सजवून मिरवावा,बैल पोळ्याला डौलानं...!!
श्रावण दर्श अमावस्या म्हणजेच बैल पोळा, पोळा हा सण महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या ग्रामीण भागात बैलाच्या शेतातील योगदानाबद्दलच्या कृतज्ञतेसाठी साजरा केला जातो, दक्षिणेला मट्टू पोंगल, आणि उत्तर पश्चिम भारतात गोधन यासारखे सण उत्सव शेतातील प्राण्यांचा सन्मान करण्यासाठी साजरे केले जातात, खानदेशातही या परंपरेला विशेष असा सन्मान आहे,
बैलपोळ्याच्या दिवशी कोणत्याही बैलाच्या खांद्यावर दुष्यर न ठेवता त्याला आंघोळ घालून प्राचीन परंपरेनुसार त्याला महादेवाचं आराध्य दैवत नंदी म्हणून सन्मान दिला जातो, रक्षाबंधन संपल्यानंतर श्रावणाच्या दर्श अमावस्येला पोळा हा सण उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहे,,,
या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाचा लेप देऊन शेकले जाते,
वर्षभर बळीराजाची निस्वार्थ व प्रामाणिक कर्म प्रधान सेवा करून शेती मातीची सर्व कामे नंदी राजामुळे पार पडत असतात, ,
आला आला पोया,सन झाले सारे गोया
आज पूजला जाईल,माझा नंदीबैल भोया
अशा बहिणाबाईच्या लेवागणबोली मिश्रित माझ्या काव्यातून पोळा या सणाचे महत्त्व मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, , खानदेशात पोळ्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे,
शेतकऱ्याचा जीव कि प्राण असलेल्या नंदीबैलाला पोळ्याच्या आदल्या दिवशी गावकुशीच्या नदीवर आंघोळ घालून त्याच्या शिंगाला रंगरंगोटी करून शेंदूर , हिगुळीचे रंग व विविध रंगांनी त्याला सजवले जाते. गळ्यामध्ये कवड्याची माळ गळ्यात पितळी गोड आवाजांचा घंटा, तसेच पायामध्ये घुंगरांची चाळ मानेवर पितळी घुंगरांचा पट्टा ,तसेच अंगावर परिस्थितीनुसार चमकदार झूल चढवून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो,
विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील या सणाला विशेष असे महत्त्व आहे त्या भागातही नंदी राजाचे पूजन अतिशय यथायोग्य पद्धतीने व परंपरेनुसार पार पडत असते घरातील सर्वजण आनंदाने नंदीची पूजा करून त्याला गावभर मिरवतात खानदेशात अनेक ठिकाणी नंदीला राजाला मिरवण्यासाठी चढाओढ लागलेली असते, ,
पूर्वीच्या काळी ज्या गावांमध्ये ऐतिहासिक दरवाजे आजही अस्तित्वात आहे त्या दरवाजातून ज्या सजवलेल्या बैलाला प्रथम मान दिला जातो त्या शेतकऱ्याचा सन्मान देखील केला जातो, ज्याचा बैल सर्वप्रथम गावात पोळा फोडेल त्याला नारळ शाल टोपी टावेल व कपडे देऊन सन्मानित केले जाते, आणि नंदी राजाला झूल बक्षीस दिले जाते, तसेच ढोल ताशांच्या गजरात गावातील भाऊबंदकीची अनेक सजवलेले नंदीबैल एकत्र आणून गावभर हर्ष उल्हासने मिरवले जातात
महाभारत काळापासून बैलपोळ्याची परंपरा थोडक्यात अशी आहे, कि, पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धरतीवर अवतरले, तेव्हापासून मामा कंस याने कृष्णाचा प्राण घेण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले, एकदा कंसाने कृष्णाला मारण्यासाठी पोलासपूर नावाचा राक्षस पाठवला होता, तेव्हा कृष्णाने त्या पोलासपूर राक्षसाचा वध केला तो दिवस श्रावण अमावस्येचा होता, ,,
त्या दिवसापासून पोळा हा सण साजरा केला जातो असे पौराणिक कथेनुसार सांगितले जाते,
शेतकऱ्याचा खरा मैतर असलेला नंदीबैल म्हणजे जणू शंकराचाच अवतार मानला जातो,,
अशी शेतकऱ्यांमध्ये समज आहे, पोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळीचा गोड घास खाऊ घातला जातो, त्या दिवशी त्यांना अगदी विशेष मानसन्मान देऊन गावभर मिरवले जाते त्यांचे पूजन केले जाते, शेतकऱ्याची शेती ही केवळ बैलाच्या राबण्यावर अवलंबून आहे म्हणूनच बैलाचा ऋण फेडण्यासाठी पोळा हा सण जणू काही अस्तित्वात आलेला असावा,
खानदेश आणि विदर्भ या भागात शेतकरी व शेतकऱ्यांची मुले तीन दिवस बैलांना शेतात राबवण्यापासून दूर ठेवतात ,त्यांना उत्तम पद्धतीचा सुग्रास चारा खाऊ घालून पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याची पत्नी ही घरात पुरणपोळीचा स्वयंपाक करते,,
आणि सायंकाळी आपल्या आराध्य दैवत असलेल्या शेतीमातीशी ज्याची नाळ बांधलेली आहे अशा नंदिराजाला पुरणपोळीचा नैवेद्य देऊन त्याची यथा सांग मनोभावे पूजा करून बैलाच्या कर्तुत्वाचे ऋण फेडत असतात,,
आज बैलपोळ्याच्या निमित्ताने माझ्या छोट्याशा कवितेतून बैलपोळ्याचे महत्त्व अधोरेखित करून महाराष्ट्रातील व खानदेशातील माझ्या तमाम शेतकरी मायबापांना या बैलपोळा उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा...!!
लेखक-
गो शि म्हसकर ,
नगरदेवळा जळगाव,
मो नं ९१५६०७७०९७