'राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनाच जादा निधी' काँग्रेसची जाहीर नाराजी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कारभारावरून नाराजी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसने आता निधी वाटपावरून आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळतो पण काँग्रेसच्या आमदारांना मिळत नाही. अशी तक्रार काही आमदारांनी केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या नेत्यांची बैठक मुंबईत झाली. बीकेसी येथील एम सी ए क्लब येथे काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एच के पाटील, नसीम खान , कुणाल पाटील , नितीन राऊत, प्रणिती शिंदे, भाई जगताप, विश्वजीत कदम, शरद अहिरे हे नेते उपस्थित होते.
या बैठकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांना जादा निधी मिळतो अशी तक्रार नाना पटोले यांनी केली. त्याचबरोबर वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाने माफीबाबत निर्णय घ्यावा, तसेच मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी नाना पटोले यांनी या बैठकीत केली.
महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसने वारंवार विविध मुद्द्यांवर आपली नाराजी जाहीर केलेली आहे. पण आता राज्य सरकारचा निधी हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना जादा प्रमाणात दिला जातोय, अशी जाहीर तक्रार काँग्रेसने केल्याने महाविकासआघाडी मध्ये सारे काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आला आहे.