विधानपरिषद निवडणूकीत कोणाची विकेट पडणार? चंद्रकांत पाटील यांचे सूचक विधान
विधानपरिषद निवडणूकीत कोण बाजी मारणार? याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केले आहे.
विधानपरिषद निवडणूकीच्या मतदानाला दोन दिवस बाकी असतानाच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यापार्श्वभुमीवर चंद्रकांत पाटील यांनी कुणाची विकेट पडणार याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
राज्यसभा निवडणूकीत भाजपने महाविकास आघाडीचा पराभव केल्यानंतर विधानपरिषद निवडणूकीत कोण बाजी मारणार? असे तर्क वितर्क लढवले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर आमचे सर्वच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कुणाची विकेट पडणार? याबाबत चंद्रकांत पाटील सूचक विधान केलं आहे.
विधानपरिषद निवडणूकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे एका उमेदवाराची विकेट पडणार हे निश्चित आहे. मात्र हा उमेदवार कोणत्या पक्षाचा असणार? असा प्रश्न चर्चिला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर चंद्रकांत पाटील यांना कुणाची विकेट पडणार याबाबत विचारले होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजकारणामध्ये प्रत्येकाने निवडणूक जिंकुस्तोवर जिंकण्याचा दावा करायचा असतो. सध्या घोडेमैदान लांब नाही. त्यामुळे 20 जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतमोजणीला सुरूवात होईल आणि सात ते साडेसात वाजेपर्यंत निवडणूकीचा निकाल स्पष्ट होईल. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराची विकेट पडेल, असे सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या दाव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सर्व जागा निवडून आणेल. मात्र ज्यांना 26 चा आकडा गाठता येणार नाही त्यांची विधानपरिषद निवडणूकीत विकेट पडेल असंही अजित पवार म्हणाले.