पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा अर्थ काय?
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमांमध्ये एक्टिव झाल्याचे दिसत आहेत. त्यातच 14 जून रोजी पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. पण या दौऱ्याचा नेमका अर्थ काय? जाणून घेण्यासाठी वाचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे अचानक महाराष्ट्राबाबत इतके सक्रीय का झाले आहेत? अशी चर्चा लोकांमध्ये रंगली आहे. त्यातच मोदी हे 14 जून रोजी दुपारी पुणे जिल्ह्यातील देहू येथे संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी येणार आहेत. त्यानंतर मोदी हे राजभवन येथे जल भवन नावाने बांधलेल्या इमारतीच्या उद्घाटन करून मुंबई समाचार या गुजराती दैनिकाला 200 वर्षे पुर्ण झाल्याच्या कार्यक्रमात बोलणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याची चर्चा रंगली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणूकीत भाजपने महाराष्ट्रातील तीनही जागा जिंकत महाविकास आघाडीला धक्का दिला. मात्र यानंतर शिवसेनेची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच 20 जून रोजी राज्यात विधानपरिषद निवडणूक पार पडणार आहे. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाला हजेरी लावत आहेत. त्यामुळे मोदी यांच्या दौऱ्याचा नेमका अर्थ काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा अर्थ
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेसह, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवरही प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या महापालिका क्षेत्रात केंद्र सरकारने विकासकामांचा सपाटा लावला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 मार्च रोजी पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी प्रवास सुलभ झाला. तसेच आता पंतप्रधान मोदी हे पुणे जिल्ह्यातील देहू दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्याकडून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवल्याची चर्चा आहे. कारण संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पणाच्या माध्यमातून राज्यात सर्वदूर पसरलेल्या वारकरी सांप्रदायाला चुचकारण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. तर वारकरी सांप्रदायाची संख्या मोठी असल्याने पंतप्रधान मोदी यांच्या देहू दौऱ्याचा मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिका निवडणूक
राज्याची आर्थिक राजधानी मुंबईची महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे ही महापालिका जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. त्यातच मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपल्यामुळे महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात पार पडणारी मुंबई महापालिका निवडणूक ही अत्यंत महत्वाची मानली जाते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जातो.
त्याबरोबरच मुंबईत मराठी लोकांसोबतच गुजराती लोकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मुंबई समाचार या गुजराती दैनिकाला 200 वर्षे पुर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान मोदी यांच्याकडून 14 जून रोजीच्या मुंबई दौऱ्यात गुजराती भाषिकांना आपलंस करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गुजरात विधानसभा निवडणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई समाचार या गुजराती दैनिकाच्या 200 व्या वर्षपुर्ती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचा फायदा मुंबईतील गुजराती भाषिक आणि गुजरातमधील नागरिकांवर प्रभाव टाकण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे राजकीय समीकरण डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान मोदी यांनी हा दौरा आयोजित केल्याची चर्चा आहे.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय दृष्टीने विचार करून हा दौरा आयोजित केला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.