डंकापतींच्या अंधभक्तांना समजतं ते विरोधकांना का समजत नाही: तुषार गायकवाड

राहुलचे वक्तव्य माफीच्या अनुषंगाने योग्यच आहे! पण उध्दव ठाकरेंनी सावरकरांना दैवत घोषित करणे, सावरकरांनी स्वातंत्र्य मिळवून दिले वगैरे वल्गना करणे हास्यास्पद आहेत. मात्र तरीही सध्या दोघांनी व दोघांच्या समर्थकांनी राजकीय सूज्ञपणा दाखवत सध्या हा विषय खुंटीवर टांगून ठेवला पाहिजे, असं विश्लेषण लेखक तुषार गायकवाड यांनी केलं आहे.

Update: 2023-03-27 06:38 GMT

राहुलचे वक्तव्य माफीच्या अनुषंगाने योग्यच आहे! पण उध्दव ठाकरेंनी सावरकरांना दैवत घोषित करणे, सावरकरांनी स्वातंत्र्य मिळवून दिले वगैरे वल्गना करणे हास्यास्पद आहेत. मात्र तरीही सध्या दोघांनी व दोघांच्या समर्थकांनी राजकीय सूज्ञपणा दाखवत सध्या हा विषय खुंटीवर टांगून ठेवला पाहिजे, असं विश्लेषण लेखक तुषार गायकवाड यांनी केलं आहे.

डंकापतींनी व त्यांच्या आयटी सेलसह सर्व समर्थकांनी आम्ही किती प्रखर राष्ट्रवादी आहोत? हे दाखविण्यासाठी 'इस देश में रहना होगा। तो वंदे मातरम् कहना होगा।' हा नारा संघ सरकार पासून ग्रामपंचायत पातळीपर्यंत बुलंद केला होता. 'वंदे मातरम्' म्हणजे जणूकाही नवहिंदुत्वाचा आत्माच असल्याचे चित्र निर्माण केले. यावरुन अनेक वादग्रस्त घटना घडल्या.

पण, जेव्हा विषय केंद्रातील व बिहार राज्यातील राजकीय सत्तेचा आला. तेव्हा केवळ सत्ता पाहिजे म्हणून सरड्यालाही काॅम्प्लेक्स येईल एवढ्या विद्युतवेगाने 'वंदे मातरम्' गुंडाळून खिशात घातले! आणि 'वंदे मातरम्' ला विरोध असलेले नितीशकुमार भाजपाचे बिहार राज्यातील मुख्यमंत्री पदाचे अधिकृत दावेदार केले.

नितीन कुमार आज एनडीए सोबत नाहीत! पण एनडीए मध्ये असतानाही नितीश कुमार हे एकमेव असे नेते होते, जे डंकापतींच्या व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसायचे. पण डंकापतींनी 'वंदे मातरम्'चा उद्गघोष केल्यास स्वतः शांत रहायचे.

कारण जनता दल युनायटेड या नितीशकुमारांच्या पक्षाचा 'वंदे मातरम्'ला विरोध आहे. तरीही डंकापंतीसह महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी नागपूरच्या पंतांनी नितीशकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रचार केला. त्यावर डंकापती समर्थक किंवा नितीशकुमार समर्थकांनी उर बडवेगिरी केली नाही.

यातून राहुल गांधी व काँग्रेस समर्थक, तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व त्यांचे समर्थक शिवसैनिकानी बोध घेणे आवश्यक आहे. विनायक दामोदर सावरकरांना जोपर्यंत ब्रिटीशांनी पकडले नव्हते तोपर्यंत ते शेंडी जानव्याच्या हिंदुत्वाचेच पूजक होते. जेव्हा त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांना जन्मठेप झाली, त्यानंतर तो वैयक्तिक सूड घेण्यासाठी विदांनी लंडनहून पिस्तुल पुरवले व त्यामध्ये त्यांना अटक झाली.

अंदमानातील सावरकरांचे तथाकथित छळ, माफीनामे व सुटकेनंतर ब्रिटिश साम्राज्याची पेन्शन हे देशकार्य किंवा हिंदुत्व नाही! आजच्या भाषेत स्वातंत्र्यलढ्याशी गद्दारी होती. सावरकरांच्या हिंदू महासभेच्या अनेक ब्राह्मण कार्यकर्त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकार मध्ये काम करणाऱ्या क्रांतिकारकांच्या वास्तव्याचे पुरावे ब्रिटिश पोलिसांना पत्र लिहून कळवण्याचे नीच कार्य केले. त्यास स्वातंत्र्यलढा किंवा देशकार्य कसे म्हणायचे?

