उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 100 जागांचा फटका, ABP News-CVoter Survey चा अंदाज

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 100 जागांचा फटका, ABP News-CVoter Survey चा अंदाज Who Will Form The Next Government In UP? ABP-C Voter Survey Reveals

Update: 2021-11-14 03:47 GMT

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यात निवडणूका होणार आहेत. मात्र, या 5 राज्यांपैकी उत्तर प्रदेशमधील निवडणुकांवर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एबीपी-सी व्होटर सर्वेक्षणानुसार अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशमध्ये भाजपला कडवे आव्हान देताना दिसत आहे. सर्वेक्षणानुसार, भाजप उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सत्तेत येताना दिसत असलं तरी 2017 च्या निवडणुकीत मिळालेल्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे.

403 जागांच्या उत्तर प्रदेश विधानसभेत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना 213-221 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. समाजवादी पक्षाला आणि त्यांच्या आघाडीला 152 ते 160 जागा, बहुजन समाज पक्षाला 16 ते 20, काँग्रेसला 6 ते 10 आणि इतरांना 2 ते 6 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2017 ला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत भाजपला 325 च्या जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणूकीत त्यांना 100 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

भाजपने संजय निषाद यांच्या निषाद पक्ष, अपना दल (एस) यासह इतर काही छोट्या पक्षांशी युती केली आहे. समाजवादी पक्षाने सुहेलदेव यांच्या भारतीय समाज पक्ष, महान दल, राष्ट्रीय लोकदल यासह काही छोट्या पक्षांसोबत हात मिळवणी केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या आमदारांची संख्या 202 आहे, त्यामुळे भाजपकडे फारशी आघाडी नाही आणि सपाही या आकड्यापासून फारशी दूर नसल्याचं सर्वेक्षणातून दिसून येत आहे. अशा स्थितीत सर्वेक्षणानुसार निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं दिसून येते.

कोणाला किती मत मिळणार?

एबीपी-सी व्होटर सर्वेक्षणानुसार भाजप आणि युतीला 41%, सपा आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या आघाडीला 31%, बसपाला 15%, काँग्रेसला 9% आणि इतर पक्षांना 4% मते मिळू शकतात.

मुख्यमंत्री म्हणून लोकांची कोणाला पसंती?

41% लोकांना योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्री हवे आहेत. तर 32% लोकांना अखिलेश यादव, 16% लोकांमा मायावती, 5% लोकांना प्रियंका गांधी तर 2% लोक जयंत चौधरी मुख्यमंत्री व्हावेसे वाटतात.

कोणत्या मुद्द्यावर लोकांचं लक्ष?

सर्वेक्षणात कायदा आणि सुव्यवस्था हा उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा आहे. 30% लोकांनी या संदर्भात आपला कौल दिला आहे. तर राम मंदिर 14%, शेतकरी आंदोलन 15%, बेरोजगारी 17%, महागाई 15% लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत.

या सर्वेक्षणातून शेतकऱ्यांचे आंदोलन भाजपला मोठी हानी पोहोचवताना दिसत आहे. कारण लोकांनी हा महत्त्वाचा मुद्दा मानला आहे.

अखिलेश यादव आणि ओमप्रकाश राजभर यांच्या आघाडीने भाजपला फायदा होईल की नुकसान होईल, या प्रश्नावर 36 टक्के लोकांनी भाजपला फायदा होईल असं म्हटलं आहे तर 50 टक्के लोकांच्या मते या आघाडीने भाजपला नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा या सध्या उत्तर प्रदेशमध्ये चांगल्याच सक्रिय आहेत. त्यांच्या सक्रियतेचा काँग्रेसला फायदा होईल का? या प्रश्नाच्या उत्तरात 47 टक्के लोकांनी प्रियंका गांधी यांच्या उत्तर प्रदेशमधील सक्रियतेचा कॉंग्रेसला फायदा होणार असल्याचं म्हटलं आहे. तर 53 लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे.

एकंदरीत एबीपी-सी व्होटर सर्वेक्षणात उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि भाजपमध्ये थेट लढत होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, हा केवळ अंदाज आहे. प्रत्यक्षात आकडे निवडणूकीच्या निकालानंतरच समोर येतील.

Tags:    

Similar News