UP Elecation : पुन्हा भाजप की गठबंधन की सरकार? पश्चिम उत्तर प्रदेश किंगमेकर ठरणार

उत्तर प्रदेशची निवडणूक यावेळी ज्या पश्चिम उत्तर प्रदेशने रंगतदार केली आहे, त्या भागात नक्की राजकीय गणितं काय आहेत? यावेळेची निवडणूक गेल्या निवडणुकीपेक्षा वेगळी का आहे? याची कारणं जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे करस्पाँडन्ट शिवाजी काळे यांनी पश्चिम उत्तर प्रदेशचा दौरा केला आहे. या पश्चिम उत्तरप्रदेशमधील राजकीय गणितं मांडणारा ग्राऊंड रिपोर्ट...;

Update: 2022-02-07 11:35 GMT

उत्तर प्रदेशची निवडणूक यावेळी ज्या पश्चिम उत्तर प्रदेशने रंगतदार केली आहे, त्या भागाची नक्की राजकीय गणितं काय आहेत? यावेळेची निवडणूक गेल्या निवडणुकीपेक्षा वेगळी का आहे? याची कारणं जाणून घेण्यासाठी आमचे करस्पाँडन्ट शिवाजी काळे यांनी पश्चिम उत्तर प्रदेशचा दौरा केला,  तेथील राजकीय गणितं मांडणारा ग्राऊंड रिपोर्ट...

जाट हार्टलँड अशी ओळख असलेल्या या भागाने देशाला चौधरी चरणसिंग यांच्या रूपाने पंतप्रधान दिला. यंदाच्या निवडणुकीत चौधरी चरणसिंग यांचे नातू आणि अजित सिंह यांचा मुलगा जयंत चौधरी यांनी समाजवादी पक्षाशी हात मिळवणी केली आहे आणि हीच हातमिळवणी उत्तर प्रदेशमध्ये इतिहास घडवण्याची शक्यता आहे. अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांच्या या गटबंधनने सत्ताधारी भाजपची चिंता वाढली आहे. का वाढली आहे भाजपची चिंता...काय आहेत पश्चिम उत्तर प्रदेशची राजकीय गणितं...ते पाहूया....




 


पश्चिम उत्तरप्रदेशमध्ये 25 जिल्हे आहेत. या 25 जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 130  जागा आहेत. उत्तर प्रदेशचा हा भाग सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सधन मानला जातो. हा भाग शेतकऱ्यांचा गड मानला जातो. हरितक्रांती याच भागात झाली. त्यामुळे या भागात शेतकरी हा कायम निवडणूकीचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र, या वेळी या भागातील शेतकऱ्यांनीच सत्ताधारी भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. याच भागातील शेतकरी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात देखील सहभागी झाला होता. त्यामुळेच भाजपला तीन कृषी कायदे परत घेण्याची वेळ आली. या भागातील शेतकरी बहुतांश जाट समाजातील आहेत.


 



जाट समाजाचं प्राबल्य?

जाट समाज हा फक्त उत्तर प्रदेशमध्येच आढळत नाही तर, हरियाणा, राजस्थानमध्ये देखील आढळतो. हरियाणामध्ये तर या समाजाचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या जवळपास 1/4 आहे. संपूर्ण पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जाट समाजाच्या लोकसंख्येचा विचार केला तर ही संख्या 4 ते 5 टक्के आहे. मात्र, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ही संख्या 17 टक्के आहे. जाट मतदारांचा पश्चिमी उत्तर प्रदेशच्या 70 ते 80 विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव जाणवतो. तर बागपत, शामली, बिजनोर, मुझफ्फरनगर, मेरठ, अलिगड, मुरादाबाद आणि मथुरा या जिल्ह्यातील 30 ते 40 मतदारसंघांवर थेट प्रभाव पडतो.

जाट समाज कोणासोबत जाणार?




