हर्षवर्धन जाधव: राजकारणातील 'वादग्रस्त' चेहरा

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव कायम वादात अडकलेले असतात, त्यांच्या वादग्रस्त राजकीय कारकीर्दीचा आढावा...;

Update: 2020-12-17 04:29 GMT

माजी आमदार तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई असलेलले हर्षवर्धन जाधव पुण्यातील घटनेने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र त्यांची ही काही पहिली वेळ नाही.या आधी सुद्धा ते अनेकदा आपल्या वादग्रस्त विधान आणि वेगवेगळ्या घटनांमुळे वादात सापडलेले आहेत.नेहमी चर्चेत राहणाऱ्या जाधव यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिली याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट..

सनदी अधिकारी व माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले रायभान जाधव याचे पुत्र म्हणजेच हर्षवर्धन जाधव याचं मूळ गाव पिशोर असून,ते कन्नड विधानसभा मतदारसंघात आहे. याच मतदारसंघाच रायभान जाधव यांनी जवळपास 12 वर्षे नेतृत्व केलं.मात्र 1997 ला त्यांचं निधन झालं आणि मतदारसंघात पोटनिवडणूक लागली.

तालुक्यात रायभान जाधव यांच्या जाण्याने दुःखाची लाट होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीत रायभान जाधव यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव यांनी ही निवडणूक जिंकली आणि पुढे त्या जवळपास अडीच वर्ष आमदार राहिल्या.

हर्षवर्धन जाधवांची राजकीय कारकीर्द..

हर्षवर्धन जाधवांची राजकारणात 1999 ला एंट्री झाली. आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा पिशोर सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणूक लढवत ती जिंकली सुद्धा.पुढे त्यांनी 2004 ला थेट विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली. मात्र त्यांना त्यात अपयश आले आणि पराभव झाला.

2004 चा अपयश पचवत जाधव यांनी मनसेची हवा सुरू असताना पुन्हा 2009 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा आमदार झाले.पुढे त्यांनी 2014 ला सुद्धा विजय आपल्याच पारड्यात पाडून घेतलं.

2019 मध्ये जाधवांना लोकसभा लढवण्याची हुक्की आली आणि ते थेट शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंच्या विरोधात रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र कोणत्याच पक्षात डाळ शिजत नसल्यामुळे अखेर स्वतःचाच पक्ष काढला आणि अपक्ष निवडणूक लढवली. परंतु त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून शांत बसतील ते जाधव कुठले. त्यामुळे त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. याच निवडणुकीच्या प्रचारात थेट उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका केल्याने जाधव पुन्हा वादात सापडले. आणि पुढे या निवडणुकीत सुद्धा त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

हर्षवर्धन जाधव आणि वाद...

राजकारणात एंट्री करतानाच जाधव यांचा सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासोबत वाद झाला आणि त्यांनी अभियंत्यांची गाडी कालव्यात ढकलून दिली. जाधव यांनी आपल्या या वादाचा इतिहास पुढेही कायम ठेवला.

2011 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वेरूळला दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेण्यावरून जाधव यांनी पोलीसांशी वाद घातला आणि या सर्व प्रकरकणात पोलिसांचा त्यांना मार खावा लागला.तसेच याच प्रकरणात पोलिसांना मारहाण केल्या प्रकरणी त्यांच्यावर खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला.

2014 ला शिवसेनेचे आमदार असताना नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेलेल्या जाधवांनी ठाकरेंच्या अंगरक्षकांच्या थोबाडीत मारली, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याच काळात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि यांच्यातील वाद इतका वाढला की दोन्ही नेते एकाच पक्षात असताना एकमेकांवर थेट आरोप करू लागले. त्यामूळेही जाधव बरेच काळ चर्चेत राहिले.

पुढे जाधव हे आपल्या कुटुंबातील वादामुळे पुन्हा चर्चेत आले. कौटुंबिक छळप्रकरणी औरंगाबाद शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात त्यांचाच पत्नीने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

त्यांनतर एका प्रकरणात जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर औरंगाबाद शहरात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.

त्यांनतर आता जाधव पुन्हा पुण्यामध्ये रस्त्यात गाडी आडवी लावून वृद्ध दाम्पत्याला जबर मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आले आहे. त्यामुळे वाद आणि हर्षवर्धन जाधव हे काही आता नवीन राहिलं नाही.

आमदारकीचा राजीनामा...

मराठा आरक्षणावरून राज्यात जुलै 2018 मध्ये वातावरण चांगलेच तापले होते. विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या, त्यामुळे राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आला होता. याच काळात 25 जुलै 2018 ला पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षण मिळत नसल्याने जाधव यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा दिला. त्यावेळीही जाधव चर्चेत आले होते.

राजकीय संन्यासाची घोषणा

जाधव-दानवे कुटुंबातील वाद सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून हर्षवर्धन जाधव यांनी आपण राजकीय निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. जाधव यांनी पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचं व्हिडीओत सांगितलं होत.

दानवे-जाधव वाद..

राजकीय सन्यास घेतल्याची घोषणा होऊन आठवडा उलटत नाही तो जाधव यांनी नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले.दानवे हे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून, मला त्रास देत आहे.मला जगू द्या आणि तुम्ही जगा.तसेच पुन्हा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी जीव देईन आणि तुम्हाला अडचणीत आणीन, अशी धमकी जाधव यांनी या व्हिडिओतून दिली होती.

कौटुंबिक वाद...

हर्षवर्धन जाधव हे रावसाहेब दानवे यांचे जावई आहे.मात्र गेल्या काही वर्षांपासून हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी यांच्यात वाद सुरू होते. घरात सुरू असलेले वाद जाधव यांनी चाहट्यावर आणून वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून दानवे कुटुंबावर टीका केली आहे. तर त्यांच्या पत्नी यांनी सुद्धा हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या आई विरोधात पोलीसात तक्रार केली होती.त्यामुळे गेल्या काही काळात काहीही झालं तर दानवेंचा हात असल्याचा आरोप जाधव यांनी सतत सुरू ठेवला.यामुळे त्यांची राजकारणात आणि इतर ठिकाणी किंमत राहिली नाही.

Tags:    

Similar News