सध्या दिल्ली येथे शरद पवारांच्या निवासस्थानी बैठका सुरु आहे. मोदी सरकारच्या विरोधात आघाडी तयार करण्याचं काम सध्या शरद पवार करत असल्याचं बोललं जात आहे. ही 'राष्ट्र मंच'ची बैठक असल्याचं सांगितलं जात असलं तरी या मंच मधील कॉंग्रेस सदस्य या बैठकापासून अलिप्त आहे. त्यामुळं पवार ही तिसरी आघाडी तयार करत असल्याची चर्चा राष्ट्रीय राजकारणात सुरु आहे.
सध्या शरद पवारांच्या या बैठकांची देशभरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु असली तरी या चर्चेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांपैकी शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, सुनिल तटकरे, प्रफुल पटेल हे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकांमध्ये अजित पवार दिसले नाही.
या निमित्ताने शरद पवार महत्त्वाच्या राजकीय बैठकांना, खासकरुन दिल्लीतील बैठकांना अजित पवारांना का घेऊन जात नाही? अजित पवार सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते राज्यात पक्षाचे महत्त्वाचे निर्णय घेत असतात. तरीही अजित पवार यांना राष्ट्रीय स्तरावरील या बैठकांना बोलावण्यात आलेलं नाही. विशेष बाब म्हणजे हे पहिल्यांदाच घडतंय असं नसून असं नेहमीच केलं जात असल्याचं वारंवार दिसून आलं आहे.
या संदर्भात आम्ही काही राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांशी चर्चा केली.
एबीपी माझाचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम सांगतात...
सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. आणि अजित पवार यांना राज्याच्या राजकारणात रस आहे. तशी विभागणी देखील आपल्याला पाहायला मिळते. तसं शरद पवार यांनी जाहीर मुलाखतीत अनेक वेळा सांगितलं देखील आहे. आणि विशेष बाब म्हणजे स्वत: अजित पवार देखील राष्ट्रीय राजकारणापासून अलिप्त असतात. त्यामुळं दूर ठेवलं जातं असं नाही. अजित पवार स्वत:च राष्ट्रीय राजकारणापासून अलिप्त आहेत.
असं मत प्रशांत कदम यांनी व्यक्त केलं आहे.
या संदर्भात आम्ही हेमंत देसाई सांगतात...
अजित पवार पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. मात्र, त्यानंतर ते राज्यात आले. आणि राज्यातच रमले. अजित पवार यांना राज्याच्या राजकारणातच रस आहे. सुप्रिया सुळे यांना देशपातळीवर राजकारणात रस असल्याचं पवारांनी सांगितलं होतं. विशेष बाब म्हणजे अजित पवार देखील स्वत:हून दिल्लीच्या राजकारणात रस दाखवतात का? हा प्रश्न असल्याचं देसाई सांगतात. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय राजकारणात आपले संबंध प्रस्थापित केले आहेत. राहुल गांधी असो किंवा इतर पक्षातील सर्व महिला खासदार असो या सर्व गटांमध्ये सुप्रिया सुळे सतत सक्रीय असतात. त्या पद्धतीने अजित पवारांनी कधीही राज्यातील बाहेरील नेत्यांशी संबंध प्रस्थापित केले नाही.
हेमंत देसाई सांगतात... यावरुन मराठी माणसाच्या मर्यादा दिसून येतात. राज ठाकरे इतके प्रभावी वक्ते आहेत. मात्र, ते दिल्लीच्या दृष्टीकोनातून कधी विचार करत नाही. बाळासाहेबांनी देखील तसा विचार केला नाही. मात्र, अलिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत जातात. त्यांना दिल्लीच्या राजकारणात रस दिसून येत आहे. मात्र, आदित्य ठाकरे निश्चित दिल्लीत जाण्याच्या विचारात आहे. भाषेवर प्रभूत्व आहे. त्यामुळं आदित्य ठाकरे दिल्लीत रमण्याची शक्यता आहे. बाकी अजित पवारांनी दिल्लीत संबंध प्रस्थापित करणं काही वाईट नाही. असं मला वाटतं. मात्र, ते स्वत: ते करत नाही. त्यांच्या भाषणातून देखील राष्ट्रीय प्रश्नावर भाष्य करताना ते दिसून येत नसल्याचं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी सांगितलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सांगतात...
सध्या दिल्लीमध्ये ज्या बैठका सुरु आहेत. त्या बैठकांमध्ये अजित पवार का नाही. अशी चर्चा आहे. त्यामुळं संशय निर्माण होतो. मात्र, ती बैठक 'राष्ट्रीय मंच' ची होती. आता ती फक्त शरद पवार यांच्या घरी झाली. यशवंत सिंन्हा यांनी ती आयोजीत केली होती. फक्त ती पवारांच्या घरी झाल्यानं चर्चा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दिल्लीत पार्लमेंटरी बोर्डाची देखील बैठक झाली. अजित पवार खासदार नाहीत. त्यामुळे अजित पवारांची या मीटिंगला उपस्थिती नव्हती.
अजित पवारांना या बैठकांपासून दूर ठेवलं जातंय अशातला काहीही भाग नाही. अजित पवारांची राष्ट्रवादीमध्ये ताकद आहे. ते भाजप सोबत गेले आणि परतही सन्मानाने आले. यावरुन त्यांची संघटनेमध्ये किती पकड आहे. आणि काय स्थान आहे. हे दिसून येते.
असं मत अशोक वानखेडे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं आहे.
या संदर्भात आम्ही राजकीय पत्रकार विलास आठवले यांच्याशी बातचीत केली ते सांगतात...
सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रीय राजकारणातील वजन कायम राहावं. आणि राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचा दबदबा कायम राहावा यासाठी पवारांची रणनीति आहे. मध्यंतरी घडलेल्या सर्व प्रकारानंतर अजित पवारांवर शरद पवारांचा विश्वास असल्याचं दिसून येत नाही. त्यामुळं भविष्यात पवारांच्या रणनीतिला धोका होऊ नये. म्हणून अजित पवारांना राष्ट्रीय राजकारणापासून दूर ठेवलं जात असल्याचं मत विलास आठवले यांनी सांगितलं.
एकंदरीत सर्व राजकीय विश्लेषकांची मत पाहिली तर एक बाब लक्षात येते. सुप्रिया सुळे दिल्लीत अजित पवार महाराष्ट्रात हे पवारांचं सूत्र आहे. दुसरी बाब म्हणजे स्वत: अजित पवार दिल्लीच्या राजकारणात लक्ष घालत नाही. असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मात्र, ज्येष्ठ पत्रकार विलास आठवले यांच्या मते पवारांची ही राजकीय चाल आहे.