पुण्यात हेणार १९ वा भारत रंग महोत्सव  

Update: 2017-02-03 10:34 GMT

 

दरवर्षी प्रमाणे राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली तर्फे आयोजित करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव १९ व्या भारत रंग महोत्सवाचेउद्घाटन दिनांक १ फेब्रुवारी २०१७ रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आलं. राष्ट्रीय नाट्य विद्यालय तर्फे नाट्य संस्कृती रुजविण्याचे महत्वपूर्ण कार्य करण्यात येते. परंतु ही संस्कृती काही ठराविक शहरांपुरतीच मर्यादित रहाते. नाट्य संस्कृतीचे देशाच्या विविध राज्यात विकेंद्रीकरण होण्यासाठी यावर्षी पासून भारत रंग महोत्सवामधील निवडक नाट्य कलाकृतीचं सादरीकरण भारतातील काही शहरांमध्ये करण्यात येईल. याचाच एक भाग म्हणून ‘भारत रंग महोत्सवाला‘ समांतर अशा महोत्सवाचे आयोजन कुरुक्षेत्र ,आगरतळा, पाटणा, हैद्राबाद आणि पुणे येथे करण्यात आले आहे.

पुण्यातील आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव दिनांक ९ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१७ या दरम्यान साजरा होणार आहे. या महोत्सवामध्ये ३ भारतीय आणि ३ परदेशी अशा एकूण ६ नाट्य कलाकृतींचं सादरीकरण होणार आहे. परदेशी नाट्य श्रेणीमध्ये मलेशिया, नेपाळ आणि ब्रिटन या देशातले कलाकार सहभागी होणार आहेत. सहभागी नाट्य कलाकृतींचं सादरीकरण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती, सातारा रोड पुणे इथं होणार आहे. या महोत्सवाचं आयोजन राज्य शासन, विविध स्थानिक कला परिषदा, राज्य सांस्कृतीक विभाग यांच्या सहयोगानं करण्यात येत आहे.

राष्ट्रीय नाट्य विद्यालय ही भारतीय नाट्य क्षेत्रातील मुळ संस्था आहे. या नव्या संकल्पनेमुळे रंगमंच भारताच्या सर्व कान्याकोपऱ्यात जाऊन पोहोचण्यास मदत होईल असं राष्ट्रीय नाट्य विद्यालयचे संचालक वामन केंद्रे यांनी सांगितलंय. राष्ट्रीय नाट्य विद्यालय देशातील आणि देशाबाहेरील नाट्य रसिकांना एकत्र आणण्याचे कार्य करत आहे. या वर्षीच्या महोत्सवामध्ये शास्त्रीय, भारतीय लोकसाहित्य, आधुनिक अशा विविध प्रकारच्या सादरीकरणाची मेजवानी उपलब्ध असणार आहे.

या महोत्सवासाठी नाट्यकलांची निवड करताना वैविध्यता ,नाट्य स्वरुप ,पद्धत, नाविन्य, सादरीकरण अशा गोष्टीवर भर देण्यात आलाय. परंपरागत असणाऱ्या नाट्य रसिकांसोबतच नवीन रसिकांनाही भारत रंग महोत्सवाद्वारे जगभरातील उत्तम नाट्य कलांचे सादरीकरण एकाच रंगमंचावर पहावयास मिळेल,असं राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे अध्यक्ष रतन थियाम यांच म्हणण आहे

दरम्यान, पुण्यात होणाऱ्या भारत रंग महोत्सवासाठी मुख्य समन्वयक म्हणून मराठी सिनेअभिनेते आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयचे माजी विद्यार्थी गिरीष परदेशी हे काम पाहत आहेत.

 

Similar News