अंदमानातून सुटल्यावर सावरकरांनी ब्रिटिशांच्या विरुध्द काहीच केले नाही. त्याऐवजी द्विराष्ट्रवादाचा सिध्दांत मुस्लीम लीगच्या आधी मांडला. १९४२ च्या चले जाव चळवळीत देशातील सर्व प्रांतिक सरकारे बरखास्त करुन संपूर्ण राजकीय पक्ष चळवळीत सहभागी झाले असताना हिंदू महासभेचे सावरकर आणि संघाचे वंदनीय शामाप्रसाद मुखर्जी मुस्लीम लीग सोबत बंगाल व सिंध प्रांतात सत्ता उपभोगत होते.

स्वातंत्र्याच्या वाटाघाटीसमयी आपली संस्थाने खालसा करुन भारतात सहभागी करु नका. म्हणून सावरकरांनी संस्थानिकांना पत्रे लिहिली. या कृतीत उध्दव ठाकरे व त्यांच्या शिवसैनिकांना देशकार्य कुठे दिसते?

त्याचप्रमाणे गांधी हत्येत पुरेश्या पुराव्याअभावी सुटलेल्या सावरकरांवर कपूर आयोगाने ठपका ठेवूनही, केवळ राजकीय साटंलोटं म्हणून काँग्रेसने आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरसांचा आणीबाणीस पाठिंबा घेतल्यानंतरच सावरकरांना राजमान्यता दिली. याचा विसर राहुल गांधी व काँग्रेस जणांना पडता कामा नये.

सावरकरांच्या बोगस लिखाणाची आणि शेंडी जाणव्याच्या हिंदुत्वाची चिरफाड प्रबोधनकार ठाकरेंनी केली आहे. टोपण नावाने लिखाण करुन बॅरिस्टर, वीर झालेले सावरकर ब्राह्मण समाजातील अंतर्गत राजकीय वर्चस्वाच्या लढ्यामुळे संघविरोधी होते. सावरकर हयात असेपर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रात संघाची शाखा सुरु होऊ दिली नव्हती.

हेडगेवार आणि गोळवलकर यांची स्वातंत्र्यलढ्याच्या विरोधातील कृत्ये सेफ ठेवण्यासाठी सावरकरांना हिंदुत्वाचे आयडाॅल करुन सावरकरांचा बोगसपणा भाजपा-संघाने २०१४ नंतर उघड करुन स्वतःची राजकीय पोळी भाजली आहे. डंकापतींसाठी सावरकर महत्त्वाचे असते तर गुजरातेत काँग्रेसच्या सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला नसता! याचे भान ठेवले पाहिजे.

२०१९ लोकसभा निवडणूकांच्या निकालात एनडीएला ३७ टक्के मताधिक्य आहे. तर एनडीए विरोधी पक्षांना मिळून ६३ टक्के मताधिक्य आहे. ३७ पेक्षा ६३ आकडा मोठा आहे. मात्र हा ६३ आकडा विखुरलेल्या स्वरुपात आहे तो सावरकर सारख्या अन्य चावून चोथा झालेल्या विषयांमुळेच! हा आकडा २०२४ ला एकत्र आला नाही तर आयुष्यभर पश्चातापाशिवाय काहीच मिळणार नाही!!

तेव्हा राहुल गांधी, उध्दव ठाकरे व दोन्ही पक्षाच्या समर्थकांसह डंकापती विरोधी नागरिकांनी 'नितीशकुमार - वंदे मातरम्' या राजकीय तडजोडी प्रमाणेच, सावरकर मुद्दा तडजोडीत काढला पाहिजे. उगाचच त्यावरुन चर्चितचर्वण करुन गुरांच्या रवंथा नंतरच्या फेसासारखा फेस उडवण्यात अर्थ नाही.

२०२४ मध्ये सत्तांतर झाले नाही किंवा डंकापतींचे पाशवी बहुमत कमी झाले नाही. तर सामान्य माणसाला दर्भा इतकाही फरक पडत नाही! खरा फरक राजकारण्यांना पडतो. त्यामुळे त्यांनीच स्वतःची सद्बुद्धी वापरुन समर्थकांना सद्बुद्धी प्रदान केली पाहिजे!

राहुलचे वक्तव्य माफीच्या अनुशंगाने योग्यच आहे! पण उध्दव ठाकरेंनी सावरकरांना दैवत घोषित करणे, सावरकरांनी स्वातंत्र्य मिळवून दिले वगैरे वल्गना करणे हास्यास्पद आहेत. मात्र तरीही सध्या दोघांनी व दोघांच्या समर्थकांनी राजकीय सूज्ञपणा दाखवत सध्या हा विषय खुंटीवर टांगून ठेवला पाहिजे!

- तुषार गायकवाड

Tags:    

Similar News