देशामध्ये सध्या तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे. यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्रीय मंच मार्फत शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षांची एक बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक तिसऱ्या आघाडीच्या चर्चेसाठी असल्याचं सांगण्यात येत होतं, तर त्यापूर्वी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या दोनवेळा भेटी झाल्याने भाजपविरोधी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नांना वेग आल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीला काँग्रेसतर्फे कोणीही गेले नव्हते. त्यामुळे ही तिसरी आघाडी काँग्रेसला वगळून होणार का अशीही चर्चा सुरू आहे.
पण या सर्व पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे विधान केले आहे. तिसरी आघाडी केलीच तर त्याचा फायदा मोदी आणि भाजपला होईल हे उघड आहे. त्यामुळे कोणीही असा प्रयत्न करणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला नाना पटोले यांनी शरद पवार यांना लगावला आहे. त्याचबरोबर देशात मोदींविरोधात कोणतीही राजकीय आघाडी निर्माण झाली तरी काँग्रेसचा सहभाग असल्याशिवाय ही आघाडी यशस्वी होऊ शकणार नाही असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.