भाजपाने हिम्मत असेल तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडून दाखवावे, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे.शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. कोरोनामुळे यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा हा मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
जीएसटी रद्द करा
जीएसटी करप्रणाली जर सदोष असेल तर ती रद्द करून जुन्या पद्धतीप्रमाणे वसुली करावी आणि राज्यांना त्यांचा वाटा द्यावा अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
सरसंघचालकांच्या वक्तव्यावरून राज्यपालांना टोला
काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं," असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लगावला. हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात, आम्हाला कोण विचारतंय? ज्यावेळी बाबरी मशीद पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते. घंटा बडवा, थाळ्या बडवा, हे तुमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या. असा टोला त्यांनी राज्यपालांचे नाव न घेता लगावला
कंगनाला टोला
मुंबई आणि महाराष्ट्रावर टीका करणाऱ्या कंगना रानावत हिचा देखील अप्रत्यक्ष समाचार उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात घेतला. मुंबईत येऊन नाव कमवायचं आणि मुंबईची बदनामी करायची हे चांगले नाही या शब्दात टीका करत उद्धव ठाकरे यांनी गांजाची शेती कुठे होते ते तुम्हाला माहिती आहे, असा टोला देखील लगावला. सुशांत सिंह याच्या आत्महत्येवरून राजकारण करणाऱ्यांना देखील यावेळी त्यांनी टोला लगावला. बिहारच्या मुलाच्या आत्महत्येचं राजकारण करताना महाराष्ट्राच्या मुलावर आरोप करण्यात आले, असंही ते म्हणाले.
नारायण राणे यांच्यावर टीका
बिहारमध्ये मोफत लस देण्याच्या भाजपच्या आश्वासनाचा देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. काही जणांना माणसाचं नाही, तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. राज्यातले एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात, अशी टीका त्यांनी केली.