कोथरूडची निवडणूक महाराष्ट्रमध्ये गेल्या काही आठवड्यात सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेली आहे. चंद्रकांत दादा यांची उमेदवारी आणि त्यांच्यामुळे इथल्या कोथरूडकरांमध्ये पसरलेला असंतोष याबाबत सातत्याने समाज माध्यमातून चर्चा केली जात आहे. स्थानिक की, बाहेरचा, काश्मीर, 370 कलम यासारख्या मुद्द्यांच्या चर्चेमध्ये कोथरूडकरांचे विकासाचे मुद्दे मात्र बाहेर फेकले गेले आहेत.
आम आदमी पक्षाची अशी भूमिका आहे की, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे. गेल्या आठवड्यामध्ये आम आदमी पक्षाचे डॉ अभिजित मोरे यांनी समाज माध्यमाद्वारे व होर्डिंग द्वारे चंद्रकांत दादा पाटील यांना जाहीर आव्हान दिले होते की, 16 ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कोथरूडमध्ये कोथरूडकरांच्या समस्यांबद्दल समोरासमोर चर्चा व्हावी. चंद्रकांत दादा पाटील यांनी या चर्चेला यावं असे अपेक्षित होतं.
परंतु आज चंद्रकांत दादा पाटील यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला नाही. ते आले नाहीत. सुमारे सव्वा सात वाजता चंद्रकांत दादा पाटील यांची रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळून गेली परंतु दादा डिबेट साठी आले नाहीत. त्यांच्यासाठी ठेवलेली खुर्ची ही दोन तास तशीच रिकामी होती.
पण कोथरूडकर आम आदमी याचा पाठपुरावा सुरुच ठेवणारच आहेत आणि म्हणूनच दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा चर्चेचे आवाहन आम आदमी पक्ष करत आहे. आम आदमी पक्षाचे उमेदवार डॉक्टर अभिजित मोरे त्यावेळी उपस्थित असतील. चंद्रकांत दादा पाटील यांनी ही त्यावेळी उपस्थित रहावे असं आवाहन करण्यात येत आहे.