विधानपरिषद निवडणूकीची तारीख ठरली ! पण दहावी जागा कोणाची?

राज्यसभेच्या निवडणूकीपाठोपाठ आता विधानपरिषदेची निवडणूकही जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र या निवडणूकीत नऊ जागांचा निकाल जवळपास निश्चित असून दहाव्या जागेसाठी काँटे की टक्कर पहायला मिळणार आहे.;

Update: 2022-05-26 01:59 GMT

राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सहावी जागा नेमकी कोणाची यावर राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजी राजे यांनी ही निवडणूक अपक्ष लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी सर्व पक्षांनी पाठींबा द्यावा, अशी विनंती केली. मात्र शिवसेनेने पक्ष प्रवेश केला तरच पाठींबा देऊ अशी भुमिका घेतल्याने राज्यात संभाजी राजे यांची कोंडी झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर आता राज्यात विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीतही राज्यसभेप्रमाणेच शेवटच्या दहाव्या जागेसाठी काँटे की टक्कर लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात दहा विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. त्यापार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. तर ही निवडणूक 20 जून रोजी होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड, शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड हे सदस्य निवृत्त होत आहेत. याबरोबरच भाजप नेते रामनिवास सिंह यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे. मात्र या निवडणूकीत भाजपची सदस्यसंख्या दोनने कमी होणार आहे. त्यामुळे या विधानपरिषदेसाठी कुणाला संधी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी एकूण सर्वपक्षीय संख्याबळ लक्षात घेता भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन उमेदवार तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र दहाव्या जागेसाठी काँग्रेसने जोर लावला आहे. त्यामुळे या जागेसाठी काँग्रेसकडे असलेले अतिरीक्त मतांची बेरीज साधून ही जागा खिशात घालण्यासाठी काँग्रेसने जोर लावला आहे.

विधानपरिषदेसाठी नेमके किती मतं लागतात?

विधानपरिषद निवडणूकीत निवडून येण्यासाठी 27 मतांची गरज आहे. त्यामध्ये भाजपचे 106 तर मित्रपक्षांसह 113 इतकी सदस्यसंख्या आहे. त्यामुळे यामध्ये भाजपच्या चार जागा सहज निवडूण येऊ शकतात. तर राष्ट्रवादीचे 54 आणि शिवसेनेचे 56 सदस्य असल्याने राष्ट्रवादीच्या 2 तर शिवसेनेच्या 2 जागा निवडून येऊ शकतात. मात्र काँग्रेसचे 45 सदस्य असल्याने काँग्रेस एक जागा सहज जिंकू शकते. मात्र दुसऱ्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

या निवडणूकीत शिवसेनेची 2 मत शिल्लक राहतात. तर भाजपसह मित्रपक्षांचे 5 मतं शिल्लक राहतात. मात्र काँग्रेसला ९ मतांची गरज असल्याने काँग्रेससाठी दहावी जागा मिळवण्यासाठी मतांची जुळवा जुळव करावी लागणार आहे. तर विधानपरिषदेवर संधी मिळण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी जोरदार लॉबिंग करायला सुरूवात केली आहे.

दहावी जागा बिनविरोध होणार का?

दहावी जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला 9 मतांची आवश्यकता आहे. तर त्यापैकी शिवसेनेची 2 मतं शिल्लक आहेत. मात्र भाजप आणि मित्रपक्षांचे एकूण 5 मतं शिल्लक आहेत. मात्र ही मतं उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यामुळे ही जागा बिनविरोध होणार की या जागेसाठी घोडेबाजार होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेचे सभापती असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना संधी देऊन ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांचा पत्ता कापला जाणार असल्याची चर्चा आहे.

भाजपकडून इच्छुकांची भाऊगर्दी

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे, भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, माजी मंत्री राम शिंदे आणि कृपाशंकर सिंग यांची नावं चर्चेत आहेत. मात्र भाजपच्या वरिष्ठांकडून या चार जागांवर कुणाला संधी मिळणार हे अजून स्पष्ट झाले नाही.

भाजप कोणाला संधी देणार?

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. तर रयत क्रांती पक्षाचे नेते आणि भाजप समर्थक असलेल्या सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच मुंबई महापालिका निवडणूकीचा विचार करता प्रसाद लाड यांना विधानपरिषदेवर पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई महापालिका निवडणूकीत उत्तर भारतीय मतांची बेरीज लक्षात घेऊन कृपा शंकर सिंग यांनाही संधी दिली जाऊ शकते.

ओबीसी समाजाचा चेहरा असलेल्या पंकजा मुंडे विधानसभा निवडणूकीपासून पक्षावर नाराज आहेत. तर त्यांनी अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी देऊन त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न भाजप करणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे.

व्हिडीओ नक्की पहा

Full View

Tags:    

Similar News