शांतीत क्रांती...आता नंबर कुणाचा?

नारायण राणे यांची टीका आणि अटक नाट्य या दरम्यान मुख्यमंत्री एक शब्दही बोललेले नाहीत. पण त्यांनी केलेल्या कार्यक्रमाची चर्चा मात्र जोरदार आहे. त्यामुळेच आता पुढचा नंबर कुणाचा अशी चर्चा सुरू झाली आहे.;

Update: 2021-08-25 15:34 GMT

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली आणि राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार सुरू केले. मुंबईमधून सुरू झालेल्या यात्रेत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना थेट लक्ष्य केले. यानंतर राणेंच्या हल्ल्यांची धार वाढत गेली आणि अखेर राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा करताच त्यांना पोलीस खाक्या दाखवला गेला...आता राणेंनी यापुढे अशी भाषा वापरणार नाही, अशी हमी दिली आहे. राणेंना काही तासात जामीन मिळाला असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकही शब्द न बोलता राणेंना अद्दल घडवली असे बोलले जाते आहे...

अर्णब गोस्वामीची तुरुंगवारी



 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या कार्यशैलीची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. याआधी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांना अरे तुरेची भाषा वापरणाऱ्या अर्णबलाही धडा शिकवला गेला. सुशांत सिंह प्रकरणी अर्णबने चालवलेल्या धुमाकुळाला कोणतेही उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले नाही. पण अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णबला सकाळी सकाळी त्याच्या घरातून पोलिसांनी खेचून काढले. अर्णबला काही दिवस तुरुंगाची हवा खाली लागली... एवढेच नाही तर या प्रकरणात अर्णबला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन जामीन मिळवावा लागला....या प्रकरणातून अर्णबला दिलासा मिळत नाही तोच त्याच्या मानगुटीवर टीआरपी घोटाळ्याचे भूत बसले. मुंबई पोलिसांनी हा टीआरपी घोटाळा उघड केला. एवढेच नाही तर अर्णब गोस्वामी आणि टीआरपी घोटाळ्याचा सूत्रधार बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या वॉट्सअप संभाषणातून समोर आलेल्या माहितीमुळे मोदी सरकारही टीकेचे धनी ठरले...तर अर्णब गोस्वामीच्या विश्वासार्हतेला कायमचा डाग लागला....

कंगनाला महापालिकेचा दणका



 


एकीकडे अर्णबला धडा शिकवत असताना ठाकरे सरकारने कंगना रानावात हिलाही धडा शिकवण्यासाठी योग्य संधीची वाट पाहिली आणि तशी संधी मिळताच कारवाई झाली. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कंगनानं मुंबई पोलिसांवर अकार्यक्षमतेचे आरोप केल्याने पुढं शिवसेना आणि कंगनामध्ये शाब्दिक युद्ध रंगले. शिवसेना नेत्यांना उत्तर देत असताना कंगनाने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी झाल्याचं वक्तव्य केले. या वादानंतर मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयात बेकायदा बांधकामाचा ठपका ठेवत ते तोडण्याची कारवाई केली. कोर्टाने ही कारवाई बेकायदा ठरवत महापालिकेला दणका दिला पण शिवसेनेला जो संदेश द्यायचा होता ते काम झाले होते....

परमबीर सिंहांविरुद्ध कारवाईला सुरूवात

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीची अवघ्या महाराष्ट्राला माहिती झाली आहे....त्यामुळे पुढचा नंबर कुणाचा अशी चर्चाही सुरू झाली आहे...यात सगळ्यात पहिले नाव येते ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे....मुकेश अंबानी यांच्या घरापुढील स्फोटकांच्या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. पण परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केला आणि ठाकरे सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागगाल....यावरही मुख्यमंत्र्यांनी तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि कारवाई केली नाही...पण आता परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीचा आरोप करणाऱ्या ४ तक्रारी मुंबई आणि ठाण्यात दाखल झाल्या आहेत. परमबीर सिंहांच्या खास मित्राला अटकही झाली आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारचा पुढचा कार्यक्रम काय अशी चर्चा सुरू झाली आहे....

किरीट सोमय्यांच्या कुटुंबियांवर चौकशीचे सावट



 


यानंतर आणखी एक नाव म्हणजे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या....उद्धव ठाकरे यांच्यावर आतापर्यंत भ्रष्टाचाराचा थेट आरोप कधीच झाला नव्हता पण किरीट सोमय्या यांनी पहिल्यांदा ठाकरे परिवारावर आरोप केले. त्यामुळेच २०१९च्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याची किंमत म्हणून भाजपला सोमय्या यांची उमेदवारी टाळावी लागली होती. किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर थेट जमीन खरेदीचे आरोप केले आहेत. दरम्यान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी खोटे आरोप केले म्हणून किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. तर दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी १६ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम सीआरझेड व कांदळवन क्षेत्रात केल्याच्या आरोपाची चौकशी राज्य सरकारने सुरू केली आहे. तर किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्याचीही खंडणी प्रकऱणी चौकशी करण्यात आली आहे.

प्रसाद लाड यांच्यावरील आरोपांच्या चौकशीचे संकेत 


 



 




 


यानंतर शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेले शिवसेना भवन फोडण्याची भाषा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली. या दरम्यान पिंपरीमध्ये प्रसाद लाड यांचे कुटुंबीय सदस्य असलेल्या कंपनीने पिंपरीमधील स्मार्ट सिटीच्या कामात ११० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच स्थानिक नेत्यांनी कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे भविष्यात लाड यांच्याविरुदधच्या कारवाईला गती येते का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे...

Tags:    

Similar News