राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून वातावरण तापले आहे. तर शिवसेनेने दुसरा तर भाजपने तिसरा उमेदवार देत राज्यसभेची सहावी जागा आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे. मात्र आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने राज्यसभा निवडणूकीत कोण माघार घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.;
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने महाविकास आघाडीकडून संजय पवार यांना उमेदवारी दिल्याने राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच शिवसेनेने ही जागा प्रतिष्ठेची करत आपल्याला अपक्षांचा पाठींबा असल्याचे म्हटले आहे. तर भाजपनेही या जागेसाठी कोल्हापुरचे धनंजय महाडिक यांना उमेदवारी देत लढाई प्रतिष्ठेची केली आहे.
त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत अपक्ष आमदारांचे मत निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट करतानाच मतांची बेरीज मांड़ली. तसेच कोणते अपक्ष आमदार भाजपला पाठींबा देणार याबाबतही माहिती दिली. त्यामुळे भाजपने धनंजय महाडिक यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ही जागा महाविकास आघाडीच जिंकणार असल्याचे म्हटले आहे. मात्र आज राज्यसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या निवडणूकीतून कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप या निवडणूकीत दोन जागा सहज निवडून आणू शकते. त्यामुळे या दोन जागांवर भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना संधी दिली आहे. तर तिसऱ्या जागेवर कोल्हापुरचे धनंजय महाडिक यांना संधी दिली आहे. मात्र या तिसऱ्या जागेसाठी भाजपला मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे. दरम्यान भाजपकडून या निवडणूकीत घोडेबाजार होणार असल्याची शक्यता शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. मात्र या निवडणूकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होणार नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पत्रकार परिषदेत बोलताना या निवडणूकीत कोणत्याही उमेदवाराच्या विजयासाठी अपक्ष आमदारांची मतं निर्णायक ठरणार असल्याचे म्हटले आहे. तर धनंजय महाडिक हे पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असल्याने त्यांचा राष्ट्रवादीत संपर्क चांगला असल्याने राष्ट्रवादीची मतं फुटू शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.
याबरोबरच या निवडणूकीत घोडेबाजार झाला तर भाजपची सरशी होऊ शकते, असाही एक सुर आहे. मात्र अपक्ष आमदारांचा पाठींबा कोणाच्या पाठीशी असणार आहे, याचा अंदाज घेऊन आज दुपारी 4 पर्यंत धनंजय महाडिक माघार घेणार की, संजय पवार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच आज दुपारनंतर लढाईची दिशा ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र अंतिम क्षणी ही निवडणूक बिनविरोधही होऊ शकते, असेही मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यसभेची सहावी जागा बिनविरोध होणार का? याविषयी अनिश्चितता असणार आहे.