ही यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. २० सप्टेंबर पासून काँग्रेसच्या निवडणूक कार्यालयात यादी मिळणार आहे. अशी माहिती काँग्रेसच्या निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधूसुदन मिस्री यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News