महाराष्ट्रातल्या या सहा राज्यसभा खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार का ?
राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली खरी मात्र निवृत्त होणाऱ्या महाराष्ट्रातल्या सहा खासदारांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी मिळणार का ? याबाबत आता सर्वाना उत्सुकता आहे. निवडणूक आयोगाने १५ राज्यांतील ५६ राज्यसभा जागांसाठी २७ फेब्रुवारी ही मतदानाची तारीख निश्चित केली आहे. आणि त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीचे वेळापत्रक आयोगाने आता जाहीर केले आहे.
१५ राज्यांतील ५६ सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ मध्ये संपत आहे.राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार कोणते ?
केंद्रीय मंत्री नारायण राणे
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
भाजपचे खासदार व्ही. मुरलीधरन
काँग्रेस खासदार कुमार केतकर
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई
राष्ट्रवादी पवार गटाच्या खासदार वंदना चव्हाण
या खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार का ?
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, कुमार केतकर, अनिल देसाई, व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे या निवृत्त खासदारांना पुन्हा राज्यसभेत जाण्यासाठी उमेदवारी मिळणार का ? याबाबत खूप मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सूक्ष्म लघुउद्योग खात्याची जबाबदारी सांभाळत आहेत आणि भाजपाची भूमिका ते महाराष्ट्रात अत्यंत आक्रमकपणे मांडत असतात. याशिवाय उद्धव ठाकरेंच्या विरोधात त्यांनी अनेकवेळा मोर्चा काढलेला आपण पाहिला आहे. आता त्यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी मिळते की रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी भाजप त्यांना निवडणुकीच्या मैदानात उभे करते, हे पाहावे लागेल. प्रकाश जावडेकर यांना भाजपने मंत्रिपदावरून सुरू करत पक्षसंघटनेची जबाबदारी दिली आहे. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का याबाबत अजूनही शंका व्यक्त केली जातेय. भाजपचे खासदार व्ही. मुरलीधरन हे केरळचे भाजपचे संघटनात्मक जबाबदारी उत्तमपणे सांभाळणारे महत्वाचे नेते २०१८ साली महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. काँग्रेस खासदार कुमार केतकर यांना काँग्रेसची पुन्हा उमेदवारी मिळेल की महाराष्ट्राबाहेरील उमेदवरला संधी मिळेल हे केवळ कॉँग्रेसच्या लहरी निर्णयावर अवलंबून आहे.याचे कारण असे की,यापूर्वी इम्रान प्रताप गढी या उत्तरप्रदेशच्या कवी असणाऱ्या व्यक्तीला त्यांनी महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवले होते. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमीच आहे, कारण त्यांच्या आमदारांची संख्या खूपच घटली आहे. अशीच स्थिती आहे, राष्ट्रवादी पवार गटाच्या खासदार वंदना चव्हाण यांची. आता केतकर,देसाई आणि चव्हाण यांच्या तीन जागांवर नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव,भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नावांचा समावेश होतो.
आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल कार्यकाळ२ एप्रिल २०२४ ला संपत आहे. ओडिशा आणि राजस्थानमधील खासदारांचा कार्यकाळ ३ एप्रिल २०२४ ला संपणार आहे.
कोणत्या राज्यात किती जागा ?
उत्तरप्रदेश १०
महाराष्ट्र ६
बिहार ६
पश्चिम बंगाल ५
मध्यप्रदेश ५
गुजरात ४
कर्नाटक ४
आंध्रप्रदेश ३
तेलंगणा ३
राजस्थान ३
ओडिशा ३
उत्तराखंड १
छत्तीसगढ १
हरियाणा १
हिमाचल प्रदेश १
५६ राज्यसभा खासदारांसाठी होणारी निवडणूक ही लोकसभा निवडणूक समोर ठेवूनच लढवली जाईल. जेणेकरून निवडून येणाऱ्या खासदारांचा उपयोग लोकसभा निवडणुकीत केला जाईल.शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षाचा मोठा कस लागणार आहे. यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाची विधानसभेतली कमकुवत संख्या पाहता त्यांचे उमेदवार निवडणुकीत उभे राहतील का हा सर्वात मोठा सवाल आहे.