 


आतापर्यंतचे आकडे पाहिले तर 2017 ला जाट समाज हा भाजपसोबत असल्याचं दिसून येतं. 2017ला भाजपला या भागातून 104 जागा मिळाल्या होता. भाजपच्या या ऐतिहासिक विजयामध्ये जाट समाजाचे मोठे योगदान होते. 2012 ला पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला अवघ्या 19 जागा मिळाल्या होत्या. तर, 2017 ला याच भागातून भाजपने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत 104 जागा मिळवल्या होत्या. भाजपच्या या विजयामागे 2013 साली झालेल्या मुजफ्फरनगर दंगलीचा मोठा प्रभाव होता. मुजफ्फरनगर दंगलीमुळे समाजवादी पार्टी आणि इतर पक्षांवर हिंदू समाज मोठ्या प्रमाणात नाराज आहे. त्यामुळेच 2013 नंतर झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला मोठा विजय मिळाला आहे.


 



RLD सोबतच्या गठबंधनचा फायदा सपाला होणार का?

RLD ने या अगोदर भाजप आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत आरएलडीने भाजपसोबत युती केली होती. या निवडणुकीत पश्चिम उत्तर प्रदेशमधील 7 जागांवर आरएलडीने उमेदवार उभे केले होते. यापैकी आरएलडीला 5 जागा मिळाल्या होत्या. तर संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 10 जागा मिळाल्या होत्या. 2012 ची विधानसभा निवडणूक आरएलडीने काँग्रेससोबत लढवली होती यावेळी दोनही पक्षांना 17 जागा मिळाल्या होत्या. तर 2017ला स्वतंत्र लढणाऱ्या आरएलडीला फक्त एक जागा मिळाली होती.

भाईचाऱ्याचा विजय होणार का...?

2013 च्या मुझफ्फरनगर दंगलीनंतर मुस्लीम आणि जाट समाजामध्ये फुट पडली. मुझफ्फरनगर हा हिंदू-मुस्लीम एकतेचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. या अगोदर उत्तर प्रदेशमध्ये अनेकवेळा दंगली झाल्या, मात्र, त्याचा प्रभाव मुझफ्फर नगरवर कधीही झाला नाही, असं जाणकार सांगतात. मात्र, मुझफ्फर दंगलीने विभागलेला समाज चौधरी जयंत सिंह आणि अखिलेश यादव यांच्या हात मिळवणीने एकत्र येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जाट आणि मुस्लिम समाजाची मतं अखिलेश आणि जयंत चौधरी यांच्या गठबंधनाला मिळतील का?

या भागात मुस्लिम समाजाची 27 टक्के मतं आहेत. जाट समाजाची 12ते 15टक्के मतं आहेत. मुस्लिम समाजाची बहुतांश मतं सपाच्या मागे उभे राहण्याची शक्यता आहे. मात्र, 12टक्के असलेला जाट समाज जयंत चौधरी यांच्या RLD मागे पूर्णपणे उभा राहताना दिसत नाही. मुझफ्फरनगर दंगलीने दुखावलेला हा समाज भाजपसोबत जोडला गेला आहे. मात्र, चौधरी चरणसिंह आणि अजितसिंह चौधरी यांच्या काळापासून भावनिकदृष्ट्या चौधरी कुटुंबासोबत जोडलेला समाज आजही "जयंत हमारे कलेजा का टुकडा है, इस बार गठबंधन की सरकार" असं सांगतात.

2012 आणि 2017 मधील मतांची टक्केवारी पाहिली तर सपाच्या मतांच्या टक्केवारीमध्ये फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. मात्र, RLD आणि काँग्रेसच्या मतांमध्ये मोठा फरक पडला आहे. ही मतं भाजपकडे वळल्याचं दिसून येतं. भाजपकडे गेलेली ही मतं पुन्हा आरएलडीकडे येताना दिसत नाही.

हाथरस घटनेने दुखावलेला वाल्मिकी समाज कोणासोबत?

