नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेसाठी ठाकरे सरकारच्या हालचाली?
नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अमन मोर्चा काढणार होते. मात्र ठाकरे सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.;
मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करावी आणि राज्य सरकारने मोहम्मद पैगंबर बिल पास करावे या मागणीसाठी १७ जून रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अमन मार्चचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या दोन्ही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्यामुळे मदनपुरा ते आझाद मैदान निघणारा अमन मार्च तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित अमन मार्चला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचा दावा करण्यात आला होता.. मोठ्या संख्येने लोक या अमन मार्चमध्ये सहभागी झाले तरी काही समाजविरोधी घटक या मोर्चाला वेगळे वळण देऊन वातावरण बिघडवू शकतात. त्यामुळे हा मार्च काढू नये अशी विनंती पोलिस आयुक्त संजय पांडे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आम्ही पूर्ण करीत आहोत आणि लवकरच त्यांना अटक करू असे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले तर मोहम्मद पैगंबर बिल पास करण्यासाठी सर्व सहमती बनवण्यासाठी पुढाकार घेऊ, त्यासाठी सर्व संबंधित घटकांची बैठक बोलावून चर्चा करू आणि हा कायदा पास करू असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. त्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने १७ जून रोजी होणार अमन मार्च तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.