सोलापूर लोकसभा निवडणुकीतून वंचितची माघार भाजपसाठी डोकेदुखी
दलित मतांच्या विभाजनातून विजयाचे समीकरण घालणाऱ्या भाजपला बसणार फटका...महायुतीचे उमेदवार राम सातपुते व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात थेट सामना...
सोलापूर/अशोक कांबळे
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र निवडणुकीसाठी पात्र ठरून देखील सोमवारी त्यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार राम सातपुते व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात थेट सामना पहायला मिळणार आहे. दरम्यान, गायकवाड यांच्या माघारीमुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अक्कलकोटचे राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली होती. गायकवाड यांनी १५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर अर्ज छाननीत त्यांचा उमेदवारी वैध ठरला. मात्र, त्यानंतर त्यांनी सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता गायकवाड यांच्या या निर्णयाचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना होणार आहे. तर दलित मतांचे विभाजनातून विजयाचे समीकरण घालणाऱ्या भाजपला फटका बसणार आहे.
२०१४ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शरद बनसोडे आणि काँग्रेसचे सुशिलकुमार शिंदे अशी लढत झाली होती. यावेळी ‘मोदी लाटेत’ बनसोडे यांनी बाजी मारली होती. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी, काँग्रेसकडून सुशिलकुमार शिंदे तर वंचितकडून प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली होती. या लढतीत डॉ. जयसिद्धेश्वर स्वामींनी सुशिलकुमार शिंदे यांचा १ लाख ४० हजार ६७४ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना या निवडणुकीत १ लाख ७० हजार ७ मते मिळाली होती. मागासवर्गीय आणि मुस्लिम मताचे विभाजन झाल्याने, सुशिलकुमार शिंदे यांचा पराभव झाल्याचा निष्कर्ष यातून काढण्यात आला.
या लोकसभा निवडणुकीत देखील वंचित आणि महाविकास आघाडीची बोलणी फिसकटल्यामुळे वंचित ने स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवले होते. सोलापुरात देखील त्यांनी राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीप्रमाणे यावेळी देखील वंचितच्या उमेदवारीमुळे दलित मतांचे विभाजन होणार होते आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपलाच होणार होता, असे आडाखे राजकीय विश्लेषकांकडून बांधले जात होते. परंतु सोमवारी अखेर वंचित चे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली आहे. या निर्णयामुळे मागासवर्गीय मतांची विभागणी टळेल आणि याचा फायदा प्रणिती शिंदे यांना होईल, असे बोलले जाते.