हाथरस येथे एका मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. यामध्ये या मुलीचा मृत्यू झाला होता. मृत मुलींचं प्रेत तिच्या घरच्यांना न देता पोलिसांनी परस्पर जाळले होते. ही मुलगी वाल्मिकी समाजातील होती. काँग्रेसने मृत मुलीच्या आईला उमेदवारी दिली आहे. आम्ही बागपत जिल्ह्यातील वाल्मिकी समाजातील लोकांशी बातचीत केली तेव्हा ते म्हणाले… "हाथरस मे हमारे साथ बीजेपी ने क्या किया? हमे राशन दिया लेकीन हमारी बेटी के साथ क्या किया? हम अखिलेश के साथ है" हाथरसचा मुद्दा काँग्रेसने मोठ्या प्रमाणात उचलला मात्र, त्याचा फायदा सपाला होताना दिसत आहे.

भाषण नाही राशन भाजपला तारणार?

गरिबांना कोरोनामुळे उत्तर प्रदेशमध्ये राशन दिले जात आहे. याचा फायदा खास करून दलित वर्गाला मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे हा वर्ग भाजपसोबत जोडला गेला आहे. हा वर्ग भाजपच्या घरकुल योजना, उज्ज्वला गॅस योजना या डायरेक्ट टू होम स्कीमचा लाभार्थी आहे. त्यामुळं मायावतींचा पारंपरिक मतदार असणारा हा वर्ग भाजपकडे वळताना दिसतो आहे. गेल्या काही वर्षात अति गरीब मतदारांवर फोकस केल्याचा दिसून येते.

मुझफ्फर नगर अलमपूर खेडी मधील फळ विकणारे सांगतात…

"खाना दिया है, गरिबो को और क्या चाहिए? गरिबो को जो चाहिए? मोदी ने और योगी ओ सब दिया है…"यावरून गरीब आणि दलित वर्गातील लोक भाजपवर फारसे नाराज नसल्याचं दिसून येतं.

भाजपसाठी तीन जमेच्या बाजू

भाजपने पाच वर्षे केलेल्या कामामुळे लोक खूश आहेत. त्यामध्ये रस्ते, वीज, कायदा आणि सुव्यवस्था (दंगा मुक्त यूपी) या तीन गोष्टीमुळे मतदार भाजपला मतदान करणार असल्याचे सांगत आहेत.

असदुद्दीन ओवेसींचा किती प्रभाव असेल?

असुद्दीन ओवेसींवर हल्ला झाल्यानंतर आम्ही बागपत जिल्ह्यातील रटोल या मुस्लीम भागात भेट दिली. येथील मुस्लीमांशी बातचीत केली असता, "ओवेसी बीजेपी की मदत कर रहा है, ये गोलिया वालिया सब ड्रामा है. हम अखिलेश के साथ खडे है… इस बार गठबंधन की सरकार आयेगी.." असं मत इथल्या मुस्लीम समाजातील लोकांनी व्यक्त केलं आहे.

तरुणांचा पाठिंबा अखिलेश- जयंत चौधरी यांना?

अखिलेश यादव आणि जयंत चौधरी या दोन तरूण नेत्यांच्या मागे तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात उभा आहे. त्याचे कारण बेरोजगारी आणि महागाई असल्याचं तरूण सांगतात. दोघंही शिकलेले आहेत, त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजते, असं मत मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बघरा येथील एका तरूणाने व्यक्त केले आहे.

मायावतींचं काय?

मायवतींना मानणारा एक पारंपरिक वोटर प्रत्येक गावात आहे. खासकरून दलित समाजामध्ये आहे. मात्र, भाजपच्या सरकारी योजनांचा लाभार्थी झालेला हा वोटर आता भाजपला मत देणार असल्याचं सांगत आहे. त्यामुळे मायावतींचा वोटर बेस कमी होत जरी असला तरी त्याचा फायदा सपा आणि आरएलडीला होताना दिसत नाही आणि हा व्होटरच सपा आणि आरएलडीच्या गटबंधनला रोखण्यास भाजपला मदत करणारा ठरु शकतो.

यावरुन पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचा प्रेझेन्स दिसत नसला तरी त्यांची मतं कोणाकडे जातात यावर भाजपचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर आरएलडी ज्या जाट समाजाच्या भरवशावर विजयाचा दावा करत आहे, तो समाज किती प्रमाणात यांच्या सोबत येतो. यावर गठबंधनाचा विजय अवलंबून आहे.

Tags:    

Similar News