देशाची राजधानी दिल्ली येथे रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे (UBT) अध्यक्ष उध्दव ठाकरे बोलताना आपल्या भाषणात म्हणाले की, एक देश आणि एका व्यक्तीचे सरकार देशासाठी घातक होईल. ही लोकशाही नसुन आपण हुकूमशाही कडे वाटचाल करत आहोत अशी भीती वाटत होती, पण ही आता भीती नाही, हे सत्य झाले आहे. आम्ही सर्वजण इथं निवडणुकीच्या प्रचारासाठी एकत्र आलेले नाही तर आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. हे कसलं सरकार आहे ? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
दरम्यान, ठाकरे असेही म्हणाले की, कल्पना सोरेन आणि सुनीता केजरीवाल या दोन बहिणी हिमतीने लढत असतील तर भाऊ मागे कसा राहणार काळजी करू नका, संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना अटक केली तर आम्ही घाबरू, असे त्यांना वाटत असेल पण आम्ही घाबरत नाही, त्यांनी देशवासीयांना अजून ओळखलेलं नाही. भारतीय नागरिक कोणालाही घाबरत नाहीत ते लढाऊ आहेत. तुमच्या बरोबर केंद्रीय संस्था आहेत, पण आम्ही इंडिया आघाडी स्थापन करून आलो आहोत. हिम्मत असेल तर भाजपच्या लोकांना बॅनर वर लिहून दाखवा की भाजपसोबत तीन पक्ष आहेत ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग, असं म्हणत उध्दव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
दिल्लीमधील या महारॅलीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, पंजाबचे मुख्यमंत्री, भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, आर जे डी नेते तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला इत्यादी इंडिया आघाडीचे प्रमुख नेते रामलीला मैदानावरील या रॅलीला उपस्थित होते.