OBC आरक्षण – उ.महाराष्ट्रात ओबीसी नेतृत्व कुणाचे?? नणंद की भावजय?
उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून एकनाथ खडसे ओळखले जायचे. पण आता राष्ट्रवादीत गेल्याने या भागातील ओबीसी चेहरा कोण याकरीता खडसे नणंद-भावजय यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. पाहा आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांचा रिपोर्ट
राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी गेल्या दोन दिवसांपासून ओबीसीच्या मुद्द्यावर भाजप दुटप्पीपणा करत असल्याची टीका केली आहे. एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या रोहिणी खडसें यांनी भाजपचा ट्विटरच्या माध्यमातून समाचार घेतला आहे.
"ते आंदोलन करतांना मा.खडसें, मुंडे,तावडे,बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला ? हे सांगा ना..." असा टोला त्यांनी लगावला आहे.
रोहिणी खडसे यांनी दोन दिवसांपूर्वीही याच मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. तेव्हा भाजपच्या खासदार आणि रोहिणी खडसेंच्या भावजय रक्षा खडसे यांनी उत्तर दिले होते. आताही रक्षा खडसे यांनी रोहिणी खडसे यांना उत्तर दिले आहे. मागच्या वेळी रोहिणी खडसे यांना ओबीसी म्हणूनच भाजपने उमेदवारी दिली होती, अशी आठवण रक्षा ख़सेंनी करून दिली आहे. तसेच त्या राष्ट्रवादीच्या सदस्या असल्याने पक्षाने जसे सांगितलं असेल तसं त्या बोलत आहेत, असा टोलाही लगावला होता. ओबीसी समाजावर अन्याय न करता राजकारण बाजूला ठेऊन एकत्र आलं पाहिजे असंही मत रक्षा खडसें यांनी रोहिणी खडसेंच्या ट्विटला उत्तर देतांना मांडलं आहे.
ओबीसी नेतृत्वाची लढाई
भाजप सोडून राष्ट्रवादी घड्याळ हाताला बांधलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे ओबीसी नेता म्हणून ओळख जायचे. आता याच जागी आपले नाव असावे यासाठी खडसें परिवारातील दोन महिलांची लढाई तर सुरू झाली नाही,? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. रोहिणी खडसें-खेवलकर ह्या खडसेंच्या कन्या आहेत. तर भाजपच्या खासदार रक्षा खडसें यांची आणि रोहिणी खडसे यांचे नणंद-भावजय असे नाते आहे. रक्षा खडसें जळगावमध्ये ओबीसीं आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. उत्तर महाराष्ट्रात ओबीसी चेहरा म्हणून एकनाथ खडसेंच्या सून भाजपच्या खासदार रक्षा खडसें यांच्याकडे नेतृत्व दिल आहे. रक्षा खडसें यांच्या नेतृत्वात आज जळगाव येथ रास्ता रोखो आंदोलन सुरू असतांना रोहिणी खडसें यांनी ट्विट करून उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी नेता होण्याच्या लाढाईत आपणही मागे नाहीत हे दाखवून दिले आहे.