गोवा काय आहे हे लवकरच फडणवीसांना कळेल : संजय राऊत
संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना गोव्याचा आनंद जास्त काळ टिकणार नसल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.;
फार चांगली गोष्ट आहे. गोवा जिंकून आल्यापासून त्यांचं मनोबल वाढलं आहे. गोवा काय आहे हे त्यांना लवकरच कळेल. गोवा पोर्तुगीज आणि इंग्रजांनाही कळला नाही. अनेक राजकीय पक्षांनाही गोवा काय आहे आणि गोव्याचं राजकारण कळलं नाही. गोवा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत. राजकीय कार्यात त्यांनी स्वत:ला वाहून घ्यावं, असा सल्ला शिवसेना खा. संजय राऊत यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते भ्रष्टाचारात अडकले असून जनतेचा आघाडी सरकारमधील नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. चार राज्यात यश मिळाले. आता मिशन महाराष्ट्र आहे. २०२४ मध्ये राज्यात स्वबळावर भाजपचे सरकार सत्तेत येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान शऱद पवारांनी मी भाजपाला २०२४ मध्ये राज्यात येऊ देणार नाही असं म्हटलं आहे. त्यासंबंधी बोलताना राऊत म्हणाले की, "भाजपाला कोणीही घाबरत नाही. जर भाजपा केंद्रीय तपास यंत्रणा, खोटे आरोप, चिखलफेक करुन महाविकास आघाडीचे आमदार, खासदार, नेते यांचं मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचं आहे, असं होणार नाही. शरद पवार यांनी जो विश्वास दिला आहे की, घाबरु नका मी भाजपा पुन्हा महाराष्ट्रात येऊ देणार नाही ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर महाविकास आघाडीच्या वतीनेही त्यांनी भूमिका मांडली आहे".
"भाजपातील आमचे मित्र रोज नव्या तारखा देत रंग उधळत आहेत. हे सर्व नकली रंग असून त्यावर केंद्र सरकारचीही बंदी आहे. त्यांना शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. काही झालं तरी भाजपा पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही. लोकशाही आणि राजकारणात प्रयत्न करायला काही हरकत नाही, त्यांनी प्रयत्न करत राहिलं पाहिजे," असं संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, "रेड हा त्यांचा आवडता रंग आहे म्हणण्यापेक्षा यात भेसळ आहे. हे भेसळीचे रंग वापरतात. तुमच्या भेसळीच्या रंगाला आम्ही घाबरत नाही. होळी वर्षातून एकदा येते पण यांचा शिमगा रोज सुरु आहे. आम्ही जर शिमगा करायला सुरुवात केला तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खणले आहेत आणि त्यात कोण पडेल, कोणाला ढकललं जाईल हे दिसेल".
"शिवसेना मोठा पक्ष आहे, शिवसेनेचं आव्हान आहे. ज्याचं आव्हान असतं त्याच्याविरोधात बोंब मारली जाते. भाजपाच्या दंडात ताकद आहे असं त्यांना वाटत असतं. पण तसं नाही कारण ते पाठीमागून वार करतात. राजकारणात पाठीमागून होणारे हल्ले पचवायचे असतात आणि आम्ही ते पचवत आहोत. ठाकरे सरकारला अडीच वर्ष झाली असून अजून अडीच जातील आणि पुढील पाच वर्ष पुन्हा आम्हीच सत्तेत येणार," असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केला.